छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याच्या निर्णयानंतर होणाऱ्या ओबीसी नेत्यांकडून होणाऱ्या विरोधात धनंजय मुंडे हे मागच्या बाकावर दिसून येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या प्रश्नांसाठी संबंधित नेत्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठित केली असून, त्यात पंकजा मुंडे, अतुल सावे, गणेश नाईक आदी भाजप मंत्री नेत्यांसह राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्यासोबत दत्ता भरणे यांना स्थान दिले. शिंदे सेनेकडून मंत्री संजय राठोड यांचाही या समितीमध्ये समावेश आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव वगळले गेले. मुंडे यांची मंत्रीपदावरून झालेली गच्छंती झाल्यानंतर ते मागच्या बाकावर होतेच. ओबीसी नेत्यांच्या यादीतही ते पुढे जाऊ शकले नाहीत.
मागील आठवड्यात बीडमधील एका कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांना आडनाव लावण्यासही बंदी असल्याच्या मुद्यावरून कुठे आहे समता ? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला होता. शुक्रवारी बंजारा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारे एक निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. त्यामागे ओबीसींमधील वेगवेगळ्या प्रवाहातून आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे येणाऱ्या समाजामागे येऊन नेतृत्व करण्याचा प्रयत्न असल्याचा प्रयत्न मानला जात आहे.
मंडल आयोगानंतर राज्यामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारा-बंजारा भाई-भाई म्हणत समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलला होता. तेव्हापासून वंजारासोबत बंजाराच्याही प्रश्नावर गोपीनाथ मुंडे हेच अग्रेसर असत. त्यातूनच धनंजय मुंडे यांचे बंजारा समाजाच्या प्रश्नांना मांडणे हा ओबीसी नेत्यांमध्ये येण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्त्या प्रकरणानंतर आणि करुणा मुंडे यांच्याशी असलेल्या कथित नातेसंबंधानंतर न्यायालयानेही ताशेरे ओढल्यानंतर धनंजय मुंडे यांना मार्चमध्ये मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात पुढे येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. मराठा आरक्षणाच्या निकषात हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याच्या निर्णयानंतर होणाऱ्या विरोधातील आंदोलनात ते कोठून दिसून येत नाहीत.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनाेज जरांगे यांनी नेहमीच छगन भुजबळ यांच्यावरच टीका केली होती. त्यामुळे त्याची उत्तरेही सहाजिकच भुजबळ यांनीच दिली. लातूर येथे ओबीसी समाजच्या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या सांत्वानासाठी भुजबळ दाखल झाले. या सर्व प्रकरणातही धनंजय मुंडे दिसले नाहीत.