कोल्हापूर : Gokul Dairy Kolhapur Latest News गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिकयांच्यातील मतभेद तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. गोकुळ मध्ये महायुतीची सत्ता आल्याचा दावा केला जात असला तरी शौमिका महाडिक यांनी संघाच्या कारभारावर प्रश्न कायम ठेवले आहेत. यामुळे गोकुळ मध्ये मुश्रीफ – महाडिक यांच्या वादाचा मिठाचा खडा पडताना दिसत आहे.
गोकुळ दूध संघात महादेवराव महाडिक यांचे तीन दशके निर्विवाद वर्चस्व होते. चार वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील – हसन मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली. दोन महिन्यापूर्वी गोकुळच्या अध्यक्ष निवडीचे राजकारण थेट वर्षावर पोहचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर गोकुळ मध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला. निवडणूक वर्षात आपला काँग्रेसचा अध्यक्ष करण्याचे सतेज पाटील यांचे स्वप्न हवेत विरले.
परंतु आता गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून महायुतीतील वाद ताणले आहेत. गोकुळ मधील महाडिक यांची सत्ता गेल्यानंतर धनंजय महाडिक, शोमिका महाडिक यांच्याकडून विद्यमान सत्ताधाऱ्यांची सातत्याने वस्त्रहरण केले जात आहे. दुधाचा खरेदी -विक्री दर, भूखंड खरेदी , वासाचे दूध , संचालकांच्या सहली, खत निर्मिती प्रकल्प अशा अनेक मुद्द्यांवरून सातत्याने वावाडे काढले जात आहेत.
खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळ मधील वासाच्या दुधाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करीत गोकुळच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दहीहंडी कार्यक्रमात महाडिक यांनी ‘ गोकुळच्या मागील निवडणुकीत वासाच्या दुधावरून राजकारण केले. मंत्री हसन मुश्रीफ यांना चार वर्षानंतर का असेना यावर बोलावे लागले. त्यावरून गोकुळ मध्ये कारभार कसा सुरू आहे हेच दिसून येते ,’ अशा शब्दात महाडिक यांनी सार्वजनिकरित्या गोकुळवर तोफ डागली आहे.
गोकुळच्या कारभाराचे वाभाडे काढल्याने हसन मुश्रीफ प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांनीही महाडिक यांना प्रतित्तूर देत गोकुळ मध्ये ‘ महायुतीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. महायुतीच्या कारभारात कोणी मिठाचा खडा टाकू नये,’ असा परखड सल्ला महाडिक यांना दिला आहे. महाडिक यांनी उपस्थित केलेला वासाच्या दुधाचा मुद्द्यावर गोकुळचे अध्यक्ष, संचालक मंडळाकडून संशय दूर केला जाईल, असेही मुश्रीफ म्हणाले.
गोकुळच्या कारभाराबद्दल अजूनही प्रश्न आहेत. ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी उपस्थित करणार असल्याचा इशारा शौमिका महाडिक यांनी दिला आहे. त्यामुळे त्या कोणती भूमिका मांडणार आणि त्याला महायुतीचे अध्यक्ष असलेले नाविद मुश्रीफ यांच्याकडून कोणते उत्तर देणार यावर महायुतीतील वाद रंगण्याची चिन्हे आहेत.