नागपूर : कथनी आणि करणीत फरक करणारा पक्ष,ही भाजपची नवी ओळख आता अधिक घट्ट होऊ लागली आहे. भाजपने पूर्वीही शिवसेनेसोबतचे मुख्यमंत्रीपदाचे करार मोडले, शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा लाडक्या बहिणींना मानधनवाढ यासारख्या आश्वासनांपासून निवडणुकीनंतर पळ काढला आणि आता नागपूर महापालिकेच्या निवडणुकीतही सुरुवातीस महायुती म्हणून लढण्याचे आश्वासन देऊन आता १२० जागांचे लक्ष्य जाहीर करणे, म्हणजे पुन्हा एकदा आपल्या फायद्याकरिता धोरण बदलण्याचे स्पष्ट उदाहरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा नागपूरसह इतरही महापालिकेच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपने नागपुरात १५१ पैकी १२० जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केल्याचे जाहीर करून भाजपची ‘मनकी बात ’ उघड केली. बावनकुळे म्हणतात त्याप्रमाणे ठरलेले लक्ष्य साध्य करायचे म्हंटले तर भाजपला सर्वच जागा लढाव्या लागणार .याचाच अर्थ हा पक्ष स्वबळाची तयारी करू लागला असा होतो, . हे एकप्रकारे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना “तुमची ताकद फारशी नाही, आमचा विश्वास आमच्यावरच”. हा थेट संदेश देणे आणि “डोमिनंट पार्टनर” म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे,
भाजपसाठी नागपूरचे महत्त्व
नागपूर हे फडणवीस यांचे गृहशहर आणि गेली १५ वर्षे भाजपची सत्ता असलेली महापालिका असल्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी फक्त एक निवडणूक नाही, तर प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे येथे कोणताही प्रयोग न करता “स्वबळावर लढा आणि जास्तीत जास्त सत्ता राखा” ही भाजपची स्पष्ट भूमिका आहे.
महायुतीतील मित्रपक्षाची म्हणजे शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची ताकद नागपुरात नगण्य स्वरुपात आहे. त्यामुळे या पक्षांसाठी एखाद,दोन जागा सोडून महायुती एकत्रित लढणार ,असे चित्र निर्माण करण्यचा प्रयत्न भाजपने सुरूवातीला करून पाहिला. पण मित्रपक्षाकडून जागांची वाढीव मागणी येऊ लागल्यावर मात्र भाजपने स्वबळाचा नारा देणे सुरू केले. बरखास्त महापालिकेत एकसंघ शिवसेना आणि राष्ट्रवादचे प्रत्येकी एक नगरसेवक होते. त्या आधारावर दोन्ही पक्षासाठी प्रत्येकी एक जागा सोडण्याची भाजप तयारी आहे. पण ही बाब या दोन्ही पक्षाना मान्य होणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊनच बावकुळे यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच १२०चा आकडा जाहीर करून मित्र पक्षाला एक प्रकारे इशारा दिला.
भाजपचा स्वबळाचा नारा हा केवळ निवडणूक रणनीती नसून, मित्रपक्षांना कमी लेखण्याची आणि सत्ता केंद्रित ठेवण्याची दीर्घकालीन योजना आहे. नागपूर महापालिकेच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत तणाव उघड झाला असून, भविष्यात हे महायुतीच्या एकतेसाठी घातक ठरू शकते.
मित्रपक्षांची अस्वस्थता आणि स्वतंत्र मोर्चेबांधणी
भाजपने स्वबळाचे संकेत दिल्यावर शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या पक्षाचे नेते व राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी गुरूवारी त्यांच्या रविभवनमधील शासकीय निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची याबाबत चर्चा केली. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या भागातील काही प्रभागांची निवड करून तेथे निवडणूक लढवायची असा या पक्षाचा मानस आहे. त्यादिशेने तयारी केली जात आहे. शिवसेनेला नागपुरात पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर त्यांना भाजपच्या विरोधातच लढावे लागणार हे निश्चित आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी नुकताच नागपूर दौरा केला. त्यांनी शहर अध्यक्ष बदलवून निवडणूक लढण्याचे संकेत दिले. असे झाले तर महायुतीचे तीनही पक्ष स्वतंत्रपणे परस्परांच्या विरोधात लढताना दिसेल, अशी शक्यता आहे.