गडचिरोली : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना गडचिरोली-चिमूरसाठी महायुती आणि महाविकासआघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केली. विद्यमान खासदार अशोक नेते यांना संधी देत भाजपने जुन्याच चेहऱ्यावर डाव खेळला. मात्र, काँग्रेसकडून नामदेव किरसान यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी दिल्याने महाविकासआघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. याच कारणांमुळे आधी कोडवते दाम्पत्य, त्यांनतर माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता आघाडीतील काही घटक पक्ष नाराज असल्याने ऐन निवडणुकीत काँग्रेसपुढे नाराजी दूर करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून तीन निवडणुका पार पडल्या. यात एकदा काँग्रेसकडून मारोतराव कोवासे तर दोनदा भाजपचे अशोक नेते यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या तिन्ही निवडणुकांमध्ये ओबीसी आणि आदिवासी मतदारांची भूमिका महत्वाची होती. सोबतच लहान पक्षांना दीड लाखांहून अधिक मिळाली मते लक्षणीय होती. ही मते भाजपा आणि काँग्रेसकडे कधीच गेली नाहीत. त्यामुळे यंदाही भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत असल्याने या मतांचा दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक बहुसंख्यांक आदिवासी जमतीचीच मते विजेता ठरवणार. परंतु भाजपने आणि काँग्रेससोडून भाजपावासी झालेले माजी आमदार डॉ. उसेंडी यांनी काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान हे येथील बहुसंख्यांक आदिवासींचे प्रतिनिधी नसून बाहेर जिल्ह्यातील असल्याचा प्रचार सुरू केल्याने काँग्रेसची चांगलीच अडचण झाल्याचे चित्र आहे. सोबतच महाविकास आघडीतील घटक पक्ष शेकाप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील नेते काँग्रेसवर नाराज असल्याने यात अधिक भर पडली आहे. तर काँग्रेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतील ती पूर्व दिशा, अशी परिस्थिती असल्याने ऐन निवडणुकीत नाराजीनाट्य सुरू झाले आहे.
दुसरीकडे प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार किरसान यांचा विजय केवळ औपचारिकता असल्याचे सांगत सुटले आहे. परंतु उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेससोडून गेलेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. चंदा कोडवते आणि डॉ. नितीन कोडवते हे त्यांचेच कट्टर समर्थक होते. उसेंडी यांनी तर काँग्रेसमध्ये पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत गडचिरोलीतील महत्त्वाचे दोन नेतेही होते. त्यांचा पूर्ण रोख विजय वडेट्टीवार यांच्याकडे होता. त्यानंतर उसेंडी यांनी पक्ष सोडला मात्र, ते दोघे पुन्हा वडेट्टीवारांच्या मांडीला मांडी लावून प्रचारात दिसून येत आहेत. यामुळे काँग्रेसमधीलच एक गट नाराज आहे. अशा परिस्थितीत राजकीय आणि जातीय समीकरणात समतोल साधण्याचे काँग्रेसपुढे आव्हान उभे राहिले आहे.