सिद्धेश्वर डुकरे

मुंबई: सामान्यतः लोक ६० व्या वर्षी तर, भाजपमध्ये नेते ७५ वर्षानंतर निवृत्त होतात. पण तुमचे वय आता ८३ वर्षे झाले. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही, असा सवाल करीत अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला. पण याच अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, रामराजे नाईक निंबाळकर हे ७५ वयाच्या घरातील नेते कसे चालतात, असा सवाल आता केला जात आहे.

शरद पवार यांना वय झाल्याने थांबण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवार यांनी भाजपमधील नेतेमंडळींचे उदाहरण दिले. ७५ वर्षांचा निकष लागू करायचा झाल्यास ७६ वर्षांचे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अजित पवार यांनी शिफारस का केली होती ? रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची आता विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. रामराजेही ७५च्या घरात आहेत. मग रामराजे कसे चालतात ? शरद पवार यांना सल्ला देणाऱ्या अजित पवार यांनी हाच निकष छगन भुजबळ यांच्याबाबत लावायला हवा होता, अशीही चर्चा राष्ट्रवादीत सुरू झाली आहे.

हेही वाचा… भुजबळ काका-पुतणे पुन्हा केंद्रस्थानी

अजित पवार यांनी आपल्या आठ सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. मुंबईत झालेल्या शक्तिप्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोरल्या पवारांनी राजकारणातून निवृत्त होवून आशीर्वाद द्या, असे आवाहन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी शपथ घेतलेल्या अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या त्यांच्या सहकार्यांच्या वयाचा विचार केला तर छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर यांनी सत्तरी केव्हाच पार केली आहे. तर हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील हे सत्तरीला आले आहेत. खुद्द अजित पवार यांनी वयाची साठी पार केली आहे.

हेही वाचा… राष्ट्रवादीतल्या फुटीचे परभणी जिल्ह्यात पडसाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शपथ घेतलेल्या मंत्र्यांत छगन भुजबळ ७६ , हसन मुश्रीफ ६९ , दिलीप वळसे ६७ वर्षांचे,अजित पवार ६३ वर्षांचे, धर्मरावबाबा आत्राम ५६ वर्षांचे,अनिल पाटील ५४ वर्षांचे , संजय बनसोडे ४९ वर्षांचे, धनंजय मुंडे ४७ वर्षांचे तर आदिती तटकरे ३५ वर्षांच्या आहेत. मंत्रिमंडळात सर्वांत तरूण चेहरा म्हणून आदिती तटकरे आहेत तर सर्वांत ज्येष्ठ छगन भुजबळ आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे ६७ वर्षांचे आहेत. तर प्रफुल्ल पटेल यांचे वय सध्या ६६ वर्षे आहे.