लातूर : भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना डावलले व परभणी येथील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजयी झाले. संजय बनसोडे यांनी अजित दादा गटात प्रवेश केला व सध्या ते क्रीडामंत्री आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपची अजितदादा गटासोबत युती असल्यामुळे संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील त्यामुळे विधानसभेसाठी भाजपकडून आपल्याला संधी मिळणार नाही हे निश्चित झाल्यानंतर सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. महाविकास आघाडीत उदगीर ची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीर मध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे व शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांच्यात चांगलाच संघर्ष होईल अशी चिन्हे आहेत. उदगीर हा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला. मात्र, हा बालेकिल्ला भाजपने स्वतःहून उध्वस्त करून टाकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटातच विधानसभा निवडणुकीत सामना होईल आणि उदगीरमध्ये कमळ दिसणार नाही, असे चित्र आता निर्माण झाले आहे.

हेही वाचा…विधान परिषदेसाठी मतांचा कोटा कसा निश्चित केला जातो ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपीनाथ मुंडे खासदार आणि पंकजा मुंडे व सुधाकर भालेराव हे दोघे आमदार अशी मराठवाड्यात भाजपची स्थिती होती. गेल्या काही वर्षापासून सुधाकर भालेराव पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे हैराण होते. पालकमंत्री म्हणून संभाजी पाटील निलंगेकर काम करत असताना भाजपमध्ये निर्माण झालेल्या गटातटाच्या राजकारणावर भालेराव प्रकाश टाकत. आमदार अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वादाचे परिणाम जिल्ह्यातील संघटनेवर पडत असल्याची चर्चा सुरू होती. गेल्या काही महिन्यापासून सुधाकार भालेराव कोणत्या पक्षात जावे याचा शोध घेत होते. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा सुरू होती. आता मात्र त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.