अकोला : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर शेवटच्या टप्प्यात चांगलाच वाढला. या प्रचारात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे देखील प्रतिबिंब उमटत असल्याचे दिसून येते. आपल्या उमेदवारांना मतांची आघाडी मिळण्यासाठी आमदारांसह आगामी निवडणुकांमधील इच्छुकांची धडपड सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरच भवितव्य ठरणार असल्याने उमेदवारांसाठी मतांचा जोगवा मागताना आमदार व इच्छूक फिरत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहतील. त्या दृष्टीने प्रमुख राजकीय पक्षांसह आमदार व इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली. अकोला लोकसभेत भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केल्यास अकोला पूर्व, अकोट व मूर्तिजापूर येथे भाजपचे आमदार असून बाळापूर येथे शिवसेना ठाकरे गट व रिसोडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त असली तरी हा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ मध्ये विधानसभेच्या सहाही मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे यांना मताधिक्य होते. आता ते कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान असेल. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी संपूर्ण अकोला लोकसभा मतदारसंघाची, तर मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे व अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपआपल्या विधानसभा मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली.अकोला पश्चिममध्ये देखील भाजपमधील इच्छूक कामाला लागले. लोकसभेच्या प्रचारासोबतच विधानसभेची तयारी सुरू आहे. या निवडणुकीतील कामगिरीवरच विधानसभेसाठी विचार होणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. मताधिक्य घटल्यास विद्यमान आमदारांना देखील बदलले शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व सतर्क झाले. विधानसभेची बाळापूरची जागा शिवसेना उबाठाने भाजपसोबतच्या युतीत जिंकली होती. आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे बळ किती? हे स्पष्ट होईल. डॉ. अभय पाटील यांच्यासाठी आमदार नितीन देशमुख हे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. २०१९ मध्ये रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व असतांना भाजपने दुपटीहून अधिक आघाडी घेतली होती. आता आमदार अमित झनक यांच्यापुढे काँग्रेसच्या मतांचा टक्का वाढविण्याचे लक्ष्य राहील.

हेही वाचा : एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”

अकोला जिल्ह्यात वंचित आघाडीचे मोठे प्राबल्य आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितला यश मिळाले नसले तरी अकोला पश्चिम व रिसोड वगळता उर्वरित चार मतदारसंघात वंचितला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितकडून लढण्यासाठी अनेक जण बाशिंग बांधून तयार आहेत. लोकसभेत ॲड. प्रकाश आंबेडकरांसाठी त्या इच्छुकांना आपली प्रतिष्ठा पणाला लावाली लागेल. सत्ताधारी असलेल्या वंचितच्या जि.प. सदस्यांच्या कामगिरीवरही पक्षाची नजर राहील. आपल्या उमेदवारांसाठी आमदारांसह इच्छुकांची कामगिरी कशी राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा : भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?

बुथनिहाय मतदानावर लक्ष

उमेदवारांसाठी बुथनिहाय मतदान महत्त्वपूर्ण आहे. लोकसभा व विधानसभेनंतर राज्यात रखडलेल्या महापालिका, नगर पालिकांच्या निवडणुका देखील लागण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका लढण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना आपल्या उमेदवारांसाठी बुथनिहाय मतदान वाढीसाठी कसरत करावी लागेल. त्यांच्या कामागगिरीवरही राजकीय पक्षांचे लक्ष राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola vidhan sabha aspirants become active in the campaign for lok sabha elections print politics news css
First published on: 23-04-2024 at 16:19 IST