प्रल्हाद बोरसे

मालेगाव : गिरणा साखर कारखाना खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून जमा केलेल्या शेअर्सच्या रकमेत १७८ कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करणारे खासदार संजय राऊत यांच्याविरुध्द पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेला बदनामीचा खटला आणि जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना झालेली अटक या दोन विषयांवरुन ठाकरे व शिंदे गटात निर्माण झालेले वादंग दिवसागणिक तीव्र होताना दिसत आहे. इतके दिवस केवळ आरोप-प्रत्यारोपांपर्यंत सीमित असलेली ही राजकीय लढाई आता वेगळ्या वळणावर जाऊ लागली आहे. अटकेचा बदला अटक असे गृहितक मांडत सध्या हिरे ज्या तुरुंगात आहेत, त्याच तुरुंगात आणि त्याच कोठडीत भुसे यांना धाडण्याची राऊत यांनी केलेली भाषा, यामुळे ठाकरे-शिंदे गटातील लढाईचा आता पुढला अंक सुरू झाल्याचे प्रत्यंतर येत आहे.

जिल्हा बँकेकडून घेतलेल्या सात कोटी ४६ लाखाच्या कर्ज प्रकरणात फसवणूक केल्याचा गुन्हा हिरे कुटुंबाशी संबंधित सहकारी संस्थेविरुध्द पोलिसांनी मार्च महिन्यात दाखल केला. त्यापूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन अद्वय हिरे हे ठाकरे गटात दाखल झाले होते. त्यानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावला विशाल सभा पार पडली. ठाकरेंच्या सभेनंतर अवघ्या चारच दिवसात जिल्हा बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याप्रकरणी ऐन दिवाळीत म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली. तत्पूर्वी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांना मोठे अग्निदिव्य करावे लागले. मात्र उच्च न्यायालयात जाऊन देखील उपयोग होऊ शकला नाही. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी झाली आहे. गेली तीन आठवडे ते तुरुंगात आहेत. या दरम्यान,हिरे कुटुंबियांशी संबंधित दोन्ही शिक्षण संस्थांविरुद्धही गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू आहे. त्यामुळे हिरे यांना झालेली अटक ठाकरे गटाला चांगलीच जिव्हारी लागली असून ही अटक निव्वळ योगायोग नसून पालकमंत्री दादा भुसे यांचे षडयंत्र त्याला कारणीभूत असल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप आहे.

हेही वाचा… उदय सामंत यांच्या बंधूंचे विनायक राऊत यांच्यासमोर तगडे आव्हान ?

दादा भुसे हे शिंदे गटात दाखल झाल्यापासून ठाकरे गट त्यांना लक्ष्य करत असल्याची वस्तुस्थिती आहे. मालेगावात पार पडलेल्या ठाकरे यांच्या सभेच्या तोंडावर गिरणा कारखाना खरेदीच्या नावाने १० वर्षापूर्वी १७८ कोटींचा शेअर्स घोटाळा करत भुसे यांनी गरीब शेतकऱ्यांना फसविल्याचा गंभीर आरोप करत राऊत यांनी सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा आरोप बिनबुडाचा असल्याचा आक्षेप घेत बदनामीचा खटला भरून भुसे यांनी राऊत यांना मालेगावच्या न्यायालयात खेचले. दोन तारखांना गैरहजर राहिलेले राऊत हे तिसऱ्या वेळी गेल्या शनिवारी न्यायालयात हजर झाले. राऊत यांच्या या मालेगाव भेटीच्या निमित्ताने तगडे शक्तीप्रदर्शन करत जणू एखादा उत्सव साजरा करत असल्याचा आविर्भाव ठाकरे गटाने दर्शविला. शिवाय बदनामीचा हा खटला राऊत यांनी अगदीच हलक्यात घेतल्याचे अधोरेखित होत आहे.

हेही वाचा… बिद्री कारखान्यातील विजयाने के. पी. पाटील यांची विधानसभेची पायाभरणी, चंद्रकांत पाटील यांना धक्का

अद्वय हिरे हे ठाकरे गटात आल्यापासून सूड भावनेने पेटून उठलेले दादा भुसे हे हिरे कुटुंबियांना त्रास देण्याचे उद्योग करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.. २०२४ मध्ये आम्ही सत्तेत आल्यावर संबंधित तपास यंत्रणा त्यांच्या चोख जबाबदाऱ्या पार पाडतील आणि दादा भुसे यांचा हिशेब मग चुकता होईल,अशा आशयाचा इशारा त्यांनी देऊन टाकला. हिरे हे सध्या नाशिकच्या ज्या मध्यवर्ती कारागृहात आहेत, त्याच तुरुंगाच्या कोठडीत भुसे यांना ठेवण्यात येईल, हा माझा शब्द आहे, असा दावा करण्यासही राऊत विसरले नाहीत.

हेही वाचा… नवी मुंबईच्या पाणी वादाला शिंदे-नाईकांच्या संघर्षाची किनार ?

राऊत यांची एवढी टोकाची भाषा आणि त्यांचा एकंदरीत आविर्भाव हा मालेगावात येऊन भुसे यांना शिंगावर घेण्यासारखाच प्रकार. त्यामुळे भुसे यांनी आपणही कमी नसल्याच्या धाटणीतले प्रत्युत्तर राऊत यांना लागलीच देऊन टाकले. अद्वय हिरे हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना दीड कोटीची एकच मालमत्ता तीन वेळा तारण देऊन हिरे कुटुंबाशी संबंधित संस्थेला तीन टप्प्यात सात कोटी ४६ लाखाचे कर्ज वितरण झाले होते. ज्या प्रयोजनासाठी हे कर्ज घेतले गेले, त्यासाठी त्याचा विनियोग न करता भलत्याच ठिकाणी या पैशांची गुंतवणूक केली गेली. अशा परिस्थितीत गुन्हा दाखल करण्याशिवाय बँकेकडे काय पर्याय होता, असा प्रश्न उपस्थित करत राऊत हे फसवणूक करणाऱ्यांची तरफदारी करत असल्याचा हल्लाबोल भुसे यांनी केला. इतकेच नव्हेतर मुंगेरीलाल,दलाल अशी विशेषणे राऊत यांना चिकटवत त्यांनी मालेगावच्या नादी लागू नये, असा गर्भित इशारादेखील भुसे यांनी दिला. या पार्श्वभूमिवर भुसे-राऊत लढत यापुढेही गाजण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader