Shiv Sena Republican Sena alliance : एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे. बुधवारी (तारीख १६ जुलै) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे व आनंदराज आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली आहे. रिपब्लिकन सेनेचा विशेषतः मुंबई व विदर्भातील काही भागांतील दलित, गरीब व वंचित घटकांमध्ये मोठा प्रभाव आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे यांच्या शिवसेनेला महायुती व त्याबाहेरील विविध आव्हानांना सामोरं जावं लागत आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाने आपले राजकीय गणित मजबूत करण्यासाठी ही युती केल्याचं सांगितलं जात आहे. या युतीतून मराठी मतदारांपलीकडे दलित मतदारांमध्येही आपला प्रभाव वाढवण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं आहे. गेल्या दोन दशकांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे.

यंदाही महापालिकेत आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी उद्धव ठाकरेंकडून मराठी मतांची एकजूट सुरू असल्याचं दिसून येत आहे. एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर युती करण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून (नाशिक व रायगड) शिंदे गट व भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच पक्षातील काही आमदार व मंत्री वादात सापडल्याने एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुंबईत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले, “सामान्य जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे. गरीब, गरजू आणि मागास घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना सामावून घेण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही संघटनेची खरी ताकद तिच्या कार्यकर्त्यांत असते. संकटाच्या वेळी नेत्यांनी आपल्यासोबत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांची साथ सोडू नये. सामान्य जनतेलाही संकटाच्या काळात आपल्या नेत्यांकडून मदतीची अपेक्षा असते.”

आणखी वाचा : भाजपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदाराचे गंभीर आरोप; मोदी-शाहांबद्दल नेमकं काय म्हणाले?

आनंदराज आंबेडकर युतीबद्दल काय म्हणाले?

यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले, शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन सेनेत काहीसे मतभेद असले तरी ते या युतीच्या आड येणार नाहीत. दोन्ही पक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा स्वीकार केला असून आम्ही गरीब, वंचित आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हा त्यांनी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी अनेक बौद्ध भिक्खू आणि अनुयायांचे स्वागत केले होते. आज आम्ही शिंदे गटाला बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतील व त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आनंदराज आंबेडकर कोण आहेत?

  • आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू आहेत.
  • सुरुवातीला आंबेडकर बंधू हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) या पक्षाचे सदस्य होते.
  • १९९८ मध्ये आनंदराज यांनी ‘रिपब्लिकन सेना’ या पक्षाची स्थापना केली.
  • इतर आंबेडकरवादी गटांप्रमाणेच हा पक्षही डॉ. बाबासाहेबांच्या विचारसणीला धरून आहे.
  • मात्र, रिपब्लिकन सेनेला राज्यातील कोणत्याही निवडणुकांमध्ये फारसे यश मिळालेलं नाही.
  • प्रकाश आंबेडकर अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असून त्यांच्या पक्षाला मोठी लोकप्रियता आहे.
  • २०११ मध्ये आनंदराज आंबेडकर यांनी मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर आंदोलन केलं होतं.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ही जागा देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली होती.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये विविध गट

२०१२ मध्ये त्यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या बौद्ध लेणींवर झालेल्या अतिक्रमणांच्या विरोधात आवाज उठवला होता. १९५६ मध्ये नागपूरच्या दीक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांनी बौद्ध स्मारकांच्या प्रश्नावर आंदोलन उभारून स्वतःला दलित व आंबेडकरवादी समाजाच्या व्यापक वर्गाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या पाच दशकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विविध गटांमध्ये विभागली गेली आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय, तसेच आरपीआय कवाडे गट, आरपीआय गवई गट आणि आरपीआय सचिन खरात यांच्या गटाचा समावेश आहे.

eknath shinde and anandraj ambedkar
मुंबईतील पत्रकारपरिषदेतून युतीची घोषणा करताना एकनाथ शिंदे व आनंदराज आंबेडकर

हेही वाचा : भाजपा नेत्याकडून संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, कोण आहेत प्रवीण गायकवाड? या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापणार?

शिंदे गटाला निवडणुकीत मोठा फायदा होणार?

शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन सेनेमधील नुकत्याच झालेल्या युतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. या युतीमुळे राज्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्या पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी लहान गटांना एकत्र करून ताकद वाढवण्याचा डावपेच असल्याचं विश्लेषकांनी म्हटलं आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय पक्ष सध्या राज्यातील व केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग आहे. या पक्षाला दलित मतदारांचा मोठा पाठिंबा असल्याचं सांगितलं जातं. विशेष बाब म्हणजे- १९९० च्या दशकात रामदास आठवले यांच्या पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर युती केली होती. या युतीला शिवशक्ती व भीमशक्ती युती असं नाव देण्यात आलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे–प्रकाश आंबेडकर युतीचा प्रयत्न अपयशी

नोव्हेंबर २०२२ मध्ये उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. सध्याच्या भाजपा सरकारमुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली असून त्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यावेळी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी म्हटलं होतं. यावेळी दोघांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांची आठवण करून दिली होती. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून ही युती तुटली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणूकही स्वतंत्रपणे लढवली होती, मात्र पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. दरम्यान, शिंदे गटाने रिपब्लिकन सेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.