गुजरात विधानसभेच्या निवडणुका या वर्षी डिसेंबरमध्ये पार पडणार आहे. त्यादृष्टीने सर्व पक्ष कामाला लागले आहेत. भाजपाही या निवडणुकीच्या तयारीनिशी मैदानात उतरली आहे. भाजपापुढे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे आव्हान असणार आहे. त्यात, आता गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका कार्यक्रमात बोलताना सीआर पाटील यांनी सांगितलं की, “भाजपा सत्तेवर आल्यास भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. तसेच, आगामी निवडणुकीच्या तिकीट वाटपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह निर्णय घेतील. मी सर्व उमेदवारांची माहिती त्यांच्याकडे दिली आहे,” असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – राज्यातील महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपची तीन दिवस चिंतन बैठक

गेल्या वर्षी विजय रुपाणी यांच्याजागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. १३ सप्टेंबर २०२१ साली मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले भूपेंद्र पटेल वादविवाद आणि माध्यमांच्या प्रसिद्धीपासून लांब आहेत. जे भाजपाच्या फायद्याचे आहे. “अहमदाबामधील घाटलोडिया येथून पहिल्यांदा आमदार झाल्यापासून ते मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापर्यंत त्यांनी चांगले काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्याजागी दुसऱ्या कोणाचा विचार कशाला करायचा,” असे एका भाजपा नेत्याने ‘इंडियन एक्सप्रेस’ला म्हटलं.

हेही वाचा – शिंदे गटाकडे निवडणूक चिन्हच नसल्याने अंधेरी पोटनिवडणूक भाजपच लढणार

मात्र, निवडणुका जवळ आल्याने भाजपाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सातत्याने बदलणे त्यांच्या पथ्यावर पडू शकते. रुपाणी यांची हकालपट्टी करणे पक्षासाठी सोपे होते. मात्र, पटेल यांच्यारूपाने भाजपा राज्यातील सत्तेला स्थिरता देण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा – झाकोळलेल्या ‘भारत जोडो’ला राहुल गांधी यांच्या पावसातील सभेने उभारी

भूपेंद्र पटेल यांची विजयाची घौडदौड

भूपेंद्र पटेलांच्या नेतृत्वाखाली भाजपाने गांधीनगर महापालिका आणि सुमारे ९००० हजार ग्रामपंचायत निवडणुकीत दमदार कामगिरी केली. गांधीनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने ४४ पैकी ४१ जागांवर आपला पाय रोवला. तर, राज्यातील ७० टक्के अधिक ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष भाजपाला आव्हान देत आहे. त्यासाठी भूपेंद्र पटेल यांच्या पाठीशी मोदी-शाह यांची जोडगोळी असेल. सौराष्ट्रमधील एका पाटीदार भाजपा नेत्याने म्हटलं की, “निवडणुकीत काय होईल, याबाबत कोणाला माहिती नाही. मात्र, राज्यात पाटीदार आरक्षणाच्या प्रश्नावर कोणतेही आंदोलन करण्यात आलं नाही. तसेच, अन्य जातीचे लोकही आनंदी आहेत. प्रत्येकाला राज्यात सामजिक सलोखा हवा आहे.”

“भाजपा हायकमांडने रात्री फोन करुन राजीनामा द्या अन्….”

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होऊन एक वर्ष झाल्यानंतर विजय रुपानी यांनी काही दिवसांपूर्वी मोठा खुलासा केला आहे. भाजपा हायकमांडने आदल्या रात्रीच आपल्याला राजीनामा देण्यास सांगितलं होतं, अशी माहिती त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. “मला आदल्या रात्री त्यांनी सांगितलं, आणि दुसऱ्या दिवशी मी राजीनामा सुपूर्द केला,” असं ते म्हणाले. विजय रुपानी यांनी ११ सप्टेंबर २०२१ ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

“मी त्यांना कारणही विचारलं नाही, त्यामुळे त्यांनीही सांगितलं नाही. मी विचारलं असतं तर त्यांनी नक्कीच सांगितलं असतं. पण मी नेहमीच एक शिस्तबद्ध कार्यकर्ता राहिलो आहे. पक्षाने मला जे काही सांगितलं ते मी नेहमीच केलं आहे. पक्षानेच मला मुख्यमंत्री केलं होतं. पक्षाने मला आता नवे मुख्यमंत्री येणार असल्याचं सांगितलं आणि मी आनंदाने तयार झालो,” असं विजय रुपानी म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat assembly election why bhupendra patel first choice of cm post among changing faces ssa
First published on: 03-10-2022 at 19:45 IST