नाशिक – युती तोडल्यापासून शिवसेनेचे प्रमुख (उद्धव ठाकरे) उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपवर विश्वासघातकी, दगाबाज आणि विश्वास ठेवण्यास पात्र नसल्याची टीका करत आहेत. महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे सोमवारी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) वतीने आयोजित विभागीय आढावा बैठकीत जिल्हा पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या भरवशावर राहणे योग्य नसून आपणही स्वबळाची किंवा प्रसंगी राष्ट्रवादीशी (अजित पवार) युती करुन आगामी निवडणुका लढविण्याचा आग्रह धरला. भाजपविषयी उद्धव ठाकरे हे सतत मांडत असलेल्या भूमिकेशी सुसंगत असा अनुभव शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दिवाळीनंतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूकडील वरिष्ठ नेते एकत्र लढण्याची भूमिका मांडत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र प्रत्येक पक्ष स्वबळाची चाचपणी करत आहेत. नाशिक येथे काही दिवसांपूर्वी आयोजित भाजपच्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक जागा जिंकण्याचे ध्येय ठेवण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले होते. तेव्हापासून महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट या मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद सोमवारी येथे आयोजित शिंदे गटाच्या आढावा बैठकीतही उमटले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उपनेते राहुल शेवाळे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे यांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. ही समिती प्रत्येक विभागातील सभासद नोंदणीसह निवडणूक तयारीचा आढावा घेत आहे. नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी नाशिक येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत बोलण्याची संधी मिळालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपने एकट्याने लढण्याची तयारी सुरु केली असल्याने त्यांच्या भरवशावर राहणे योग्य नसल्याची भूमिका मांडली. भाजप विरोधात पदाधिकाऱ्यांची मते इतकी टोकाची होती की, भाजपवर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रसंगी राष्ट्रवादीशी (अजित पवार) युती करुन निवडणुकांना सामोरे जावे, असेही सांगण्यात आले. महायुती होणार की नाही, हे स्पष्टपणे सांगावे, असा आग्रहही धरण्यात आला. जळगाव, धुळे, अहिल्यानगर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये भाजपने स्वबळासाठी तयारी सुरु केल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या लक्षात आणून दिले. नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना संयम ठेवण्याचा सल्ला देत सभासद संख्या वाढविण्याची सूचना करतानाच एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले म्हणणे मांडण्यात येईल, असे सांगितले.
भाजपविषयी येत असलेला अनुभव शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्यानंतर अनेकांना उध्दव ठाकरे यांची आठवण आली. उध्दव ठाकरे हे भाजपशी युती तोडण्यामागील कारण स्पष्ट करताना वारंवार भाजप विश्वासघातकी असल्याचा आरोप करत आले आहेत. नाशिकच्या बैठकीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही उध्दव ठाकरे यांची री ओढल्याचे मानले जात आहे.
आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक महापालिकेत भाजपने शंभरपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा नारा दिला असला तरी शिवसेनेचे प्राधान्य महायुतीलाच आहे. परंतु, स्वबळासाठीही सर्व १२२ जागांवर शिवसेनेकडे उमेदवार तयार आहेत. शेवटी प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढविण्याचा हक्क आहे. – अजय बोरस्ते (उपनेते तथा जिल्हाप्रमुख, शिवसेना-एकनाथ शिंदे)