सतीश कामत

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भय्या सामंत यांनी इच्छा व्यक्त केल्यानुसार येथून त्यांना उमेदवारी मिळाली तर विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यापुढे तगडे आव्हान उभे राहणार आहे.

chavadi maharashtra politics maharashtra political crisis
चावडी: एका रात्रीत मनपरिवर्तन
in Yavatmal-Washim Constituency Uddhav Thackerays candidates will lose Due to the election symbol
‘धनुष्यबाण’ उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ठरणार नुकसानदायी; यवतमाळ-वाशीम मतदारसंघात…
narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
Harsimrat Kaur Badal
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू, तीन टर्म खासदार राहिलेल्या हरसिमरत कौर बादल यांना लोकसभेचे तिकीट मिळणार का?

या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राऊत हेच उमेदवार असणार, हे पूर्वीपासून सर्वमान्य आहे. पण राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अधिकृत निर्णय अजून झालेला नाही. मागील सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये येथून राऊत विजयी झाले आहेत. त्यांना या वेळी हॅटट्रिक साधण्याची संधी आहे. पण आधीचे दोन्ही विजय शिवसेना एकसंध असताना मिळालेले आहेत आणि आगामी निवडणूक मात्र, सुमारे दीड वर्षापूर्वी पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर होत आहे. त्यामुळे सगळी गणितं बदलली आहेत. या बदललेल्या परिस्थितीत घटक पक्षाचा पूर्वेतिहास पाहून उमेदवारी द्यायची, असं धोरण महायुतीच्या नेत्यांनी ठरवलं तर इथे शिंदे यांच्या शिवसेनेचा हक्क नैसर्गिकपणे निर्माण होतो आणि तशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण यांनी आपण उपलब्ध असल्याची भूमिका उघडपणे घेतली असल्याने त्यांची वर्णी लागू शकते. कारण लोकसभेची निवडणूक लढवण्याची क्षमता असलेला अन्य उमेदवार इथे शिंदे गटाकडे नाही.

हेही वाचा… बिद्री कारखान्यातील विजयाने के. पी. पाटील यांची विधानसभेची पायाभरणी, चंद्रकांत पाटील यांना धक्का

सुमारे दीड-दोन महिन्यांपूर्वी स्वतः पालकमंत्र्यांनी, आपले बंधू निवडणुकीत उतरले तर तीन लाख मतांनी निवडून येतील, अशा आशयाचं वक्तव्य करून या विषयाला प्रथम तोंड फोडलं. आपला इरादा सूचित करण्याबरोबरच स्थानिकांपासून पक्षश्रेष्ठींपर्यंत निरनिराळ्या पातळ्यांवर काय प्रतिक्रिया येते, हे अजमावण्याचाही हेतू त्यामागे होता. त्यावर स्वतः किरण सामंत यांनी, आपण अजून असा काही फार विचार केलेला नाही, अशी भूमिका घेत चेंडू मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात ढकलला. त्यानंतर गेले दोन महिने शिंदे गटाकडून येथे हेच एकमेव नाव चर्चेत राहिलं आणि त्याबाबत दोन्ही भावांच्या वक्तव्यांमध्येही फरक पडला नव्हता. पण गेल्या आठवड्यात किरण सामंतांनी सूर बदलत, पक्षाकडे अन्य काही पर्याय नसेल तर निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असं वक्तव्य करून आडवळणाने का होईना, विद्यमान खासदार राऊत यांच्याशी दोन हात करण्याची तयारी जाहीर केली आहे. तसं पाहिलं तर किरण यांनी आत्तापर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नसली तरी राजकारण त्यांना नवीन नाही. किंबहुना उदय सामंतांच्या गेल्या सुमारे २५ वर्षांच्या राजकीय प्रवासात तेही पडद्याआडून राजकारण करतच आले आहेत आणि त्यामध्ये अनेकदा ‘किंगमेकर’ची भूमिका यशस्वीपणे निभावली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून ते बॅनर किंवा सार्वजनिक व्यासपीठावर ठळकपणे दिसायला लागले. त्यामुळे त्यांची राजकीय आकांक्षा उघड होऊ लागली आणि आता तसा इरादा स्पष्ट करुन त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा… नवी मुंबईच्या पाणी वादाला शिंदे-नाईकांच्या संघर्षाची किनार ?

