नागपूर : निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केल्यानंतर काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातत्याने टीका करणे सुरू केले आहे. ऐरवी भाजप नेत्यांकडून होणाऱ्या टिकेकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना ‘सिरीयल लायर’ म्हंटल्यावर भाजपला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला ‘फडणवीसच कसे ‘सिरीयल लायर ’ आहेत हे सांगतानाच मतचोरी प्रकरणात पालकमंत्र्यांचे पुत्र संकेत यांनाही जिल्हा काँग्रेसने लक्ष्य केले आहे.

बावनकुले हे मंत्री आहेत की पक्षाचे प्रवक्ते? असा प्रश्न पडावा इतके ते माध्यमस्नेही आहेत, ते नागपूर दौऱ्यावर असले की प्रत्येक वेळा राहुल गांधी यांना लक्ष्य करतात, त्यांच्यावर टीका करताना कधी-कधी त्यांचा स्तरही घसरतो. अलीकडेच राहुल गांधींचा त्यांनी ऐकेरी उल्लेख केला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना ‘सिरीयल लायर’ म्हंटले. यामुळे ऐरवी भाजप नेत्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करणारे स्थानिक काँग्रेस नेते तसेच नागपूर जिल्हा काँग्रस आक्रमक झाली. त्यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यासह पालकमंत्री आणि त्यांच्या पुत्रालाही लक्ष्य केले. भाजपच्या विरोधात प्रथमच काँग्रेसने आक्रमक पाऊल उचलल्याचे दिसून आले.

काँग्रेसचे आरोप काय ?

जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष अश्वीन बैस यांनी मतचोरीच्या मुद्यावरून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांचे पुत्र संकेत यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. बैस म्हणाले, बावनकुळे यांच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे पुराव्यानिशी अनेक तक्रारी दाखल केल्या. परंतु, मतदार यादीचे काम महसूल खात्याचे अधिकारी करीत असल्याने ते दबावात असून यादीतील बनावट मतदारांची नावे वगळण्यात येत नाही. बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत यांनी शेकडोच्या संख्येत बनावट मतदार तयार केले आहे. त्यांनी स्वत: ७ क्रमांकाचे ‘फॉर्म’ भरून दिले आहेत. त्यांनी किती फार्म भरून दिले. याची माहिती प्रशासनाने द्यावी,

फडणवीसच ‘सिरीयल लायर’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ‘सिरीयल लायर’ म्हटले आहे. वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार म्हणणारे फडणवीस स्वत:च ‘सिरीयल लायर’ आहेत, असा आरोपही त्यांनी केला.