KCR daughter suspension तेलंगणामध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी त्यांची मुलगी के. कविता यांना पक्षातून निलंबित केले आहे. कविता यांचे वर्तन पक्षाची प्रतिमा मलीन करत असल्याचे आरोप पक्षाकडून करण्यात आले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारने सोमवारी (दि. २६ ऑगस्ट)रोजी, कथित कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट (KLIP) मधील अनियमिततेच्या चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर के. कविता यांनी त्यांचे चुलत भाऊ आणि पक्षाचे नेते माजी मंत्री टी. हरीश राव आणि माजी राज्यसभा सदस्य संतोष कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याबरोबर संगनमत करून वडील आणि बीआरएसचे प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्याविरोधात गेल्याचा आरोप के. कविता यांनी केला. परिणामी मंगळवारी बीआरएस नेतृत्वाने कविता यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून निलंबित केले. के. कविता यांनी ज्यांच्यावर आरोप केले, ते हरीश राव आणि संतोष कुमार कोण आहेत? नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात.

कोण आहेत हरीश राव?
- हरीश राव यांनी २००१ मध्ये बीआरएस (तेव्हाची तेलंगणा राष्ट्र समिती) ची स्थापना झाल्यावर तरुण नेते म्हणून राजकारणात प्रवेश केला.
- ते केसीआर यांच्या बहिणीचे पुत्र आहेत. हरीश २००४ मध्ये पहिल्यांदा सिद्दीपेट (तेव्हाच्या अविभाजित आंध्र प्रदेशमध्ये) येथून आमदार म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून ही जागा त्यांनी टिकवून ठेवली आहे.
- २००९-२०१० मध्ये तेलंगणामध्ये आंदोलने सुरू असताना ते बीआरएसच्या त्या आमदार आणि खासदारांपैकी एक होते, ज्यांनी राज्याच्या मागणीसाठी राजीनामे दिले होते.
स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसने सत्ता मिळवल्यावर केसीआर यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात हरीश यांना जलसिंचन आणि संसदीय कार्यमंत्रिपद देण्यात आले. २०१८ मध्ये सुरू झालेल्या केसीआर यांच्या दुसऱ्या कार्यकाळात, सुरुवातीला त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आणि त्यांना पक्ष संघटनेत पद देण्यात आले, यामुळे त्यांचे चुलत भाऊ आणि केसीआर यांचे पुत्र के. टी. रामा राव यांच्यासाठी त्यांना बाजूला सारले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यांचा राज्यभर मजबूत असलेला जनसंपर्क पाहता त्यांना पुन्हा केसीआर यांच्या मंत्रिमंडळात घेण्यात आले आणि अर्थ, आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांसारखी महत्त्वाची खाती देण्यात आली.
“हरीश राव हे केवळ आमच्या पक्षाचे निष्ठावान नेतेच नाहीत, तर सुरुवातीपासूनच ते केसीआर यांच्या नेतृत्वाचा आणि बीआरएस चळवळीचा कणा आहेत. काँग्रेस सरकारने केसीआर आणि कालेश्वरम प्रकल्पावर केलेले खोटे, राजकीयदृष्ट्या प्रेरित आरोप त्यांनी खोडून काढले आहेत आणि टीकाकारांची तोंडे बंद झाली आहेत, तसेच लोकांचा विश्वास परत आला आहे. त्यांची स्पष्टता, दृढनिश्चय आणि सभागृहात दिलेले सडेतोड उत्तर यामुळे काँग्रेसचा खोटेपणा उघड झाला आहे,” असे बीआरएस विधान परिषद सदस्य दसोजू श्रवण यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस‘शी बोलताना सांगितले.
जलसिंचन मंत्री म्हणून हरीश राव यांनी केएलआयपीच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवली आणि प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन वेगाने होईल याची खात्री केली. राज्याच्या फाळणीनंतर तेलंगणाला योग्य पाणी वाटप मिळावे या भूमिकेचे ते पुरस्कर्ते होते. आंध्र प्रदेशच्या बनाकाचेर्ला-गोदावरी प्रकल्पाला आव्हान देण्यासाठी बीआरएस सर्वोच्च न्यायालयात जाईल, असेही त्यांनी घोषित केले होते; कारण या प्रकल्पाला यापूर्वीच पर्यावरण आणि तांत्रिक कारणांमुळे नकार देण्यात आला होता. बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले हरीश यांचे ‘मिशन काकतीय‘ या योजनेद्वारे पारंपरिक जलस्रोतांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न राज्याच्या कृषी क्षेत्रासाठी फायदेशीर ठरले असे म्हटले जाते. त्यांनी पालामुरू-रंगारेड्डी लिफ्ट इरिगेशन योजना पूर्ण करण्यासाठीही पाठपुरावा केला.
