तुकाराम झाडे

हिंगोली : कायम गटबाजीने पोखरलेल्या जिल्ह्यातील काँग्रेसमधून प्रमुख नेते बाहेर पडत असतानाच ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हिंगोली दौऱ्यात गोरेगावकर आणि सातव गट एकत्र आल्याचे चित्र आहे. गोरेगावकर यांच्या निवासस्थानी दोन्ही गटात माणिकराव ठाकरे यांनी दिलजमाई घडवून आणली.

जिल्ह्यात काँग्रेस अंतर्गत सातव व भाऊ गोरेगावकर यांच्यात असलेली गटबाजी सर्वश्रुत होती. दोन्ही गटांत दिलजमाई करण्याचे वारंवार प्रयत्न झाले. दोन्ही गट पक्षासाठी नमते घ्यायला तयार नसल्याने अखेर पक्ष निरीक्षकांना स्वतंत्र बैठका घ्याव्या लागल्या. पक्षनिरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी दोन गटांची एकत्र बैठक घेण्याचे प्रयत्न केले असता त्या वेळी बैठकीतच कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. हे प्रकरण राज्यात गाजले. एका कार्यकर्त्याला तर सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबितही केले गेले.

हेही वाचा… साताऱ्यात शिवसेनेची पडझड सुरूच; उद्धव ठाकरेंपुढे नव्याने संघटन बांधणीचे आव्हान

पक्षांतर्गत घडणाऱ्या घडामोडी व गटबाजीला कंटाळून जिल्ह्यातील काँग्रेसला भवितव्य नसल्याचे चित्र रंगवत वरिष्ठ नेत्यांनी पक्षत्याग केला. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले माजी खासदार शिवाजी माने यांनी सुरुवातीला काँग्रेस सोडली. ते आता भाजपमध्ये विसावले आहेत. त्यानंतर अजित मगर यांनीही काँग्रेस सोडली. इतक्यावरच हे सत्र थांबले नाही तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवबंधन बांधले. इतक्या घडामोडी घडल्यानंतरही पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली नाही. परिणामी काँग्रेसचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचे जावई माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी आपल्या समर्थकांसह शिवबंधन हाती बांधले. बोंढारे आज शिंदे गटात सामील आहेत तर माजी आमदार टारफे ठाकरे गटात सामील झाले. काँग्रेसला गळती लागलेली असतानाच माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी जिल्हा दौऱ्यावर आले होते. पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या निमित्ताने पक्षाचे प्रबोधन व प्रशिक्षण समितीचे राज्याध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत माजी आमदार भाऊ गोरेगावकर आणि आमदार सातव यांचे दोन्ही गट सामील झाले होते. विशेष म्हणजे विश्रामगृहावरील बैठक संपल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी गोरेगावकर यांच्या निवासस्थानी एकत्र भोजन घेतले. त्यानंतर भाऊ पाटील, डॉ. प्रज्ञा सातव आणि माणिकरावांचे एकत्रित पुष्पहार घातलेले छायाचित्र दोन्ही गटात दिलजमाई झाल्याचा संदेश सांगणारे होते.

हेही वाचा… प्रशांत बंब यांच्या वक्तव्यामुळे भाजपभाेवती शिक्षकांचे माेहाेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ वयोवृद्ध कार्यकर्ते हरिभाऊ शेळके म्हणाले, की ‘आता दिसते ही नेत्यांमधील दिलजमाईची परिस्थिती कायम राहिली तरच जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस प्रबळ झाल्याशिवाय राहणार नाही. माणिकराव तुमच्यामुळे हे चित्र पाहावयास मिळाले.’ आता हीच परिस्थिती कायम राहील असे माणिकराव ठाकरेही म्हणाले.