ठाणे : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम असल्याने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून नवी मुंबईतील भाजप नेते संजीव नाईक यांना उमेदवारी नको असा आग्रह धरण्यास सुरुवात केली आहे. जाहीर कार्यक्रमांमधून ही जागा शिवसेनेलाच मिळायला हवी यासाठी आक्रमक भूमीका घेणाऱ्या पक्षातील ठाणे, नवी मुंबईतील नेत्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत ठाण्यासाठी शेवटपर्यत प्रयत्न कराच मात्र एक पाउल मागे जायची वेळ आलीच तर नाईकांऐवजी भाजपच्या ठाण्यातील नेत्यांसाठी आग्रह धरायला हवा, अशी भूमीका या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्याचे वृत्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे मानला जाणाऱ्या ठाणे लोकसभेच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे यांच्यासोबत आलेल्या १३ खासदारांपैकी काहींची उमेदवारी भाजपच्या दबावापुढे मुख्यमंत्र्यांना नाकारावी लागली आहे. ठाणे. नाशीक, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, संभाजीनगर, दक्षिण मुंबई या मतदारसंघावरुनही या दोन पक्षात रस्सीखेच सुरु आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून मु्ख्यमंत्री पुत्र डाॅ.श्रीकांत हेच उमेदवार असतील अशी घोषणा मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ठाण्याचा तिढा कायम असताना डाॅ.श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करुन उपमुख्यमंत्र्यांनी शिंदेसेनेची कोंडी आणखी वाढवली अशीच चर्चा मुख्यमंत्री समर्थकांमध्ये आहे. स्वत: श्रीकांत शिंदे यांनी अजूनही आपली अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि आमच्या पक्षाकडूनच ती होईल, अशी भूमीका घेत भाजपला अप्रत्यक्ष टोला लगाविल्याची चर्चा आहे. असे असताना ठाण्यासाठी गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांच्या नावाचा भाजपने धरलेल्या आग्रहामुळे शिंदेसेनेतील अस्वस्थता टोक गाठू लागली असून ठाणे शहरातील पक्षाच्या ठराविक नेते, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंबंधी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

केळकरांच्या भूमीकेचे स्वागत, ठाण्यासाठी आग्रह कायम

भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले. केळकर यांनी प्रथमच लोकसभा लढविण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपकडून ठाण्यासाठी संजीव नाईक यांचे नाव सतत चर्चेत असताना केळकर यांच्या भूमीकेचे शिंदे सेनेकडून स्वागतच करण्यात आल्याने मुख्यमंत्री समर्थकांची यासंबंधीची भूमीका स्पष्ट होऊ लागली आहे. ठाणे लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे जाता कामा नये आणि तशी वेळ आलीच तर उमेदवार हा ठाण्याचा असावा यासाठी प्रयत्न करा, असे आर्जव मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या पक्षातील ठाण्यातील काही नेत्यांनी केल्याचे सांगण्यात येते. नाईक का नकोत याविषयीच्या कारणांची सविस्तर मांडणीच या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे केल्याचे समजते.

हेही वाचा… काँग्रेससारखे डावे पक्ष अल्पसंख्याकांचे संरक्षण करू शकत नाहीत, केरळच्या IUML प्रमुखांना विश्वास

नाईकांची उमेदवारी विचारेंच्या पथ्यावर ?

गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून ठाण्यातील शिवसेनेशी त्यांचे कधीही सुर जुळलेले नाहीत. नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर आनंद दिघे यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी निर्णायक भूमीका बजावली होती. गेल्या काही वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले तरी नाईकांच्या मुलाच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांनाच रिंगणात उतरावे लागणे हे शिवसैनिकांना पचणार नाही, अशी भीती त्यांच्या निकटवर्तीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे व्यक्त केल्याचे समजते. ठाण्यातील शिवसेनेत संजीव नाईक यांच्या उमेदवारीचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील परंपरागत मतदार राजन विचारे यांच्या मागे उभा राहील अशी भीतीही या नेत्यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यातील भाजप नेत्यांसोबत शिवसेनेचे चांगले संबंध राहीले आहेत. मात्र नाईक पुत्राशी हे सुर जुळतील का असा सवालच या नेत्यांनी उपस्थित केला आहे. यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ती मिळू शकली नाही. ‘आम्ही आमची भूमीका मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. ही जागा शिवसेनेलाच मिळायला हवी’, अशी प्रतिक्रिया एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. ‘नाईकांना शिवसैनिक कसे स्विकारतील’, असा सवालही या नेत्याने केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For thane lok sabha elections shiv sena shinde group opposing sanjeev naik as a candidate print politics news asj
First published on: 16-04-2024 at 16:53 IST