लातूर- भाजपचे लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे हे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात दाखल झाले होते मात्र आता आपण काँग्रेस पक्षात नसल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

२०१९ ते २०२४ या कालावधीत सुधाकर शृंगारे हे भाजपचे खासदार होते. त्यापूर्वी ते वडवळ जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून जिल्हा परिषदेत कार्यरत होते. भाजपने तत्कालीन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना उमेदवारी नाकारत सुधाकर शृंगारे यांना २०१९मध्ये उमेदवारी दिली होती व त्यांनी पावणेतीन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने लातूर लोकसभा मतदारसंघात विजय संपादन केला होता. पाच वर्षाचा कारभार त्यांचा चांगला गाजला त्यांच्या कारभारावर जशी काँग्रेस पक्षाकडून टीका होती तशीच भाजपमध्येही अंतर्गत नाराजी होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली मात्र काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडून त्यांना दारून पराभव पत्करावा लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुधाकर शृंगारे यांच्या हा पराभव एवढा जिव्हारी लागला की विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी चक्क काँग्रेस पक्षात प्रवेश केला व मतदार संघातील विविध ठिकाणी जाऊन त्यांनी प्रचार सभेत भाजपवर सडकून टीका केली. मात्र याचा कसलाही परिणाम विधानसभा निवडणुकीत झाला नाही व लातूर शहर मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी काँग्रेसला अपयश आले. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुती भक्कम झाली. केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी महायुतीचे सरकार आले त्यामुळे कदाचित सुधाकर शृंगारे यांना आपली चूक कळलेली असावी. त्यामुळेच त्यांनी आपण काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्याचे सांगितले असावे. पुढे आपण काय करणार यासंबंधी त्यांनी अद्याप सुतोवाच केलेले नाही. लवकरच आपल्याला कळेल अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.