Sayyida Saeeda Hamid statement controversy पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत यूपीए सरकारच्या काळात नियोजन आयोगाच्या माजी सदस्य असलेल्या सय्यदा सईदाईन हमीद यांनी बांगलादेशींबाबत केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशचे नागरिकदेखील माणसे आहेत आणि त्यांना भारतात येऊ दिले पाहिजे. अल्लाहने ही पृथ्वी माणसांसाठी तयार केली आहे, असे विधान त्यांनी केले. त्यामुळे भाजपाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या नक्की काय म्हणाल्या? त्यांच्या विधानामुळे भाजपा इतकी आक्रमक का झाली? कोण आहेत सय्यदा हमीद? जाणून घेऊयात…
सय्यदा हमीद काय म्हणाल्या?
- आसाम दौऱ्यावर असलेल्या सय्यदा हमीद म्हणाल्या, “बांगलादेशी असण्यात काय गुन्हा आहे? बांगलादेशीसुद्धा माणसे आहेत. जग इतके मोठे आहे की, बांगलादेशीदेखील येथे राहू शकतात… तीदेखील माणसं आहेत. अल्लाहने ही पृथ्वी माणसांसाठी तयार केली आहे.”
- त्या माजी मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला, वकील प्रशांत भूषण, कार्यकर्ते हर्ष मंदर व राज्यसभेचे माजी सदस्य जवाहर सरकार यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून आसाममध्ये होत्या.
- या शिष्टमंडळाने गोवालपारा येथील एका जागेला भेट दिली. तिथे आसाम सरकारकडून नुकतीच अतिक्रमण हटवण्याची मोहीम चालवली गेली होती.
- रविवारी त्यांनी गुवाहाटी येथे ‘अक्सम नागरिक संमेलन’ने आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये भाग घेतला. तिथे त्यांनी वादग्रस्त विधाने केली.

भाजपा आक्रमक
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्यावर टीका केली आणि नेहरू-गांधी कुटुंबाशी त्यांच्या असलेल्या जवळीकीकडेही लक्ष वेधले. “गांधी कुटुंबीयांच्या निकटवर्तीय सय्यदा हमीद यांच्यासारखी माणसे बेकायदा घुसखोरांना कायदेशीर ठरवत आहेत. हा आसामला पाकिस्तानचा भाग बनवण्याचे जिनांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न आहे,” असे सरमा यांनी सोमवारी ‘एक्स’वर म्हटले.
किरन रिजिजू म्हणाले, “माणुसकीच्या नावाखाली दिशाभूल केली जात आहे. हा आपल्या भूमी आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानातील अल्पसंख्याक बौद्ध, ख्रिस्ती, हिंदू व शीख लोकांचा छळ का होतो? सय्यदा हमीद सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जवळच्या असू शकतात; पण त्यांनी बेकायदा स्थलांतरितांना पाठिंबा देऊ नये.”
सरमा यांनी असाही दावा केला की, काँग्रेस, जमात-ए-इस्लामी-हिंद, हर्ष मंदर व प्रशांत भूषण यांच्यासारखे विचारवंत आणि पाकिस्तान व बांगलादेशातील काही घटक राज्याला कमकुवत करण्याचे काम करीत आहेत. “हर्ष मंदर व प्रशांत भूषण कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत आहेत. जवाहर सरकार, वजाहत हबीबुल्ला व फय्याज शाहीन यांचा समावेश असलेला असाच दुसरा गटही आसाम जिल्ह्याचा दौरा करत आहे. ते केवळ अल्पसंख्याक समाजातील आणि जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांना भेटत आहेत, जेणेकरून अशांततेचे वातावरण निर्माण होईल,” असे सरमा म्हणाले.
सरमा यांच्याकडून आसाममध्ये सतत टीकेचा सामना करीत असलेल्या काँग्रेसनेही हमीद यांच्या विधानांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. पक्षाचे नेते व लोकसभेचे माजी खासदार उदित राज यांनी म्हटले, “भारत म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तानमधील लोकांसाठी येऊन स्थायिक होण्याचे ठिकाण नाही.”
कोण आहेत सय्यदा हमीद ?
सय्यदा हमीद यांचा जन्म १९४२ मध्ये झाला. त्यांचे वडील के. जी. सय्यदाईन यांनी १९५० मध्ये मौलाना आझाद मंत्री असताना शिक्षण सचिव म्हणून काम केले. त्यांची आई उत्तर प्रदेशातील रामपूरच्या तत्कालीन राजघराण्याशी संबंधित होत्या. हमीद दिल्लीत वाढल्या आणि दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिका आणि कॅनडातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेतले.
दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले. हमीदा १९६७ ते १९८४ पर्यंत कॅनडात राहिल्या. तिथे त्यांनी अल्बर्टा विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. त्या १९८४ मध्ये १९८४ मध्ये त्या भारतात परतल्या आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सचिव झाल्या. परंतु, इंदिरा गांधी यांची काही महिन्यांनी हत्या झाल्याने त्या या पदावर जास्त काळ राहिल्या नाहीत, असे शिक्षणतज्ज्ञ मोहम्मद सज्जाद यांनी त्यांच्या ‘अ ड्रॉप इन द ओशन’ या आत्मचरित्रात नमूद केले आहे.
१९८८ मध्ये हमीद यांनी मौलाना आझाद यांच्यावर एक पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक कराचीच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केले. त्या काळात त्या एक स्तंभलेखिका म्हणून ओळखल्या जात होत्या. १९९७ ते २००० या काळात हमीदा राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) सदस्य होत्या. त्या पदावर त्यांची नियुक्ती तत्कालीन पंतप्रधान आय. के. गुजराल यांनी केली होती. २००४ ते २०१४ या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, हमीद नियोजन आयोगाच्या (आता तो नीती आयोग म्हणून ओळखला जातो) सदस्य होत्या. त्यांनी हैदराबाद येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाच्या कुलपती म्हणूनही काम केले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून हमीद यांनी ‘व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस’ आणि ‘माय वाइफ शाल बी हर्ड’ असे अहवाल तयार केले. २००० मध्ये त्यांनी ‘मुस्लीम वुमन्स फोरम’ सुरू केले. २००७ मध्ये यूपीए सरकारच्या काळात हमीदा यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले होते.