Gujarat AAP Mla Chaitar Vasava Arrested : गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा पराभव करीत आम आदमी पार्टीने गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवला. दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर आपने थेट भाजपाच्या बालेकिल्ल्यातच विजय मिळवल्याने त्याची संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा झाली. मात्र, या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्या पार्टीसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. कारण पक्षाचे आमदार चैतर वसावा कायदेशीर कचाट्यात सापडले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या आमदाराला अटक कशामुळे केली? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…
विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीच्या गुजरातमधील आमदारांची संख्या पाच झाली आहे. यातील डेडीयापाडा (जि. नर्मदा) विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैतार वसावा यांना पोलिसांनी अटक केली आहे. मागील शनिवारी (ता. ५) भाजपाच्या एका स्थानिक नेत्याबरोबर झालेल्या वादातून ही अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सध्या आमदार वसावा हे तुरुंगात असून त्यांच्या सुटकेसाठी ‘आप’ व काँग्रेसचे नेते प्रयत्न करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार वसावा यांचा भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय वसावा यांच्याबरोबर गेल्या शनिवारी वाद झाला होता. डेडीयापाडा येथील बैठकीदरम्यान झालेल्या या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. याप्रकरणी पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या आमदाराविरोधात ‘खुनाचा प्रयत्न’ (Attempt to Murder) या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आमदार वसावा यांच्या अटकेनंतर काँग्रेसचे आदिवासी समुदायातील आमदार अनंत पटेल यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी राज्यातील सर्व आदिवासी संघटनांना एकत्रित येऊन सरकारविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. गुजरातमध्ये आप-काँग्रेसची युती नसली तरी दोन्ही पक्षाचे आमदार एकमेकांच्या मदतीला धावून जात असल्याचं दिसून येत आहे.
आणखी वाचा : कोट्यवधींची संपत्ती, दंगली भडकावण्याचे अनेक आरोप; निशिकांत दुबेंचा राजकीय प्रवास कसा आहे?
चैतार वसावा यांना गुजरातमध्ये मोठी लोकप्रियता
- गुजरातमधील आम आदमी पार्टीचे आक्रमक नेते म्हणून आमदार चैतार वसावा यांची ओळख आहे.
- आपल्या मतदारसंघात आणि इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये त्यांची पोलिसांबरोबर अनेकदा झटापट झालेली आहे.
- गेल्या ऑगस्टमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ दोन आदिवासी तरुणांच्या कथित हत्येच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते.
- डिसेंबरमध्ये एका नर्सिंग कॉलेज घोटाळ्याविरोधातही त्यांनी भाजपा सरकारविरोधात निदर्शने केली होती.
- काही महिन्यांपूर्वी आमदार चैतार वसावा यांनी भील समाजासाठी स्वतंत्र राज्य ‘भीलस्थान’ची मागणी केली होती.
- चैतार वसावा यांच्या लोकप्रियतेमुळे गेल्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना भरूच मतदारसंघातून उमेदवारी दिली.
- भरूच हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचा बालेकिल्ला मानला जात होता.
- त्यावेळी काँग्रेस व आपची युती असल्यामुळे या मतदारसंघातून चैतार वसावा यांना लोकसभेचं तिकीट मिळालं होतं.
नोव्हेंबर २०२३ मध्ये झाली होती अटक
नोव्हेंबर २०२३ मध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कथित हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार चैतार वसावा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. जानेवारी २०२४ मध्ये न्यायालयाने त्यांना अटीशर्तींसह जामीन मंजूर केला होता. या अटींनुसार आमदार वसावा यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील बहुतेक भागांमध्ये प्रवेश करता येत नव्हता, त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या पत्नी शकुंतला आणि मुलगी वर्षा यांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. एप्रिलमध्ये गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देत या भागात प्रवेश करण्याची परवानगी दिली होती.

लोकसभा निवडणुकीत चैतार वसावा पराभूत
गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत चैतार वसावा यांना पराभवाचा सामना करावा लागला. भरूच मतदारसंघातून भाजपाचे अनुभवी नेते मनसुख वसावा हे सलग सातव्यांदा विजयी झाले. मात्र, असं असलं तरीही अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात चैतार यांनी मनसुख यांना कडवी झुंज दिली होती. आमदार चैतार वसावा यांनी अतिशय संघर्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी भरुचमधील एका कॉलेजमधून ग्रामीण अभ्यासात पदवी घेतली आणि त्यानंतर छोटे-मोठे उद्योग करत डेडियापाडा तालुक्यातील आदिवासींना सरकारी योजनांचे फॉर्म भरण्यास मदत करण्याचे काम सुरू केले.
हेही वाचा : भाजपासाठी धोक्याची घंटा? मंत्र्यानेच दिला पराभवाचा गंभीर इशारा; कारण काय?
ग्रामसेवक ते आमदार – चैतार वसावा यांची कारकीर्द
२०१२ मध्ये चैतार हे उमरपाडा (जिल्हा सूरत) येथील कृषी विभागाच्या कार्यालयात ग्रामसेवक म्हणून रुजू झाले. काही काळ काम केल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांचे निकटवर्तीय माधव वसावा सांगतात, “चैतार यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती आणि २०१५ मध्ये ते महेश वसावा यांच्या संपर्कात आले व जनता दल (युनायटेड) मध्ये सहभागी झाले. २०१२ व २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत महेश वसावा निवडून आले. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक प्रचाराची जबाबदारी चैतार यांच्याकडे सोपवली होती. मिळालेली जबाबदारी चैतार यांनी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली होती.”
२०२२ मध्ये ‘आप’च्या तिकिटावर मिळवला विजय
माधव वसावा पुढे सांगतात, “२०२२ मध्ये महेश वसावा यांनी जनता दल युनायटेडला सोडचिठ्ठी दिली व स्वत:च्या भारतीय आदिवासी पार्टीची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीबरोबर युती करण्याचे जाहीर केले होते, मात्र चर्चा अपयशी ठरल्याने महेश यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरवले. त्यानंतर चैतार वसावा यांनी महेश यांची साथ सोडून अरविंद केजरीवाल यांच्या पार्टीत प्रवेश केला. २०२२ मध्ये डेडियापाडा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.” दरम्यान, चैतार वसावा यांना जाणून बुजून अडकवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माधव यांनी केला आहे. काँग्रेसचे इतर नेतेही त्यांच्या सुटकेचा प्रयत्न करीत आहेत.