Haryana Election : हरियाणा राज्यात सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. ५ ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असून आता ठिकठिकाणी सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दरम्यान, हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेल्यांपैकी अनेक उमेदवार कोट्यधीश आहेत. विधासभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक प्रतिज्ञापत्रामधून उमेदवारांची संपत्ती समोर आली आहे. यामध्ये उमेदवारांकडे किती गाड्या आहेत? उमेदवारांची संपत्ती किती आहे? उमेदवारांकडे सोने-चांदी किती आहे? यासह आदी माहिती समोर आली आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आणि इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हरियाणात निवडणुकीच्या मैदानात असलेल्या राजकीय घराण्यातील उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) प्रमुख दुष्यंत चौटाला आहेत. दुष्यंत चौटाला हे उचाना कलान मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. दुष्यंत चौटाला यांनी १२२.४८ कोटी रुपयांची मालमत्ता घोषित केली आहे. ४४.०३ कोटी जंगम आणि ७८.५४ कोटी रुपये स्थावर मालमत्ता आणि शेतीसह व्यवसाय हे उत्पन्नाचे स्रोत असल्याचं त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. त्यांच्याकडे टोयोटा, फॉर्च्युनरसह काही अलिशान गाड्या देखील आहेत. तसेच दुष्यंत चौटाला यांच्या पत्नीकडे एकत्रितपणे ४.१४ कोटी रुपयांचे ५.६ किलो सोने आणि २.६३ कोटी रुपयांचे हिरे असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा : Parliamentary Standing Committee : काँग्रेसला मिळाल्या संसदेच्या चार स्थायी समित्या, सत्ताधाऱ्यांबरोबरच्या वाटाघाटीत मोठं यश

दुष्यंत चौटाला आणि दिग्विजय चौटाला यांचे चुलत भाऊ आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे नेते अभय चौटाला यांचा मुलगा अर्जुन चौटाला हे रानिया मतदारसंघामधून निवडणुकीच्या मैदानात आहेत. अर्जुन चौटाला यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात शेती आणि व्यवसाय हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत असल्याचं नमूद केलं आहे. त्यामध्ये त्यांनी ४५.९८ कोटी रुपयांची आपली मालमत्ता असल्याचं घोषित केलं आहे. त्यांच्याकडे हमर ही अलिशान गाडी आणि त्यांच्या पत्नीकडे एकत्रितपणे २ कोटी रुपये किमतीचे २.८ किलो सोने आणि ३.९ कोटी रुपये किमतीचे हिरे असल्याचं म्हटलं आहे. तसेच तोशाम मतदारसंघाचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची नात श्रुती चौधरी यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडे एक बीएम डब्लू कार आहे. तसेच श्रुती चौधरी आणि त्याचे पती यांच्याकडे मिळून १०.९५ किलो सोने आणि १०.०९ कोटी रुपयांची चांदी आहे. त्यांनी १०४.३२ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यापैकी ४४.११ कोटी रुपये व्यवहारात असल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांची मुलगी आरती हिने ६८.२६ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे, तर भाजपाच्या अटेलीच्या उमेदवार आरती यांच्याकडे १.२९ कोटी रुपयांचे १.९ किलो सोने आणि १०.६९ लाख रुपयांचे दागिने आहेत. तसेच काँग्रेसचे राज्यसभा खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांचा मुलगा आणि उमेदवार आदित्य सुरजेवाला यांनी २९.०९ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या पत्नीसह ९१.२५ लाख रुपयांचे सोने आणि दागिने आहेत. त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत व्यवसाय आहे. माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे नातू भव्य बिश्नोई यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. परंतु त्यांच्या पत्नीसह भाजपाच्या आदमपूरच्या उमेदवाराकडे १.०५ कोटी रुपये १.४ किलो सोने आहे. काँग्रेसचे पंचकुलाचे उमेदवार आणि भजन लाल यांचा मुलगा चंद्र मोहन यांनी ८०.४७ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ कार आहे. तसेच बँकेचे व्याज आणि पेन्शन हे उत्पन्नाचे स्त्रोत असल्याने चार वेळा आमदार असलेल्या त्यांच्या पत्नीसह एकत्रितपणे ८५ लाख रुपयांचे १.१ किलो सोने असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा : मोदी सरकार ‘एक देश एक निवडणूक’ लागू करण्याची शक्यता; अल्पमतात असलेल्या भाजपाला एनडीएतील घटकपक्षांचा पाठिंबा मिळणार?

माजी केंद्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मुलगा ब्रिजेंद्र सिंह यांच्यासह भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिसारचे माजी खासदार ब्रिजेंद्र सिंह हे दुष्यंत यांच्या विरोधात उचाना कलांमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने २६.७३ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये टोयोटा फॉर्च्युनर लिजेंडर आणि इनोव्हासह इतर वाहनांचा समावेश आहे. तसेच त्यांच्याकडे १८.७५ लाख रुपयांचे सोने आणि हिरे आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी कोषाध्यक्ष आणि बन्सीलाल यांचे नातू अनिरुद्ध चौधरी यांच्याकडे २१.३३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच टोयोटा फॉर्च्युनर आणि टोयोटा इनोव्हा व्यतिरिक्त ५५.५७ लाख रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने समाविष्ट आहेत. तोशाम काँग्रेस उमेदवाराने व्यवसाय, सल्लागार आणि कंपन्यांमधील संचालकपद हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत असल्याचं नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐलनाबादचे उमेदवार अभय सिंह चौटाला ज्यांनी ६१.०१ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्याकडे दोन टोयोटा लँड क्रूझरसह सात वाहने २.०७ कोटी रुपयांचे २.९ किलो सोने आणि ४५ लाख रुपयांचे हिरे आहेत. रानियामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे माजी मंत्री रणजित सिंह चौटाला यांनी एकूण २३.९८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. देवीलाल यांच्या मुलाकडे फोर्ड एंडेव्हर आणि टोयोटा फॉर्च्युनर याशिवाय ६१ लाख रुपयांचे सोने आणि चार म्हशी आणि तीन गायी आहेत. तसेच शेती, पगार आणि पेन्शन असा त्यांचा उत्पन्नाचा स्रोत त्यांनी सांगितला आहे.