अमरावती : महायुतीचे घटक असूनही प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू हे सातत्‍याने सरकारच्‍या विरोधात भूमिका घेत असल्‍याने पेच निर्माण झाला आहे. प्रत्‍येक मतदार संघात ‘मी खासदार’ हे अभियान राबवून ३०० ते ४०० उमेदवार उभे करणार असल्‍याची घोषणा बच्‍चू कडू यांनी केल्‍याने भाजपसहित निवडणूक आयोगाचीही चिंता वाढण्‍याची शक्‍यता आहे. आमदार बच्‍चू कडू हे त्‍यांचे सहकारी आमदार राजकुमार पटेल यांच्‍यासह महाविकास आघाडीतून बाहेर पडत महायुती सरकारमध्‍ये सहभागी झाले. त्‍यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा प्रहारचे कार्यकर्ते व्‍यक्‍त करीत होते. पण, त्‍यांना वेळोवेळी मंत्रिपदाने हुलकावणी दिली. अनेकवेळा याविषयीची खंत बच्‍चू कडू व्‍यक्‍त करताना दिसले. अखेर बच्‍चू कडू यांना दिव्‍यांग कल्‍याण विभागाचे अध्‍यक्षपद देऊन मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्‍यात आला. बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद वाचविण्यासाठी सरकारने अध्यादेश काढून कडू यांच्याविरोधात दोन वर्षे अविश्वास ठराव आणता येणार नाही अशी तरतूद केल्‍याचे बोलले गेले. तरीही बच्‍चू कडू हे समाधानी दिसत नाहीत.

बच्‍चू कडू आणि महायुतीत गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून संघर्ष होत आहे. त्‍यांनी याआधीही भाजपवरील नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू असताना भाजपने प्रहारला या चर्चेत सामावून न घेतल्‍यामुळे बच्‍चू कडू हे महायुतीवर नाराज असल्‍याचे सांगितले जात आहे. देशभरातील विरोधी पक्ष मतदान ‘ईव्‍हीएम’च्‍या माध्‍यमातून न घेता मतपत्रिकेवर घ्‍या, अशी मागणी करीत आहेत. त्‍याचीच री ओढत बच्‍चू कडू यांनी ‘ईव्‍हीएम’ला विरोध दर्शवला आहे. निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवरच निवडणूक घ्‍यायला लावण्‍यास भाग पाडू असे, बच्‍चू कडू यांनी ठणकावून सांगितले आहे.

prahar janshakti party, navneet rana, ravi rana, Bachchu Kadu, mahayuti, lok sabha election 2024
महायुतीतील बच्‍चू कडूंचे राजकीय भवितव्‍य पणाला!
Uddhav Thackeray
“शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट प्रहार; म्हणाले “इंजिनाची चाकं…”
PM Narendra Modi And Govindam
‘कोणतंही हुकूमशाही सरकार फार काळ टिकू शकलं नाही, त्यामुळे भाजपाच्याही नशिबात तेच आहे’; कम्युनिस्टांचा दावा
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

हेही वाचा : अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळे चिखलीकरांना निवडणूक सोपी ?

बच्‍चू कडू यांनी ‘मी खासदार’ हे अभियान राबविण्‍याची तयारी केली आहे. एका मतदार संघात ३०० ते ४०० उमेदवार उभे करण्‍याची त्‍यांची योजना आहे. लोकांचे मतदान कुठे जाते, हे कळले पाहिजे. लोकशाहीत तो सर्वांचा अधिकार आहे. माझे मत कुणाला जाते, हे समजले पाहिजे, यासाठी आम्‍ही शेकडो उमेदवार उभे करू, त्‍यामुळे सरकार आणि निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणूक मतपत्रिकेवर घ्‍यावी लागेल, असे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे आहे. ‘ईव्‍हीएम’वर मतदान केल्‍यानंतर मत कुणाला गेले, हे कळत नाही. कुणाला मतदान केले, हे तपासण्‍याचा मुलभूत अधिकार ‘ईव्‍हीएम’ने हिरावून घेतला आहे. हा अधिकार आम्‍हाला मिळाला पाहिजे, शेतक-यांच्‍या शेतमालाला योग्‍य भाव मिळत नाही. घरकुले मिळत नाहीत. शहर आणि ग्रामीण अशी मोठी तफावत आहे, हे सर्व मुद्दे समोर ठेवून ‘मी खासदार’ हे राज्‍यव्‍यापी अभियान राबविणार असल्‍याचे बच्‍चू कडू यांनी जाहीर केले आहे.

महाराष्‍ट्रात राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीच्‍या बैठका झाल्‍या, त्‍यात आम्‍हाला चर्चेसाठी बोलविण्‍यात आले नाही. आम्‍ही मतदार संघात शेवटच्‍या माणसाला विचारतो, तशी भाजपची भूमिका दिसत नाही. आम्‍हाला देखील त्‍यांची फार काही गरज वाटत नाही. तो त्‍यांचा विचार आहे. आम्‍ही आमच्‍या विचाराने चालणार आहोत. जागावाटपाविषयी काय होईल, ते उघड करू, लपून-छपून काहीही करणार नाही, असे बच्‍चू कडू यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : रावसाहेब दानवे यांच्यासमोर यंदा आव्हान ?

बच्‍चू कडू हे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या गटासोबत जुळलेले आहेत. त्‍यांचा खरा संघर्ष हा भाजपसोबत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी त्‍यांना भाजपच्‍या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत घोडामैदान सज्‍ज ठेवण्‍याचा बच्‍चू कडू यांचा प्रयत्‍न आहे. काही महिन्‍यांपुर्वी बच्‍चू कडू यांनी आपल्‍या मतदार संघात इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपचा आहे, असे सांगून खळबळ उडवून दिली होती. बच्‍चू कडू काहीही करून पराभूत झाले पाहिजे, असा संदेश भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष बावनकुळे यांनी दिला होता, असा दावा देखील बच्‍चू कडू यांनी केला होता.

हेही वाचा : नगरमधील सारे विखे-पाटील विरोधक लंके यांच्या पाठीशी ?

बच्‍चू कडू यांनी लोकसभेसाठी महायुतीत दोन ते चार जागांची मागणी केली आहे. त्‍यांच्‍या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्‍याने बच्‍चू कडू हे अस्‍वस्‍थ आहेत. आता त्‍यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष राहणार आहे.