छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम बीड जिल्ह्यात होईल असा अंदाज असल्याने मराठा समन्वयकांबरोबर बैठका घेण्याची रणनीती धनंजय मुंडे यांनी आखली असल्याचे दिसून येत आहे. पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे हे तिघेही स्वतंत्रपणे आपआपले किल्ले लढवत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीतून निर्माण झालेल्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न झाला. त्यांना काळे झेंडेही दाखवले गेले. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळीत स्थानिक मराठा नेत्यांची बैठक घेतली व त्यात ‘मराठा भवन’ बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी बोलावलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीस फारशी गर्दी नव्हती. बैठकीच्या आठ-दहा दिवसांपूर्वीच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे परळीत महासंवाद दौऱ्यातून येऊन गेले होते. त्याला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला होता. त्या प्रभावामुळे धनंजय मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीकडे प्रमुख स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवल्याचे सांगण्यात येते. धनंजय मुंडे यांनी मराठा समाजासोबतच इतरही जात समुहांच्या बैठकांवर जोर देत पंकजा मुंडेंच्या प्रचाराची एक बाजू सांभाळून धरली आहे.

हेही वाचा : ठाणे हवे आहे, पण धनुष्यबाण नको; गणेश नाईकांपुढे नवे सत्तासंकट

पंकजा मुंडे यांनी अलिकडेच आम्ही तिघे भावंडे सध्या तरी एकत्र दिसणार नाहीत, असे विधान केले होते. त्याला पुष्टी मिळणारे प्रचारतंत्र सध्या बीडमध्ये दिसत आहे. पंकजा मुंडे यांनी सहा विधानसभा मतदार संघातील भाजपचे स्थानिक पातळीवर कार्यकर्ता ते तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांवर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी नेमके काय काम केले याचा आढावाही घेतला जात आहे. पंकजा मुंडे यांनी काही अल्पसंख्याक नेत्यांच्या घरीही भेटी दिल्या आहेत. त्यांच्या इफ्तार पार्टीलाही त्यांनी हजेरी लावली. नुकताच अंबाजोगाईजवळील चतुरवाडीत आयोजित मेळाव्यात त्यांनी मोबाईल फोनवरून संपर्क साधत धनगर आरक्षणाचा प्रश्नावर आश्वासन दिले. माजलगाव या प्रकाश सोळंके यांच्या गडातही पंकजा मुंडे यांनी दौरा केला असून त्यांचे सोळंके परिवाराकडूनही जोरदार स्वागत करण्यात आले. प्रकाश सोळंके यांनी भावनिक होत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याची मतदार संघा चर्चा झाली. प्रकाश सोळंके यांच्या घराची मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीच्या आठवणी यावेळी चर्चेत आल्या होत्या.

हेही वाचा : नफ्यापेक्षा दुप्पट रोखे दान; आठ कंपन्यांचा प्रताप

एकीकडे बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पहिल्या टप्प्यातील प्रचार पूर्ण झालेला असताना महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही ठरेना. डाॅ. ज्योती मेटे की बजरंग सोनवणे, अशी चर्चेचे फेर धरले जात आहेत. डाॅ. ज्योती मेटे या राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चाही थांबली आहे.