अकोला : सुसंस्कृत व शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपची आता बेशिस्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. ‘स्थानिक’ निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची झुंबड होती. उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच पक्षांतर्गत प्रचंड खदखद वाढली आहे. अकोटमध्ये तर एका इच्छुकाच्या समर्थकांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कार्यकर्त्यांच्या ‘मन की बात’ कोण ऐकणार? असा प्रश्न उपस्थित करून पक्षाच्या वर्तुळात नाराजीचा सूर उमटत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक वर्षांनंतर नगर पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका लागल्या. कार्यकर्त्यांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी. त्यातच भाजपच्या तिकीटावर लढण्याकडे सर्वांचा कल. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने या पदाच्या उमेदवारीसाठी प्रचंड ओढाताण झाली. भाजपमध्ये इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा होती. पक्ष नेतृत्वाने मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित केले. खबरदारी म्हणून उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. रविवारी भाजपच्या उमेदवारांचे नावे समोर आल्यावर पक्षांतर्गत असंतोषाचा बांध फुटला.
अकोट नगर पालिकेमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष होता. यावेळेस ओबीसी महिलेसाठी आरक्षित नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण तयारीला लागले. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासाठी अकोट नगर पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तिकीट वाटपात देखील त्यांनी आपल्या समर्थकांनाच झुकते माप दिले. नगराध्यक्ष पदासाठी भाजपने माया धुळे यांना उमेदवारी दिल्याचे रविवारी समोर येताच पक्षातील इतर इच्छुकांनी रोष व्यक्त केला. एका इच्छुकाच्या समर्थकांनी तर वरिष्ठ पदाधिकाऱ्याला गाठून चक्क धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. या संदर्भात कुठे तक्रार दाखल झालेले नाही. आपसात समजूत काढून प्रकरण मिटवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
उमेदवारी वाटपात पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण आडवे आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. काहींचा केवळ गटबाजीतून पत्ता कट झाला. स्थानिक निवडणुकीसाठी वर्षांनुवर्षे तयारी करून पक्षाचे कार्यक्रम राबविणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलत ऐनवेळी इतर पक्षातून घेतलेल्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने पक्षातून धुसफूस आहे. त्यातूनच पक्षाच्या प्रतीमेला तडा जाणारा धक्काबुक्की सारखा प्रकार घडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या संदर्भात आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अनेक इच्छूक असल्याने तेल्हारा व मूर्तिजापूरमध्ये देखील भाजपांतर्गत खदखद दिसून येते.
बंडखोरी, नाराजीमुळे आव्हानात्मक
नगर पालिकेमध्ये अकोला, तेल्हारा व मूर्तिजापूर नगर पालिकेत भाजपचे वर्चस्व होते. उमेदवारी वाटपानंतर पक्षांतर्गत नाराजी व बंडखोरीमुळे ही निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.
