पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात चुरस निर्माण झाली असतानाच पुणे महापालिकेतील भाजपचे मात्र मूळचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ माजी नगरसेवक हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याने भाजपची त्यांना थोपविण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. मतदानाला थोडा अवधी राहिला असताना या नगरसेवकांच्या वेगळ्या भूमिकेची दखल भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांना घ्यावी लागली असून, मतदानाच्या दिवशी दगाफटका झाल्यास आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना विचार केला जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे. या नगरसेवकांच्या पवित्र्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली असून, मतदान होईपर्यंत त्यांना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील यंदाच्या निवडणुकीत भाजपचे मोहोळ, काँग्रेसचे धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अनिस सुंडके हे चार प्रमुख उमेदवार हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्षाच्या माध्यमाबरोबरच स्थानिक नगरसेवकांच्या संपर्कात राहून प्रचार करण्यावर या उमेदवारांनी भर दिला आहे. भाजपच्यादृष्टीने आतापर्यंत सोपी वाटणारी ही निवडणूक धंगेकर यांच्या उमेदवारीमुळे चुरसीची झाली आहे. भाजपचे महापालिकेमध्ये ९८ नगरसेवक होते.. त्यातील ३५ नगरसेवक हे मूळचे भाजपचे नसून, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला सकारात्मक वातावरण असल्याचे पाहून त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापैकी २७ नगरसेवक हे काँग्रेसच्या गळाला लागले असल्याचे समजते.

आणखी वाचा-अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात आदित्य ठाकरे तर वायकरांसाठी योगी आदित्यनाथ

संबंधित नगरसेवक हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे लक्षात आल्यावर भाजपची धावाधाव सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन प्रचाराबाबत सूचना केल्या. मात्र, त्यानंतरही २७ नगरसेवकांनी गुप्तपणे वेगळी भूमिका घेतल्याने भाजपपुढे त्यांना रोखण्याचे आव्हान उभे राहिले असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यावर काँग्रेसचेच लक्ष

भाजपचे २७ नगरसेवक हे काँग्रेसच्या संपर्कात असतानाच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला काँग्रेसनेच दूर ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संबंधित नेते हे प्रारंभी प्रचारामध्ये होते. मात्र, त्यांचा संपर्क भाजपशीही असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना काँग्रेसचे कटाक्षाने प्रचारापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे सध्या ते नेते प्रचाराच्या ठिकाणी दिसले, तरी त्यांच्या हालचालींवर काँग्रेसकडून लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी वाचा-रायबरेलीत प्रचार करताना प्रियांका गांधी का काढत आहेत १९२१ च्या हत्याकांडाची आठवण?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पुण्यात तळ ठोकून

धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस उघड झाली होती. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर काँग्रेसच्या राज्याच्या नेत्यांनीही पुण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील सहा आमदारांना पुण्यातील सहा विधानसभा मतदार संघांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून प्रमुख नेते हे पुण्यात येऊन आढावा घेत आहेत. सांगली लोकसभा मतदार संघातील मतदान झाल्यानंतर आमदार विश्वजीत कदम यांनी पुण्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे मात्र भाजपमध्ये गेलेले नगरसेवक हे पुन्हा काँग्रेसच्या संपर्कात आले असल्याची चर्चा आहे.

‘एमआयएम’च्या पुण्यातील एकमेव नगरसेविका अश्विनी लांडगे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एमआयएमचे उमेदवार सुंडके यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune 27 former corporators are in touch with the congress bjp struggle to stop them print politics news mrj
First published on: 10-05-2024 at 15:57 IST