हैदराबादमधील मंगलहाट पोलिसांनी भाजपा आमदार ठाकूर राजा सिंह यांना औपचारिक नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये त्यांना राज्याद्वारे मंजूर सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्याविरोधात इशारा देण्यात आला आहे. त्यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने पोलिसांनी त्यांना अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? कोण आहेत ठाकूर राजा सिंह? त्यांच्याविषयी जाणून घेऊ…

पोलिसांनी नोटीस बजावत काय आवाहन केले?

  • १ जूनला बजावण्यात आलेल्या नोटिशीमध्ये गोशामहल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार ठाकूर राजा सिंह यांना सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • त्यांना बुलेटप्रूफ वाहन वापरण्याचे आणि चार नियुक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांना सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • त्या नोटिशीमध्ये, “पुन्हा एकदा तुम्हाला बुलेटप्रूफ वाहनाचा वापर करून स्वतःचे संरक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे. सरकारने नियुक्त केलेल्या (१+४) सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वापर करावा”, असेही म्हटले आहे.
  • त्यामध्ये सिंग यांच्या जीवाला धोका असल्याच्या चिंतेचा उल्लेख करण्यात आला आहे.
जूनला बजावण्यात आलेल्या नोटिशीमध्ये गोशामहल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार ठाकूर राजा सिंह यांना सुरक्षा व्यवस्थेबाबतच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

वारंवार धमक्या आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग यांना वारंवार धमकीचे कॉल येत आहेत; परंतु तरीही ते त्यांच्याबरोबर संरक्षकांना न घेताच संवेदनशील भागांतून फिरत आहेत आणि त्यामुळेच खबरदारीच्या उपाययोजनांचे उल्लंघन होत होते. “तुम्हाला पुन्हा एकदा इशारा देण्यात येत आहे की, तुम्हाला वारंवार धमकीचे कॉल येत आहेत आणि आमच्या असे लक्षात आले आहे की, तुम्ही अनेकदा कोणत्याही सुरक्षा कर्मचाऱ्याशिवाय निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पडत आहात. तसेच सांप्रदायिकरीत्या अत्यंत संवेदनशील भागात फिरत आहात. त्यातून तुमचे जीवनाप्रति आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते,” असे नोटिशीमध्ये म्हटले आहे.

३१ मे रोजी सिंग यांनी संध्याकाळी ५ ते ७ वाजण्यादरम्यान तलबकट्टा, भवानी नगर, इंजनबोली, बाबा नगर, बहादुरपुरा, संतोष नगर, याकुतपुरा, गोलकोंडा व जिरा येथे भेट दिली. या सर्व ठिकाणांना कायदा अंमलबजावणी संस्थांनी संवेदनशील क्षेत्र असल्याचे म्हटले आहे.

सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका

पश्चिम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आमदारांनी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे अपेक्षित आहे. या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने केवळ त्यांचे जीवनच धोक्यात येत नाही, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यावरील भारही वाढतो.” पुढील कारवाई आणि देखरेखीकरिता हैदराबाद शहर पोलिस आयुक्तांना या नोटिशीची प्रत सादर करण्यात आली आहे.

जीवे मारण्याच्या धमक्यांमागील कारण

ठाकूर राजा सिंह यांना बकरी ईदपूर्वी फोन करून धमक्या दिल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. “बकरी ईद ७ जून रोजी आहे. आम्हाला या सणाची अडचण नाही. परंतु, जर कोणी गोमाता, त्यांचे बछडे किंवा नंदीची कत्तल केली, तर आम्ही विरोध करू,” असे ठाकूर राजा सिंह यांनी म्हटले आहे. त्यांनी धमकी देणाऱ्यांनाही इशारा दिला आहे. “तुम्ही चुकीच्या व्यक्तीला धमकावत आहात. आम्हाला भीती नाही. तुमच्यात हिंमत असेल, तर समोर या”, असेही त्यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत ठाकूर राजा सिंह?

ठाकूर राजा सिंह यांना टी. राजा सिंह म्हणूनदेखील ओळखले जाते. अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते चर्चेत आले आहेत. टी. राजा सिंह तेलंगणातील गोशामहल मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. त्यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी त्यांनी तेलुगू देसम पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. हैदराबादमध्ये ते त्यांच्या गोरक्षण अभियानासाठी ओळखले जातात. प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.