नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार या माथाडी कामगारांच्या शिखर संघटनेमार्फत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमीत्त वाशीतील बाजार समिती आवारात घेण्यात आलेल्या माथाडी मेळाव्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी फिरवलेली पाठ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर या पट्यातील मुळ भूमीपुत्र असलेले हजारो माथाडी कामगार मुंबई महानगर पट्टयात स्थायीक झाले आहेत. दरवर्षी अण्णासाहेबांच्या जयंतीनिमीत्त वाशीत भरणाऱ्या मेळाव्यानिमीत्त माथाडी संघटना आणि या संघटनेशी संलग्न असलेले नेते जोरदार शक्तिप्रदर्शन करत असतात. मात्र सलग दुसऱ्या वर्षी या मेळाव्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या पक्षाच्या मंत्री, आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने नवी मुंबई केंद्रीत माथाडी बहुल राजकारणाला मुख्यमंत्र्यांनी बगल दिल्याची चर्चा आता रंगली आहे.

मुंबईतील कृषी मालाच्या बाजारपेठा नवी मुंबईत स्थिरावताच तेथील बहुसंख्य व्यापारी आणि माथाडी कामगार हा नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये स्थिरावला. पश्चिम महाराष्ट्रातील आणि विशेषत: सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून विखुरलेला हा कामगार एकेकाळी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची आणि त्यातही शरद पवार यांचा निष्ठावान मानला जात असे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या माध्यमातून वाशी बाजारपेठांमधून कार्यरत असलेल्या या कामगारांच्या भेटीसाठी पवार राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ घेऊन नियमीतपणे वाशी येथील बाजारांमध्ये येत असत. या संघटनेच्या माध्यमातून दिवंगत शिवाजीराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह राजकीय क्षेत्रातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची एक मोठी फौज पवारांनी उभी केली होती. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा क्षेत्रात हा कामगार मोठया संख्येने आहे. ऐरोली विधानसभा क्षेत्रात माथाडी वस्त्यांमधून निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्याही मोठी आहे. या भागातील बडे नेते गणेश नाईक यांनी मोठया चलाखीने यापैकी बहुसंख्य माजी नगरसेवकांना नेहमीच राजकीय बळ दिले. राज्यातील राजकीय गणित बदलल्यानंतर नवी मुंबईतील या माथाडी राजकारणानेही कुस बदलली असून सलग दुसऱ्या वर्षी या मेळाव्याकडे राज्यातील शिषर्थ नेत्यांनी पाठ फिरविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : Tripura : त्रिपुरा दहशतवादमुक्त? ‘एनएलएफटी’ आणि ‘एटीटीएफ’ बंडखोर गटाच्या ६०० सदस्यांचं आत्मसमर्पण

शिंदेसेनेची अनुपस्थिती चर्चेत

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर या संघटनेत भाजपनिष्ठांचा प्रभाव वाढू लागला असून स्वर्गीय अण्णासाहेबांचे धाकटे पुत्र नरेंद्र पाटील यांनी थेट तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ धरल्याने पवारनिष्ठांच्या या समूहात फुट पडल्याचे पहायला मिळाले. साताऱ्यातील कोपरगाव विधानसभेचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर तर नरेंद्र पाटील गट येथे आणखी सक्रिया झाल्याचे दिसले. दरम्यान पाटील यांच्यामुळे गेल्या काही वर्षापासून माथाडी मेळाव्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती येथे नियमीत दिसू लागली आहे. असे असताना सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या या मोठया मेळाव्याकडे फिरविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळचे सातारा जिल्ह्यातील असलेले मुख्यमंत्री या मेळाव्यास येतील अशी माथाडी नेत्यांना आशा होती. असे असताना यंदाही मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. सातारा जिल्ह्याचे शिंदेसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. मराठा बहुसंख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या या मेळाव्यास देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मात्र मोठया संख्येने उपस्थित असल्याचे पहायला मिळाले. शिंदेसेनेच्या स्थानिक नेत्यांनीही या मेळाव्याकडे पाठ फिरविल्याने माथाडी संघटनेतून ठराविक राजकीय पक्षाला दिले जाणारे बळ शिंदेसेनेला मान्य नसल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. नवी मुंबई केंद्रीत माथाडी राजकारणाला बगल देऊन मराठा आणि माथाडी बहुल राजकारणाची नवी आखणी करण्याचे मत शिंदेसेनेतील काही नेते खासगीत व्यक्त करु लागले असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा : Haryana Assembly Election 2024: कधीच न जिंकलेल्या मतदारसंघासाठी भाजपाची रणनीती; हरियाणातील या जागेवर प्रतिष्ठा पणाला!

स्वर्गीय अण्णासाहेबांच्या जयंती सोहळ्यानिमीत्त आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यास उपस्थित रहाण्याची पुर्ण इच्छा होती. मात्र काल रात्रीपासून मला ताप भरल्याने या मेळाव्यास उपस्थित रहाणे शक्य होऊ शकले नाही. मुख्यमंत्र्यांनाही पुर्वनियोजीत कार्यक्रमामुळे या मेळाव्यास येता आले नसले तरी कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही सगळे सदैव सक्रिय आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नरेश म्हस्के, खासदार शिवसेना

या मेळाव्याचे रितसर निमंत्रण मुख्यमंत्री तसेच स्थानिक नेत्यांना दिले होते. स्वर्गीय अण्णासाहेबांच्या जयंतीनिमीत्त होणारा हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो. त्यामुळे अण्णासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या कुणीही या मेळाव्यास येऊ शकतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हे सरकार कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच सकारात्मक राहीले आहेत.

नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