भाजप पुणे शहराध्यक्ष बदलाची चर्चा

पक्षातील एक गट शहराध्यक्ष बदलला जाईल, असा अंदाज व्यक्त करत आहे. दरम्यान, तूर्तास शहराध्यक्ष बदलला जाईल, अशी शक्यता नाही, असा दावा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आला आहे.

भाजप पुणे शहराध्यक्ष बदलाची चर्चा
भाजप पुणे शहराध्यक्ष बदलाची चर्चा

अविनाश कवठेकर

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आल्यानंतर शहराध्यक्ष बदलण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक होईल, अशी चर्चा असून पक्षातील एक गट शहराध्यक्ष बदलला जाईल, असा अंदाज व्यक्त करत आहे. दरम्यान, तूर्तास शहराध्यक्ष बदलला जाईल, अशी शक्यता नाही, असा दावा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये बदल करण्यात आले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बावनकुळे यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष बदलला जाईल, अशी चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये सुरू झाली आहे.

हेही वाचा … चंद्रशेखर बावनकुळे : भाजपचा नवा ओबीसी चेहरा

भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची काही वर्षांपूर्वी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर जून महिन्यात शहराध्यक्ष बदलला जाईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेता गणेश बीडकर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाची चर्चा त्यावेळी होती. मात्र कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहराध्यक्ष बदला जाणार नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे शहराध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपमध्ये बदल झाल्यानंतर या चर्चेने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा … पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि लढवय्या असल्यानेच पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची धुरा

आगामी महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नव्या शहराध्यक्षपदाची निवड केली जाईल. निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्ष बदलणे चुकीचे ठरले असते. पक्षाला त्याचा फायदा झाला नसता. मात्र आता निवडणूक लांबणीवर गेल्याने शहराध्यक्ष बदलला जाऊ शकतो, अशी चर्चा भाजपमध्ये आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि कार्यकारिणी दर तीन वर्षांनी बदलण्यात येते. मात्र प्रदेश पातळीवर बदल झाल्याने तातडीने हा बदल केला जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नावे यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहेत. दरम्यान, मोहोळ आणि बीडकर आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. तर पुढील अडीच वर्षात शिरोळे यांची आमदार पदाची मुदत संपुष्टात येणार आहे. सध्याचे शहराध्यक्ष मितभाषी असले तरी आक्रमक नाहीत. आगामी महापालिका निवडणकू लक्षात घेता शहारध्यक्षपदासाठी आक्रमक चेहरा हवा तसेच पक्षाचे काम आणि बाजू जोरकसपणे मांडणारा शहराध्यक्ष हवा, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान, प्रदेश पातळीवर बदल झालेला असला तरी स्थानिक पातळीवर बदल करायचा की नाही, याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि लढवय्या असल्यानेच पुन्हा मुंबई अध्यक्षपदाची धुरा
फोटो गॅलरी