आम्हाला प्रार्थना करण्यासाठी इमारतीची गरज नाही, हिंसाचार करणाऱ्या गटांना हिंसाचारासाठी कारण देऊ नका, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत की, “जर मशिदी, लाल किल्ला किंवा कुतुब मीनार काढून घेतल्यास बेरोजगारी, महागाई आणि गरिबी यांसारख्या गंभीर समस्या संपणार असतील, तर देशातील मुस्लिमांनी त्यांना हवे ते करू द्यावे, अशी विनंती करते”. काही दिवसांपूर्वी कुतुब मिनार येथे झालेल्या निदर्शनांचा दाखला देत त्या म्हणाल्या की, “एका गटाकडून स्मारकाचे नाव विष्णूस्तंभ ठेवण्याची मागणी केली जात होती. या मागणीसाठी आमच्या देशातील हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि संविधान नष्ट करू नका.”

श्रीनगरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री म्हणल्या की, “मशिदींवर दावा करणाऱ्या गटांना हिंसाचाराचे कारण देऊ नये. त्यांना मशिदी हिसकावून घ्यायच्या असतील तर घेऊ द्या. पण त्यांना हिंसाचाराचे कारण देऊ नका. त्यांना हेच हवे आहे. जर मशिदी काढून घेतल्याने तुमचं काही साध्य होत असेल, तर कृपया तसे करा”. पीडीपी प्रमुख पुढे म्हणाल्या की, “आम्ही कुठेही प्रार्थना करू शकतो, अगदी रस्त्याच्या कडेलाही. आम्हाला प्रार्थना करण्यासाठी इमारतीची गरज नाही, आम्ही कोणत्याही ठिकाणी देवासमोर नतमस्तक होऊ शकतो.”

यासोबतच आयपीसी कलम १२४- ए (देशद्रोह कायदा) वरील सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. “जर कोणी विद्यार्थी, कार्यकर्ता किंवा राजकारणी बोलत असेल तर त्यांच्याविरोधात देशद्रोह कायद्याचा वापर केला जातो. त्यामुळे आता हे थांबवलं नाही तर आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल”, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

“भाजपानं श्रीलंकेतील घटनांपासून बोध घ्यावा”

मुफ्ती म्हणाल्या की मला आशा आहे की, “भाजपा श्रीलंकेतील घटनांपासून बोध घेईल आणि जातीय तणाव आणि बहुसंख्यवाद थांबवेल”. “श्रीलंका या देशात सध्या तणावाचे वातावरण आहे, कारण तिथे अनेक वर्षे धर्माचा मुद्दा उचलला जात आहे. एकाच कुटुंबातील सदस्य देशावर आणि तिथल्या नागरिकांवर राज्य करत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या आठ वर्षांपासून भाजपा या देशावर राज्य करत आहे आणि जातीय वादाला खतपाणी घालत आहे. जम्मू-काश्मीरमधील लोक शांतता आणि सौहार्दावर विश्वास ठेवतात आणि काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदाय येथे शांततेने राहतात. एकता आणि बंधुता कशी असते हे आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे.”

देशाच्या काही भागांमध्ये मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवल्याच्या अलिकडच्या काही घटनांचा संदर्भ देत मुफ्ती म्हणाल्या, “अल्पसंख्याकांवर ज्या प्रकारे हल्ले होत आहेत ते दुर्दैवी आहे. त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवला जात असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. न्यायव्यवस्था या घटनांची स्वत:हून दखल घेण्यास पुढे येत नाही, जी त्यांना आदर्शपणे घ्यायला हवी होती.” ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीरमधील नागरिक ज्या अडचणींना तोंड देत आहेत ते अधोरेखित करताना मुफ्ती म्हणाल्या की, “एकत्र उभे राहणे हा एकमेव पर्याय आहे. केंद्रशासित प्रदेशातील नोकऱ्या, जमीन आणि नैसर्गिक संसाधने प्रत्येकासाठी आहेत आणि आम्हाला कमकुवत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत”.