विजय पाटील

कराड : अजित पवारांचा सडेतोड बोलण्याचा स्वभाव सर्वश्रुत आहे. याचाच प्रत्यय कोयनानगर येथील विश्रामगृहाचे उद्घाटनप्रसंगी नुकताच सरकारी अधिकाऱ्यांनी तर घेतलाच पण याबाबत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही त्यांनी खडे बोल सुनावले. दर्जाहीन बांधकाम, त्यातील वाढीव खर्चासाठी केलेले उद्योग, सजावटीखाली चुकांवर घातलेले पांघरूण याची अजित पवारांनी पोलखोल केली आणि याबाबत अधिकारी-पदाधिकारी दोघांनाही धारेवर धरले.

कोयनानगर येथे दीड कोटी रुपये खर्चाच्या नव्या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन नुकतेच अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी उद्घाटन केल्यावर वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसमवेत ते या विश्रामगृहाची पाहणी करत होते. या वेळी सांगितले जात असलेल्या कौतुकापेक्षा त्यांचे लक्ष या बांधकामातील त्रुटींवरच अधिक होते. याच त्रुटी, दर्जाहीन बांधकाम, त्यातील वाढीव खर्चासाठी केलेले उद्योग, सोयीसुविधांची नेमकी गरज, त्यातील भोंगळपणा त्यांनी थेट उपस्थित लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिला. या वेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरताना व्यासपीठावरील उपस्थित मंत्री व खासदार, आमदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. कोयनेचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्या कार्यपद्धतीचा पवारांनी संतप्त शब्दांत समाचार घेतला. ‘जनतेच्या पैशाचे अशा कामातून वाटोळे करणाऱ्यांना नरकात पाठवा; तुम्हाला कामाची गुणवत्ता व लोकांच्या पैशाचे मूल्य समजायला हवे,’ असे सुनावताना, जिथे उत्तम काम होते त्याचे कौतुकच करतो. पण, जिथे दर्जाहीन कामे होतात तिथे उघडपणे कडक प्रतिक्रियाही व्यक्त करत असल्याचे सांगत अजितदादांनी कोयनानगरच्या शासकीय विश्रामगृहाच्या कामाच्या चौकशीचे आदेशही दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांना सार्वजनिक कामात बेबनाव बिलकुल खपत नाही. याबाबत यापूर्वी त्यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची उदाहरणे आहेत. अजित पवारांचा हा स्पष्टवक्तेपणा सामान्य लोकांना जेवढा भावतो तेवढाच अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मात्र तो कापरे भरायला लावणारा असतो.