Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देण्यासाठी विरोधकांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. यादरम्यान बिहारच्या राजकारणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यात पुन्हा एनडीएला सत्ता मिळाल्यास भाजपाचाच मुख्यमंत्री होणार, अशी आवई उठली आहे. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेंबरोबर घडलं ते नितीश कुमारांबरोबरही घडणार, असा कयास अनेकांनी बांधला आहे. या सर्व घडामोडींवर जनता दल युनायटेड पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. ते नेमके काय म्हणाले जाणून घेऊ…
बिहारमध्ये एकनाथ शिंदेंची चर्चा का सुरू झाली?
साधारणत: विधानसभा निवडणुकीआधी विविध राजकीय पक्षांकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले जातात. बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. विशेष बाब म्हणजे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच आगामी निवडणूक लढवली जाणार असल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निकालानंतर एनडीएचे आमदार एकत्र बसून मुख्यमंत्र्यांची निवड करणार असल्याचे सांगितले, त्यामुळे नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. अमित शाह यांनी केलेल्या विधानाला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्याची पार्श्वभूमी आहे.
अमित शाह यांच्या विधानाची चर्चा का झाली?
- नोव्हेंबर २०२३ मध्ये भाजपाने मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती.
- या निवडणुकीत पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतरही शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
- त्यांच्या जागी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी मोहन यादव यांची निवड केली. २०२४ मध्येही भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हाच पॅटर्न राबवला होता.
- तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्यानंतर महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला.
- मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले.
- शिंदे यांच्या हातातून मुख्यमंत्रिपदाची सूत्रे जाण्याला कारणीभूत महायुतीचे संख्याबळ ठरल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जातो.
आणखी वाचा : Ranjitsinh Naik Nimbalkar : महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून रणजितसिंह निंबाळकर का अडचणीत आले?
कन्हैया कुमार यांनी काय दावा केला?
काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनीही काही दिवसांपूर्वी आजतकला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांचाही शिंदे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. “एकनाथ शिंदे यांच्याबरोबर महाराष्ट्रात जे घडले त्याची चर्चा बिहारमध्ये सुरू आहे. भाजपाने नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, कारण त्यांना जनता दल युनायटेड पक्षाचे मतदान हवे आहे. एकदा निवडणुकीचे कौल हाती आले तर नितीश कुमार यांना हटवून ते आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री करतील, पण भाजपाने तसे बिहारमध्ये करण्याचा प्रयत्न करू नये. बिहारचे मतदार या निवडणुकीत त्यांना जागा दाखवेल”, असे कन्हैया कुमार म्हणाले होते.
नितीश कुमार यांचा शिंदे होणारच नाही – जेडीयूचा दावा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचे निकटवर्तीय तथा जेडीयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी नुकतीच दी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना एक सूचक विधान केले. “महाराष्ट्रात जे घडले ते बिहारमध्ये अजिबात घडणार नाही. नितीश कुमार यांचा शिंदे होणारच नाही”, असा दावा त्यागी यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांचा दाखलाही दिला. “नितीश कुमार बिहारमधील प्रमुख नेते असून जवळजवळ २० वर्षे मुख्यमंत्री आहेत. मी अमित शाह यांच्या विधानांचा कोणताही अर्थ काढला नाही, कारण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्या नावाला डझनभराहून अधिक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. लढाईच्या मध्येच कर्णधार बदलता येत नाही”, असेही त्यागी म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे एनडीएची सत्ता आल्यास नितीश हेच मुख्यमंत्रिपदावर ठाम राहतील असे मानले जात आहे.
हेही वाचा : नितीश कुमार यांची ‘पलटी’ भाजपासाठी कशी ठरतेय फायदेशीर? बिहारचे समीकरण काय सांगते?
महाराष्ट्रात नेमके काय घडले होते?
२०२२ मध्ये एकसंध शिवसेना दुभंगल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०२४ मधील विधानसभा निवडणूक महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवली. या निवडणुकीत भाजपाने १३२ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ५७ जागांवर विजय मिळवला. शिवाय महायुतीतील घटकपक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगले यश मिळाले. निकालानंतर भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रातील हाच पॅटर्न भाजपा आता बिहारमध्येही राबवणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