अर्थमंत्री म्हणून हरीश यांनी बीआरएस सरकारच्या ‘रैतु बंधू‘ आणि ‘रैतु बिमा‘ या महत्त्वाकांक्षी योजनांतर्गत वेळेवर निधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला, त्यामुळे पक्षाला दुसऱ्यांदा सत्ता मिळण्यास मदत झाली. कोविड-१९ महामारीदरम्यान हरीश यांनी आरोग्य मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी चाचणीची तयारी, लसीकरण मोहीम, तसेच राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यावर देखरेख ठेवली. त्यांनी शहरी भागांमध्ये ‘बस्ती दवाखाना’ (वस्ती दवाखाने) सुरू करण्यालाही प्रोत्साहन दिले.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसची सत्ता गेल्यापासून, हरीश यांनी विधानसभेत आणि बाहेर विविध मुद्द्यांवर रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी कथित केएलआयपी घोटाळ्यावरून मागील केसीआर सरकारचा बचाव केला, तर ‘युरियाची टंचाई‘ आणि ‘पिकांच्या नुकसानीसाठी नुकसानभरपाईचा अभाव’ यांसारख्या शेतकरी मुद्द्यांवर काँग्रेस सरकारवर टीका केली. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वादांचाही स्पर्श झाला आहे.
“केसीआर यांच्यानंतर हरीश हे बीआरएसमधील सर्वात मोठे नेते आहेत. मात्र, केसीआर कुटुंबातील समीकरणांमुळे त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सगळ्या गोष्टी असूनही ते बीआरएसशी कटिबद्ध आहेत,” असे त्यांच्या जवळच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. एल्काथुर्थी येथील बीआरएसच्या अलीकडील अधिवेशनातही हरीश यांच्याभोवती वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला त्यांना या कार्यक्रमाचे प्रभारी करण्यात आले होते, परंतु नंतर पक्षाच्या नेत्यांशी असलेल्या मतभेदांमुळे त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली.
बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणातही हरीश यांचे नाव समोर आले होते. सत्तेत असताना त्यांनी वरिष्ठ बीआरएस नेत्यांसह त्यांच्या राजकीय विरोधकांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते, असा आरोप होता. मार्चमध्ये त्यांच्याविरुद्ध या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली होती, जी नंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने रद्द केली.
संतोष कुमार कोण आहेत?
केसीआर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ४८ वर्षीय संतोष कुमार हे बीआरएसचे एक वरिष्ठ नेते आहेत. संतोष कुमारदेखील पक्षाच्या स्थापनेपासूनच पक्षाबरोबर आहेत. ते केसीआर यांच्या पत्नीच्या बहिणीचे पुत्र आहेत. सध्या संतोष ‘नमस्ते तेलंगणा‘ या तेलुगू दैनिकाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. बीआरएसचे सरचिटणीस संतोष २०१६ ते २०२२ पर्यंत राज्यसभा सदस्य होते. “संतोष कुमार हे पक्षाचे एक महत्त्वाचे सदस्य आहेत, पण २०१४ मध्ये बीआरएस सत्तेत येण्यापूर्वी ते राजकारणात सक्रिय नव्हते. बीआरएस सरकारच्या पहिल्या कार्यकाळापासून ते महत्त्वाच्या बैठकांमध्ये भाग घेत आहेत आणि पक्षामधील विविध नेमणुकांमध्ये त्यांचा सहभाग असतो,” असे एका बीआरएसच्या जाणकाराने सांगितले. “संतोष कुमार हे केसीआर यांच्याबरोबर २४ तास त्यांचे खाजगी सचिव म्हणून असतात,” असेही ते म्हणाले.
समर्पण आणि निष्ठा तसेच केसीआर आणि पक्षाचा निर्भीडपणे बचाव, यामुळे संतोष हे सर्वात विश्वासू बीआरएस नेत्यांपैकी एक आहेत, असे आणखी एका बीआरएस नेत्याने सांगितले. सक्रिय राजकारणात उतरण्यापूर्वी, तत्कालीन केसीआर सरकारच्या ‘हरित हरम‘ कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन संतोष यांनी ‘ग्रीन इंडिया चॅलेंज‘ ही देशव्यापी वृक्षारोपण मोहीम सुरू केली होती. पर्यावरण संवर्धनातील योगदानासाठी त्यांना गेल्या वर्षी ‘ग्रीन आयडॉल पुरस्कार‘ही मिळाला होता.
गेल्या वर्षी हैदराबाद पोलिसांनी भूखंड बळकावल्याच्या प्रकरणात कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर शहरातील ९०४ चौरस यार्ड जमीन बेकायदा ताब्यात घेतल्याचा आरोप होता. त्यांनी हे आरोप फेटाळले आणि खरेदी कायदेशीर असून मालमत्तेवर कोणताही वाद नसल्याचे सांगितले. बीआरएस छावणीतील एक महत्त्वाचे नेते असूनही, केसीआर कुटुंबातील सध्याच्या वादामुळे संतोष यांच्या राजकीय स्थानावरही परिणाम झाल्याचे दिसते. “या मतभेदांना केसीआरना सामोरे जावे लागत असल्यामुळे, कदाचित हरीश राव किंवा केटीआर यांना पक्षात अधिक महत्त्व दिले जाईल,” असे सूत्रांनी सांगितले.