नागपूर : गुजरात पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केले आणि इंजेक्शन दिले असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. ते आज सुरतहून नागपुरात दाखल झाले. यावेळी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सुरत गाठली. त्यांच्यासोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख होते. देशमुखांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सुरत येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, आमदार देशमुख यांनी त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगून त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल करून चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याचा आरोप केला आहे. मला हृदय विकाराचा त्रास झालेला नाही. पण तशी तेथील लोकांनी बतावणी केली. २० ते २५ जणांनी पकडून मला इंजेक्शन दिले. ते कशाचे होते, याची कल्पना देखील देण्यात आली नाही. हे माझ्या शरीरावर चुकीची प्रक्रिया करण्याचे षडयंत्र होते, असा आरोपही नितीन देशमुख यांनी केला.