कोल्हापूर : गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजितसिंह घाटगे यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्याचप्रमाणे कागल नगरपालिका निवडणुकीतही याच दोन गटात गेल्यावेळी संघर्ष झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा या नगरपालिकेत होण्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीच्या स्वरूपात निवडणूक लढवण्यासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू असले तरी त्याला घाटगे यांच्याकडून कितपत प्रतिसाद मिळणार हा प्रश्न आहे. शिंदे सेनेचे माजी खासदार संजय मंडलिक, भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय घाटगे यांच्या भूमिका हसन मुश्रीफ – समरजित घाटगे यांच्यापैकी कोणाच्या पथ्यावर पडणार यावरून निकालाचा कल बदलू शकतो.

कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी कागल विधानसभा मतदारसंघाची ओळख झाली आहे. या तालुक्यातील दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व त्यांचे चेले असलेले हसन मुश्रीफ यांच्यातील दोन दशकांच्या संघर्षाने तालुका राजकीयदृष्ट्या ढवळून निघाला. मंडलिक यांच्या पश्चात तालुक्याचे निर्विवाद नेतृत्व हसन मुश्रीफ यांनी केली. पुढे त्यांच्या वाटचालीत समरजित घाटगे यांच्याकडून काटे पेरले गेले. घाटगे यांनी पहिल्यांदा भाजपची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून तर अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून घाटगे यांनी मुश्रीफ यांना काटाजोड लढत दिली.

असाच सामना कागल नगरपालिकेत गेल्या वेळी झाला होता. या नगरपालिकेत मुश्रीफ आणि भाजपचे घाटगे यांनी प्रत्येकी ९ जागा जिंकल्या होत्या. संजय मंडलिक यांच्या शिवसेनेच्या दोन सदस्यांमुळे मुश्रीफ यांना सत्ता टिकवणे शक्य झाले. मुश्रीफ यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तर उण्यापुऱ्या पावणेतीनशे मताधिक्याने विजयी झाला होता.

यावेळी सर्वसाधारण महिला गटासाठी नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने मुश्रीफ तसेच घाटगे या दोन्ही गटांनी पालिकेवर झेंडा रोवण्याची तयारी चालवली आहे. शरद पवारांना रामराम करून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या मुश्रीफ यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी चार-पाच मातब्बर उमेदवार चर्चेत असून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. समरजित घाटगे यांनी सावधपणे प्यादी हलवायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडे इच्छुकांची दीडशेवर लोकांची यादी तयार आहे. मात्र नगराध्यक्ष पदासह प्रभागातील उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली आहे. त्यामुळे घाटगे नेमके पत्ते खुले करणार आणि मुश्रीफ कोणाला रिंगणात उतरवणार यावर कागल मधील जिल्ह्यातील लक्षवेधी लढत रंगणार आहे.

मुश्रीफ यांना एकट्याने लढत देण्यापेक्षा भाजप मध्ये प्रवेश केलेले संजय घाटगे यांची सोबत घेणे अधिक व्यवहार्य वाटण्याची शक्यता आहे. एखादी दुसरी जागा देऊन घाटगे गटाचे समाधान केले जाईल. समरजित घाटगे हे महाविकास आघाडीपेक्षा स्वबळावर लढत देण्याच्या मनस्थितीत दिसतात. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी रविवारी कागल दौरा करून आघाडीच्या रूपात निवडणूक लढवण्याची साद घातली. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बांधणी करणे त्यांना कठीण जाईल असे चित्र आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना या तालुक्याशी आमदार पाटील यांनी फारसा संपर्क ठेवला नसल्याने ऐनवेळी उमेदवार उभे करणे हे आव्हान आहे. शिवाय, आघाडीच्या अक्षम उमेदवारांना आघाडी कडून उमेदवारी देणे घाटगे यांना रुचणारे नाही. त्यामुळे येथे महाविकास आघाडी स्वरूपात निवडणूक होणार का हाही प्रश्न आहे. संजय मंडलिक यांनी उमेदवारांची चाचपणी चालवली असली तरी स्वबळावर सत्ता सोपान गाठणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळे त्यांची भूमिका कोणाच्या सोबत राहणार यावर त्या गटालाही हितावह आहेत ठरण्याची चिन्हे आहेत. एकूणच कागलचे रण तापत असकी तरी कोण कोणाला उघड – छुपा पाठिंबा देणार यावर निकालाचे काटे फिरू शकतात.