कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी कडून जय्यत तयारी केली जात आहे. प्रभाग आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्याचा कोंडी करण्याचे, त्याला वाटेतून दूर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्य लढत सुरू होण्यापूर्वी प्यादी पद्धतशीर हलवण्यास सुरुवात केली असून त्यातून शह- काटशहाचे राजकारण रंग भरत आहे.
राज्यातील श्रीमंत नगरपालिका असा इचलकरंजीचा लौकिक होता. जकात बंद झाल्यानंतर पालिकेचा आर्थिक आवेग मलूल होत गेला. याचवेळी ती टक्केवारीच्या खाबुगिरीमुळे बदनाम होत गेली. महापालिका स्थापन होऊन तीन वर्षे झाली तरी प्रगतीचा निर्देशांक उंचावणे तर राहोच पण किमान स्वास्थ लाभणारे नागरी चित्र अद्याप तरी नगरवसियांच्या या नजरेला पडलेले नसल्याचा सुर आहे. निवडणूक प्रक्रियेला गती येवू लागल्याने प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त प्रतिनिधींचा कारभार सुरू होण्याचे पदचिन्हे दिसत आहेत.
भाजपच्या प्रभावाला आव्हान
पहिल्या महापालिका निवडणूक सामोरे जाण्यासाठी महायुती आणि महाविकास यांनी या दोन्हीकडूनही कंबर कसली आहे. सुरुवातीला तरी महायुतीचे तुल्यबळ उमेदवारांची गर्दी झाली आहे. आणि हाच वादाचा केंद्रबिंदू बनण्याची चिन्हे आहेत. त्यातही भाजपमध्ये हे चित्र ठळकपणे जाणवत आहे. स्वाभाविक भाजप तूर्तास तरी थोरल्या भावाच्या आविर्भावात वागत आहे. साहजिकच मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थतेची कोंडलेली वाफ उसळून बाहेर पडत आहे.
आजी – माजींचे श्रेष्ठत्व
भाजपमध्ये आमदार राहुल आवाडे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली असली तरी प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनीही आपल्या समर्थकांना उमेदवारी कशी मिळेल यावर कटाक्ष ठेवला आहे. हाळवणकर यांनी काही जुन्या सहकाऱ्यांना उमेदवारी देण्याची चाचपणी सुरू केली आहे. याचवेळी मागील निवडणुकीतील विरोधाची भूमिका बजावलेल्याना भाजपची उमेदवारी मिळू द्यायची नाही असाही चंग बांधला जात आहे. त्यामुळे भाजप अंतर्गत आवाडे – हाळवणकर यांच्यातील सुप्त स्पर्धा लपलेली नाही. त्याचा इच्छुक नगरसेवकांच्या उमेदवारांच्या मनोधैर्यावर नाही म्हटले तरी परिणाम जाणवत आहे.
महायुतीच्या ऐक्यात बिब्बा
शिंदे शिवसेनेचा पट व्यापक करण्याच्या दृष्टीने खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे यांनी फासे टाकायला सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका माजी आमदाराला जवळ केल्यानंतर दुसऱ्या माजी आमदारसह महाविकास आघाडीतील काही प्रमुखांवर केंद्रित केले आहे. त्यांना आपल्या तंबूत आणल्यानंतरच निवडणुकीच्या तयारीला अधिक जोराने लागण्याची तयारी दिसत आहे. त्यातूनच भाजपचा दबाव सहन न करता इचलकरंजी नगरपालिकेच्या पारंपारिक निवडणुकीप्रमाणे इतर पक्षांनी एकत्र येऊन वाढत्या प्रभावाला शह द्यायचा का, अशाही समांतर हालचाली सुरू असून त्या महायुतीच्या ऐक्यात बिब्बा घालणाऱ्या ठरू शकतात.
आघाडीत एकवाक्यता
महाविकास आघाडीने निवडणुक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर एकत्र येऊन एकीची वज्रमूठ दाखवून देतानाच आघाडीचा झेंडा रोवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, शहर अध्यक्ष संजय कांबळे, राहुल खंजिरे यांनी चांगले उमेदवार मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले प्रदेश कार्यकारणी सदस्य मदन कारंडे यांनी शहरात किमान दुसऱ्या क्रमांकाचे स्थान टिकवण्याच्या दृष्टीने भक्कम बांधणीकडे लक्ष पुरवले आहे. तुलनेने उद्धव ठाकरे शिवसेनेने सक्षम उमेदवार कोठे मिळतील इतपत मर्यादित बाबीवर समाधान मानले असल्याचे जाणवते. ताराराणी आघाडीतील सागर चाळके, प्रकाश मोरबाळे यांनीही आपला पैस कसा वाढवता येईल यावर भर दिलेला आहे.
सहकार्याचाच पत्ता कट
या घडामोडी घडत असताना महायुती व महा विकास आघाडीमध्ये सहकारी पक्षापेक्षा आपली कामगिरी कशी सुधारेल यावर भिस्त ठेवली आहे. त्यातून प्रभाग आरक्षण जाहीर होण्यापूर्वी सहकारी पक्षाचा पत्ता कट करण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली असून हाच वादाचा मुद्दा पुढे कसे वळण घेतो यावर यशापयशाचा आलेख आकाराला येणार हे निसंदेह.