ED Action on Karnataka Home Minister : मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणारे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर आले आहेत. काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून परमेश्वर यांना ओळखलं जातं. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांच्यानंतर त्यांना पक्षात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. दोन दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालयाने परमेश्वर यांच्याशी संबंधित असलेल्या शैक्षणिक संस्थांची चौकशी केली. सोन्याची तस्करी व मनी लाँडरिंग प्रकरणामध्ये ही चौकशी केली जात असल्याची माहिती आहे, ज्यामध्ये कन्नड अभिनेत्री राण्या राव आणि तिच्या इतर साथीदारांचा समावेश आहे.

अभिनेत्री राण्या राव हिला मार्चमध्ये बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. तिच्याकडे १४.२ किलो सोनं सापडलं होतं, या सोन्याची किंमत अंदाजे १२.५ कोटी रुपये इतकी होती. सोने तस्करीचे हे रॅकेट संपूर्ण राज्यभरात पसरले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या चौकशीची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, सोने तस्करीचे हे प्रकरण ईडीने हाती घेतले असून ईडीने कर्नाटकातील १६ ठिकाणी बुधवारी (तारीख २१ मे) छापेमारी केली. ज्यामध्ये गृहमंत्री परमेश्वर यांच्या मालकीच्या तुमकुरु येथील श्री सिद्धार्थ वैद्यकीय महाविद्यालय, श्री सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि नेलमंगला येथील श्री सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थांचाही समावेश आहे.

“ईडीला तपासात सहकार्य करणार”

कर्नाटकच्या गृहमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे जी. परमेश्वर हे श्री सिद्धार्थ उच्च शिक्षण अकादमीचे कुलगुरू आहेत. ही संस्था चालवणाऱ्या ट्रस्टने अभिनेत्री राण्या रावला ४० लाख रुपये दिल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेला आम्ही तपासात सहकार्य करू अशी हमी गुरुवारी गृहमंत्री. जी परमेश्वर यांनी दिली आहे. “मी कायद्यावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. चौकशीला किंवा तपासाला मी पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे,” असं कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. ट्रस्टकडून मिळालेले ४० लाख रुपये राण्या राव हिच्या क्रेडिट कार्ड बिलासाठी वापरण्यात आल्याच्या आरोपावर गृहमंत्री परमेश्वर यांनी मौन बाळगले. सध्या मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच यावर उत्तर दिले जाईल, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : पुलवामा हल्ल्याचे सत्य सांगणाऱ्या माजी राज्यपालांवर भ्रष्टाचाराचे आरोप; कोण आहेत सत्यपाल मलिक?

उपमुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांची पाठराखण

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांनीही गृहमंत्री परमेश्वर यांचे समर्थन केले आहे. ट्रस्टने ही रक्कम कदाचित अभिनेत्री राण्या रावच्या कुटुंबातील लग्नसमारंभात भेट म्हणून दिली गेली असावी, असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सारवासारव केली आहे. “ट्रस्टने अभिनेत्रीला २५ किंवा १५ लाख रुपये दिले असतील, कदाचित ते लग्नात भेट म्हणूनही दिले गेले असतील, यात काही गैर नाही. गृहमंत्री जी. परमेश्वर दररोज हजारो लोकांना भेटत असतात. कोण काय करतं हे त्यांना माहीत नसतं. कायदा आपले काम करेल आणि आम्ही त्यात अजितबात हस्तक्षेप करणार नाही,” असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सोने तस्करी प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री ही कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. तिच्या अटकेनंतर रामचंद्र राव यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

गृहमंत्री जी. परमेश्वर यांची राजकीय कारकीर्द

कर्नाटकचे गृहमंत्री असलेले जी. परमेश्वर यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील एच. एम. गंगाधरय्या हे माजी आमदार व जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. त्यांच्या कुटुंबाने श्री सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. दलित समुदायातून आलेले परमेश्वर यांनी ऑक्टोबर २०१० ते जुलै २०१८ या कालावधीत सर्वात जास्त काळ कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. जी. परमेश्वर हे सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. १९८९ ते २००७ दरम्यान त्यांनी तीनवेळा मधुगिरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर २००८ ते २०२३ दरम्यान ते कोरटगेरे विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले. २०१५ ते २०१७ या काळात सिद्धरामय्या यांच्या पहिल्या सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. २०१८ ते जुलै २०१९ दरम्यान स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते.

हेही वाचा : BJP MLA Disqualified : भाजपा नेत्याची आमदारकी रद्द; तुरुंगातही जावं लागणार? नेमकं काय आहे प्रकरण?

विधानसभा निवडणुकीत झाला होता पराभव

२०१३ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी जी. परमेश्वर यांना मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. परंतु, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामान करावा लागला. त्यांच्या पराभवानंतर सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. निवडणुकीतील पराभवानंतरही पक्षाने जी. परमेश्वर यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्वबळावर बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ आपल्याच गळ्यात पडणार, अशी आशा जी. परमेश्वर यांना होती. अनेकदा त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. मात्र, पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवल्याने नाराजी?

दरम्यान, पक्षाने मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवल्याने जी. परमेश्वर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. “आमच्यातील (दलितांमधील) न्यूनगंड दूर झाला पाहिजे. म्हणून मी खुलेपणाने सांगतो की, मी मुख्यमंत्री होणारच. मी का होऊ नये? बसवलिंगप्पा व एन. रचैय्या यांसारख्या भूतकाळातील दलित नेत्यांमध्ये अशी कोणती कमतरता होती की, ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत,” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. दरम्यान, परमेश्वर यांच्याआधी ईडीने काँग्रेसचे माजी मंत्री बी. नागेंद्र यांना जून २०२४ मध्ये एका घोटाळ्यात अटक केली होती. यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या कथित घोटाळा प्रकरणात नागेंद्र यांना ऑक्टोबरमध्ये जामीन मिळाला; पण त्यांना आता मंत्रिपदापासून दूर राहावं लागत आहे. दरम्यान आमदार नागेंद्र यांच्यानंतर गृहमंत्री जी. परमेश्वर हेदेखील ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.