या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यांमधील सध्याच्या राजकीय चित्राचा आढावा घेतला तर अस दिसत की, रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी दापोली, चिपळूण व रत्नागिरी हे तीन, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी कणकवली व सावंतवाडी हे दोन, अशा एकूण आठपैकी पाच मतदारसंघांमध्ये सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत. त्याचा थेट लाभ त्यांच्या लोकसभा उमेदवाराला मिळणार आहे. लोकसभेची निवडणूक विधानसभा निवडणुकीपूर्वी असल्याने राज्यात सर्वत्र आमदार आणि इतर इच्छुकांना आपापल्या पक्षाच्या लोकसभा उमेदवारासाठी काम करण्याशिवाय गत्यंतर नाही, हा आणखी एक अप्रत्यक्ष लाभाचा मुद्दाही इथे लागू राहणार आहे. गेल्या सलग चारवेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत असलेले आणि गेली पाच वर्षे कॅबिनेट मंत्री राहिलेले उदय सामंत यांचं आमदार म्हणून कार्यक्षेत्र रत्नागिरी असलं तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शिवाय, सामंत कुटुंब मूळचं त्याच जिल्ह्यातील असल्याने तेथे त्यांचं व्यक्तिगत संबंधांचं पूर्वापार जाळं आहे. सिंधुरत्न योजनेचे सदस्य या नात्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शासकीय पातळीवरुनही त्यांचा वावर सुरु झाला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या अन्य स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांबरोबरच केंद्रीय मंत्री नारायण राणे पिता-पुत्रांनीही पाठिंब्याची हमी दिली आहे. गेल्या महिन्यात माजी खासदार नीलेश यांनी, मंत्री सामंत यांची मुंबईत घेतलेली सदिच्छा भेटही त्या दृष्टीने बरेच काही सूचक होती.

हेही वाचा… मिरजेत पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात ठाकरे गटात उमेदवारीवरून आतापासूनच संघर्ष

दुसरीकडे, निष्ठावान शिवसैनिकांची फौज हे खासदार राऊत यांचं मुख्य बलस्थान आहे. पण राज्याच्या अन्य भागांप्रमाणे इथेही सत्ताधाऱ्यांकडून ‘साम-दाम-दंड’चे प्रयोग जोरात चालू आहेत. त्यातच काहीजण लोभापायी, तर काहीजण इडीच्या भितीपोटी प्रतिपक्षाला मिळत आहेत. या लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे राजन साळवी आणि वैभव नाईक या दोन आमदारांमागेही चौकशीचा ससेमिरा लावून ठेवलेला आहे. शिवाय , सामंत बंधुंचे या गोटात काहीजणांशी पूर्वापार असलेले घनिष्ट संबंध या वेळी कामी येतील, असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. शिवसेना फुटण्यापूर्वी खुद्द खासदार राऊत यांच्या संपर्क कार्यालयासह आवश्यक सुविधांची काळजी सामंत बंधू घेत होते. त्या काळातील अनुभवातून प्रतिस्पर्ध्याचे बारकावे त्यांना माहित झाले आहेत. बदललेल्या परिस्थितीत हे राऊत यांच्यासाठी धोकादायक ठरलं आहे.

लोकसभा निकालानंतर दगाफटका होऊ नये म्हणून स्वतःचे हक्काचे खासदार जास्तीत जास्त निवडून आणण्याचं धोरण भाजपाने स्वीकारलं आहे. त्यामुळे याही मतदारसंघात एक तर किरण सामंतांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणं किंवा ही जागा शिंदे गटाला न देता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना येथून उमेदवारी देणं, अशाही पर्यायांची चर्चा चालू आहे. यापैकी भाजपामध्ये जाण्याची शक्यता खुद्द सामंतांनी फेटाळली आहे. आपण धनुष्य-बाण याच चिन्हावर निवडणूक लढवू इच्छितो, असं त्यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केलं. ते त्यावर ठाम राहिले तर चव्हाण किंवा अन्य कोणाला उमेदवारी देण्याचा धोका भाजपा पत्करेल का, हा प्रश्नच आहे. त्यामुळे अखेर खासदार राऊत विरूद्ध किरण सामंत अशी लढत झाली तर सामना रंगतदार होईल, यात शंका नाही.