लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षाध्यांनी परवानगी दिली तर जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा विचार आपण येथे येत असताना करीत होतो, असे वक्तव्य एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानाची जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. इम्तियाज जलील खरेच येथे उभे राहिले तर ते नेमके कुणाच्या पथ्यावर पडेल यापासून जालना लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची नेमकी संख्या किती आहे याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जालना लोकसभेत १३ निवडणुकांपैकी १२ निवडणुकांमध्ये औरंगाबादचा प्रभाव अधिक होता हा इतिहास आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून प्रमख राजकीय पक्षांनी औरंगाबाद जिल्ह्यातील नेत्यांना उमेदवारी देण्याची उदाहरणेही इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी जालना लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील अंबड, जालना, भोकरदन या विधानसभा मतदारसंघांशिवाय बीड जिल्ह्यातील गेवराई आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. पुनर्रचना झाल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकरदन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाला.

१९७१ नंतर जवळपास ५० वर्षांच्या काळात जालना लोकसभेसाठी झालेल्या १३ निवडणुकांत काँग्रेस आणि भाजपने १२ उमेदवार औरंगाबाद जिल्ह्यातील दिले होते. यापैकी बाबूराव काळे (काँग्रेस १९७१), दिवंगत बाळासाहेब पवार (काँग्रेस १९८० आणि १९८४) आणि उत्तमसिंग पवार (भाजप १९९६ आणि १९९८) हे निवडून आले. याच काळात प्रमुख राजकीय पक्षांनी दिलेले आणि पराभूत झालेले औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवार हे १९७७- दिवंगत माणिकराव पालोदार- काँग्रेस, १९८९- दिवंगत बाळासाहेब पवार-काँग्रेस, १९९१- प्रतापराव घारे-जनता दल, २००४- उत्तमिसंग पवार-काँग्रेस, २००९- कल्याण काळे-काँग्रेस, २०१४ आणि २०१९- विलास औताडे-काँग्रेस. अर्थात औरंगाबाद जिल्ह्यातील या उमेदवारांत एका उमेदवाराचा अपवाद वगळला तर उर्वरित सर्वांची गावे जालना लोकसभा मतदारसंघातीलच होती.

विशेष मुलाखत : औरंगाबाद निवडणुकीत हिंदू-मुस्लीम वादाचा मुद्दा चालणार नाही – इम्तियाज जलील

दिवंगत पुंडलिकराव दानवे (१९७७ आणि १९८९), दिवंगत अंकुशराव टोपे (१९९१) आणि रावसाहेब दानवे (१९९९ पासून सलग पाच वेळा) हे निवडून आलेले उमेदवार मूळ जालना जिल्ह्यातील आहेत. १९९६ पासून सलग सात निवडणुकांत या लोकसभा मतदारसंघातून भाजपचा विजय झालेला आहे. सध्याच्या जालना लोकसभा मतदारसंघातील निम्मा भाग औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. त्यामध्ये औरंगाबाद शहरातील काही भागांचाही समावेश आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा विचार मनात येऊन गेल्याचे वक्तव्य केले असले तरी जालना जिल्ह्यातील मतदारांनी औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवारांची सवय आहेच. परंतु इम्तियाज जलील यांचे औरंगाबाद शहरातील वास्तव्य असलेला औरंगाबादमधील विधानसभा मतदारसंघ मात्र जालना लोकसभा मतदारसंघात येत नाही. त्यांच्या वक्तव्याने जालना जिल्ह्यात एक नवीन विषय मात्र चर्चेसाठी मिळाला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imtiyaz jaleel may fight loksabha election from jalna constituency pmw
First published on: 05-06-2022 at 17:41 IST