दयानंद लिपारे
कोल्हापूर : नववर्षाच्या सुरुवातीलाच कोल्हापूरमध्ये राजाराम कारखान्याच्या राजकारणावरून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील – भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यातील संघर्ष मुद्द्यवरून गुद्द्यावर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ऐतिहासिक बिंदू चौकात टपोरी गुंडांप्रमाणे एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न करून आमदार ऋतुराज पाटील – माजी आमदार अमल महाडिक यांनी राजकारणातील शिष्टाचार वेशीवर टांगला होता. आता याच दोन्ही कुटुंबातील वरच्या श्रेणीतील नेते पुन्हा एकमेकांना भिडले आहेत. नववर्षाच्या पोटात काय दडले आहे याची रक्तरंजित झलक नव्या वादाने दाखवून दिली आहे.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि महाडिक परिवार यांच्यात संघर्षाचा पूर्वार्ध रंगल्यानंतर आता या कारखान्यातील निवडणूक सुनावणी प्रकरणावरून दोन्ही गटातील वाद रस्त्यावर आला आहे. राजाराम कारखान्यात महाडिक यांच्याकडून ऊस गाळपात अन्यायकारक धोरण राबवत असल्याचा आरोप करीत सतेज पाटील यांनी मोर्चा काढला. राजाराम मध्ये विरोधकांचा ऊस तोडला जात नाही. कारखानदारी अडचणीत असताना ऊस घेऊन जात नाहीत. त्यामुळे कारखाना आणखी आर्थिक अडचणीत येईल असे डोके विद्वानाने चालवले आहे. निवडणुक काळात त्यांनी शेतकरी सभासद रद्द केले. त्याचा निर्णय आमच्या बाजूने झाला. हा कारखाना आता सहकार ऐवजी महाडिक खाजगी कारखाना करुन टाका अशी खरमरीत टीका करून सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा महाडिकांना टीकेचे लक्ष्य बनवले.
हेही वाचा… भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांची ‘श्रीराम रथयात्रा’; राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न ?
याच दिवशी त्यांच्या समर्थकांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना भर रस्त्यावर बेदम मारहाण केली. त्यावरून खासदार धनंजय महाडिक, राजाराम कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील यांना गुंड प्रवृत्तीचे ठरवून टीका केली आहे. एकेकाळी महाडिक यांच्या राजकारणाला गुंडगिरीचे संदर्भात दिले जात होते पण आता हा टीकेचा प्रवाह सतेज पाटील यांच्या दिशेने जाताना दिसत आहे. पुरोगामी बनवल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या राजकारणाची मजल कुठपर्यंत पोहचली आहे याची झलक या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
हेही वाचा… प्रकाश आंबेडकर – भाजपमध्ये कोण बाजी मारणार ?
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत सतेज पाटील – धनंजय महाडिक यांनी राजकारणाचे धडे गिरवले. तेव्हा हे दोघे चांगले मित्र होते. पुढे काही ना काही कारणाने दुरावा वाढत गेला आणि आता तर एकमेकांच्या छाताडावर बसण्याची भाषा केली जात आहे. विशेषतः मागील लोकसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक, गोकुळ दूध संघ येथे महाडिकांचा पराभव करण्यात सतेज पाटील यांना यश आले. अलीकडे, धनंजय महाडिक हे राज्यसभेवर निवडले गेल्यानंतर महाडिक गटाला बळकटी आली. कसबा बावडा या आमदार पाटील राहत असलेल्या उपनगरातील राजाराम कारखान्याची निवडणूक सहा महिन्यापूर्वी चांगलीच गाजली. राजाराम मध्ये झेंडा फडकवण्याचे सतेज पाटील यांचे मनसुबे महाडिक कुटुंबीयांनी यशस्वी होऊ दिले नाहीत. कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची निवड झाली. तरीही संघर्ष काही थांबला नाही. तो २ जानेवारीच्या सतेज पाटील यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर काढलेल्या मोर्च्याने उफाळून आला. याच दिवशी सायंकाळी राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस घरी जात असताना सतेज पाटील समर्थकांनी भर रस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणी महापालिकेचे माजी स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यावर अमल महाडिक यांनी सतेज पाटील हे राजाराम कारखान्याला बदनाम करण्यासाठी आरोप करीत आहेत. पाटील परिवार, आरोपी संदीप नेजदार यांच्या उसाचे गाळप किती केले याची आकडेच सादर केले. सतेज पाटील यांना त्यांच्या कारखान्याबाबत सहा महिन्यापूर्वी प्रश्न उपस्थित केले होते; त्याची त्यांनी उत्तरे द्यावीत, असे म्हणत त्यांची कोंडी केली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी राजाराम कारखान्याच्या मोर्च्यात शेतकरी कमी आणि गुंड जास्त होते. चिटणीसांना मारहाण करून सतेज पाटील यांनी गुंड प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यांनी केली आहे. एकूणच हा प्रकार कोल्हापूरच्या बदलत्या सूडाच्या राजकारणाचा क्ष किरण ठरला आहे.