पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन कसब्याच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची तयारी केली असतानाच पक्षांतर्गत नाराजी अद्यापही दूर झालेली नसल्याचे चित्र आहे. पुण्यातून काँग्रेसला विजयाची आशा वाटत असताना स्वाकियांकडूनच धोका असल्याचे लक्षात आल्यावर याची गंभीर दखल केंद्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. केंद्रातून काँग्रेसने खास निरीक्षक पथक पुण्यात पाठवले असून या पथकाकडून आता विरोधकांच्या हालचालींपेक्षा पक्षांतर्गत स्वकियांवर लक्ष ठेवण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.

काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर अद्यापही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होत नसल्याची बाब आता केंद्रीय पातळीवर पोहोचली आहे. काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. आमदार धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही प्रचारासाठी प्रमुख पदाधिकारी मनापासून एकत्र येत नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरून याची दखल घेण्यात आली आहे. त्यासाठी विशेष निरीक्षक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाकडून काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी कोणकोणत्या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, याची माहिती संकलित करून ती केंद्रीय पातळीवर पाठवली जाणार आहे. त्यानंतर केंद्रीय पातळीवरून येणाऱ्या सूचनांनुसार स्थानिक पातळीवरील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काम करावे लागणार असण्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.

हेही वाचा : सांगलीतील ‘ती’ अदृश्य शक्ती कोणती ?

पक्षविरोधी कारवायांवर लक्ष

काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील नाराजी दूर करण्याची जबाबदारी या निरीक्षक पथकावर देण्यात आली आहे. तसेच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर या पथकाचे बारकाईने लक्ष असणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय पथकाकडे पक्षविरोधी कारवायांवर लक्ष ठेवण्याबरोबरच उत्तर भारतीय मतदारांना मतदानाच्या दिवशी थोपवण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. पुण्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. पुण्यामध्ये उत्तर भारतीय मतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संबंधित मतदार हे मे महिन्यामध्ये मूळ गावी जात असतात. त्यांना मतदानासाठी थांबवण्याची जबाबदारी संबंधित केंद्रीय पथकावर देण्यात आली आहे. या पथकांमध्ये उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मतदारांना मतदानाच्या दिवसांपर्यंत पुण्यात थांबून त्यांच्याकडून मतदान करून घेण्याचे काम सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : कोल्हापुरात छत्रपती-मंडलिक घराणे १५ वर्षांनंतर पुन्हा समोरासमोर

भाजपमध्येही कुरबुरी

भाजपाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर वडगाव शेरीचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे नाराज झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांना मुळीक हे अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर भाजपमधील नाराजी ही उघड झाली होती. मात्र, सध्या तरी भाजपाला अंतर्गत नाराजी दूर करण्यात काही प्रमाणात यश आले असल्याचे दिसून येते.