हिमाचल प्रदेशमधील माजी काँग्रेस आमदाराने स्वतःच्या वडिलांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. पिता-पुत्राच्या या वादाने हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकार अडचणीत सापडले आहे. माजी आमदार आणि माजी मुख्य संसदीय सचिव नीरज भारती यांनी १९ जून रोजी सोशल मीडियावर त्यांच्या वडिलांच्या राजीनाम्याची मागणी करणारी एक पोस्ट लिहिली होती. त्यांनी आपल्या वडिलांवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. मात्र, काही वेळाने त्यांनी ही पोस्ट डिलीट केली, त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला आहे. नीरज भारती यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. पिता-पुत्रातील हा वाद नक्की काय आहे? त्यामुळे काँग्रेस सरकार अडचणीत कसे सापडले? त्याविषयी जाणून घेऊयात.
प्रकरण काय?
- नीरज भारती आणि राज्यमंत्री चंदर कुमार या पिता-पुत्रांमधील वाद सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या सरकारसाठी नवा धक्का आहे, कारण सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यामुळे त्यांचे सरकार आधीच संकटात सापडले आहे.
- चंदर कुमार यांनी मुलाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली असून तो नैराश्यामुळे असे बोलत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हेदेखील मान्य केले की, सुरू असलेल्या बदल्यांमुळे सरकारसाठी प्रशासकीय आव्हाने निर्माण होऊ शकतात.
- चंदर कुमार म्हणाले, “त्यांचे प्रश्न सोडवण्यात आले आहेत आणि मुख्यमंत्री सुक्खू माझ्या मुलाशी बोलले आहेत.”
- परंतु, नीरज भारती यांनी पुन्हा २० जून रोजी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांनी या पोस्टमध्ये ही लढाई केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी असल्याचे म्हटले.
- त्यांनी पुढील विधानसभा निवडणूक वडिलांविरोधात लढवण्याचीही तयारी दर्शवली.

त्याच दिवशी नीरज भारती मुख्यमंत्री सुक्खू यांची भेट घेण्यासाठी सिमला येथे पोहोचले. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांना भेटणे शक्य झाले नाही. ते म्हणाले, “मी विकासाच्या विरोधात नाही. काही लोक बदल्या आणि पोस्टिंगसारख्या किरकोळ कामांसाठी पैसे घेत आहेत, याबद्दल मी चिंतेत आहे.. हेच एकमेव कारण आहे की, मी माझ्या वडिलांना राजीनामा देण्यास सांगितले. मला आशा आहे की, मी रविवारी मुख्यमंत्र्यांची भेटू घेऊ शकेन,” असेही ते म्हणाले. कुमार यांनी एक व्यक्ती बदल्या करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. ही व्यक्ती गेल्या वर्षी झालेल्या हाय-प्रोफाइल देहरा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुक्खू यांच्याबरोबर दिसली होती. कुमार यांनी त्या व्यक्तीवर त्यांचा मतदारसंघ जावळीमध्येही हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. २०१२ ते २०१७ दरम्यान जावळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांच्या मुलाने केले होते.
रविवारी संध्याकाळी भारती यांनी त्यांच्या पत्नीसह सुक्खू यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी दावा केला की, मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थांच्या विरोधात चौकशी आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, समन्वयाच्या अभावामुळे निर्माण झालेले गैरसमज आणि मतभेद दीर्घ आणि सकारात्मक चर्चेनंतर दूर झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जावळी विधानसभा मतदारसंघातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील अशी हमी दिली आहे,” असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, या घटनेमुळे प्रशासकीय निर्णय आणि पॉवर कॉरिडॉरमध्ये प्रवेश नसल्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमधील निराशा दिसून येते. मात्र, सुक्खू यांचे प्रमुख माध्यम सल्लागार नरेश चौहान म्हणाले की, प्रत्येक मंत्री त्याच्या इच्छेनुसार काम करण्यास स्वतंत्र आहे.
भाजपाची काँग्रेस सरकारवर टीका
या वादानंतर भाजपाने मुख्यमंत्री सुक्खू यांच्यावर टीका केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांनी मुख्यमंत्री एकटे काम करत असल्याचा आणि हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “काँग्रेस सरकारमध्ये जे घडत आहे त्याचे मला आश्चर्य वाटत नाही. कोणते मंत्री सुक्खू यांच्यावर खूश आहेत? २०२३ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांना त्यांच्या वडिलांचा आणि सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्र सिंह यांचा पुतळा बसवण्याची परवानगी न दिल्याने त्यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली होती, हे प्रत्येकाला माहीत आहे,” असे ते म्हणाले. मात्र, आरोप फेटाळत सुक्खू यांचे प्रमुख माध्यम सल्लागार नरेश चौहान म्हणाले, २०२३ मध्ये सरकार पाडण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याने भाजपा निराश आहे.
नीरज भारती यांची वादग्रस्त वक्तव्ये
नीरज भारती आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे यापूर्वीही चर्चेत आले आहेत. जून २०२० मध्ये त्यांनी गलवानमध्ये भारत आणि चीनमधील संघर्षादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. त्यांच्या पोस्टमुळे त्यांना देशद्रोहासह कठोर आरोपांमुळे तुरुंगात जावे लागले. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. दोन वर्षांनंतर, फेब्रुवारी २०२२ मध्ये धर्मशालाचे आमदार सुधीर शर्मा यांना सोशल मीडियावर चर्चेसाठी आव्हान दिल्यानंतर भारती चर्चेत आले होते. या पोस्टमुळेदेखील त्यांना ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल केलेल्या कथित अपमानास्पद टीकेमुळे भारती पुन्हा एकदा चर्चेत आले होते. भारती यांच्या त्या वक्तव्याचा त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनीही विरोध केला होता. दुसरीकडे ‘चाचा चौधरी’ म्हणून प्रसिद्ध असलेले आणि सातत्याने त्यांचे मत व्यक्त करणारे चंदर कुमार यांचे सुक्खू सरकारशीही मतभेद राहिले आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये बरखास्त केलेल्या जिल्हा आणि ब्लॉकस्तरीय काँग्रेस युनिट्सची पुनर्रचना करण्याचे आवाहन त्यांनी केले होते आणि हिमाचल काँग्रेसचे वर्णन ‘पॅरलाइज्ड’ युनिट असे केले होते. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी कांग्रामध्ये पर्यटन गाव स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला जाहीरपणे विरोध केला. तसेच विधानसभेत त्या विरोधात मतदानही केले.