I love Muhammad Controversy उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये बारावफात (ईद मिलाद-उन-नबी)निमित्त ‘आय लव्ह मुहम्मद’चे बॅनर लावल्यावरून वाद निर्माण झाला. मात्र, या वादाची ठिणगी देशभरात पोहोचली. उन्नाव, बरेली, गोध्रा, लखनौ, काशीपूर यांसारख्या शहरांमध्ये आंदोलने करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले, पोलिसांशी चकमक झाली आणि अनेकांना अटकही झाली. आता हिंसा भडकवण्याच्या आरोपाखाली स्थानिक धर्मगुरू आणि इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (आयएमसी) चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा खान यांना इतर आरोपींसह अटक करण्यात आली असून, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोण आहेत मौलाना तौकीर रझा खान? त्यांना या हिंसेचा सूत्रधार का मानले जात आहे? जाणून घेऊयात…
हिंसा भडकवणाऱ्या धर्मगुरूला अटक
बरेली पोलिसांनी ६५ वर्षीय तौकीर रझा यांच्यावर हिंसेचा कथित सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. बरेलवी सुन्नी समुदायाचे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व असलेले तौकीर यांचे बरेली विभागातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रावर मोठे वर्चस्व आहे. ते बरेलवी पंथाचे संस्थापक अहमद रझा खान यांचे वंशज आहेत, ज्यांना ‘आला हजरत’ या नावाने ओळखले जाते. ते मौलाना सुब्हान रझा खान यांचे धाकटे बंधू आहेत, जे अहमद रझा खान यांच्या दर्ग्याचे ‘गद्दी नशीन’ (संरक्षक) आहेत.

तौकीर यांचा राजकीय प्रवास
तौकीर यांचे वडील रेहान खान यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून काम केले होते. तौकीर दोन दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत. २००१ मध्ये त्यांनी आपला स्वतःचा राजकीय पक्ष ‘आयएमसी’ सुरू केला. ‘आयएमसी’ला बरेलीबाहेर फारशी ओळख मिळाली नसली तरी शहरात या पक्षाने आपला प्रभाव कायम ठेवला आहे. आयएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रवक्ते नफीस खान यांच्या म्हणण्यानुसार, तौकीर यांनी कधीही कोणत्याही मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षात प्रवेश केला नसला तरी, त्यांनी वर्षानुवर्षे अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांना पाठिंबा दिला आहे.

‘आयएमसी’ने २००१ च्या बरेली महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदा नशीब आजमावले आणि अनेक जागा जिंकल्या. मात्र, त्यानंतर हा पक्ष आपला विस्तार करू शकला नाही. पुढील वर्षांमध्ये तौकीर यांनी उत्तर प्रदेशातील विविध पक्षांना आपल्या पक्षाचा पाठिंबा दिला. २००७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला; परंतु नंतर त्यांनी समाजवादी पक्षाशी (सपा) हातमिळवणी केली. एका टप्प्यावर त्यांनी बहुजन समाज पक्षाला (बीएसपी)देखील समर्थन दिले होते. त्यावरून मौलाना तौकीर रझा खान यांचा उत्तर प्रदेशच्या राजकारणातील सततचा प्रभाव आणि धोरणात्मक भूमिका अधोरेखित होते.
‘आयएमसी’ने २०१२ ची विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात त्यांनी १२ जागांवर आपले उमेदवार उभे केले. या पक्षाने भोजिपुरा मतदारसंघात एक जागा जिंकली होती, जिथे त्यांचे उमेदवार शाझिल इस्लाम यांनी समाजवादी पक्षाचे वीरेंद्र सिंग गंगवार यांचा पराभव केला होता. त्यानंतर रझा यांना तत्कालीन अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाच्या सरकारने उत्तर प्रदेश हँडलूम कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते, हे पद राज्यमंत्र्याच्या दर्जाचे होते. परंतु, २०१४ च्या सप्टेंबरमध्ये अखिलेश सरकारला २०१३ च्या मुझफ्फरनगर दंगली रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करीत त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.

त्यांच्याभोवतीचे वाद
तौकीर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वादांमध्ये अडकले आहेत. शुक्रवारी दाखल झालेल्या १० पैकी सात प्रकरणांमध्ये बरेली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, ज्यात त्यांच्या भाषणातून मुस्लीम समुदायाला चिथावणी देण्याचा कथित प्रयत्न आणि इतर आरोप समाविष्ट आहेत. त्यांना अटक करून, तुरुंगात पाठविण्यात आल्याची ही दुसरी वेळ आहे. २०१० मध्ये मायावतींच्या नेतृत्वाखालील बसपा सरकारच्या कार्यकाळात, ईद मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान लोकांना हिंसाचार करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बरेली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यात अनेक लोक जखमी झाले होते आणि वाहने, तसेच दुकानांचे नुकसान झाले होते.

त्यानंतर बरेलीतील सांप्रदायिक तणाव कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावरील तपास बंद करून न्यायालयात अहवाल दाखल केला आणि त्यांना क्लीन चिट दिली. मार्च २०२३ मध्ये मोरादाबाद पोलिसांनी त्यांच्यावर शहरातील एका सभेतील ‘हिंदू राष्ट्र’ संबंधित वक्तव्यावरून समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवल्याबद्दल एफआयआर दाखल केला. ‘हिंदू राष्ट्रा’चा पुरस्कार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.
त्याच वर्षी हरियाणात कथित गोरक्षकांनी दोन मुस्लीम तरुणांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ त्यांनी ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्याची योजना जाहीर केल्यानंतर बरेली पोलिसांनी तौकीर यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले होते. त्यांनी मशिदी आणि मदरशांसाठी वाढीव सुरक्षेची मागणी केली होती आणि समुदायांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदू संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
जून २०१५ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून गोहत्याबंदीची मागणी करून वाद निर्माण केला होता. २०२२ मध्ये त्यांच्या नातेवाईक आणि महिला हक्क कार्यकर्त्या निदा खान यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे तौकीर पुन्हा चर्चेत आले होते.