पुणे: महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजप स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असताना मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षांनी महायुती झाली तर ठीक; नाहीतर ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकीत महायुती होणार की नाही, हे वरिष्ठांच्या मर्जीवर अवलंबून असले, तरी तिन्ही पक्ष स्वबळाच्यादृष्टीने तयारीला लागल्याने इच्छुकांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर असताना महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा प्रयत्न आहे. मात्र, काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास वेगळी भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्ट केले. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीतही भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मूकसंमती मिळाल्याने भाजपमधील इच्छुक आतापासूनच तयारीला लागले आहेत.

पुणे महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत १६२ नगरसेवकांपैकी ९७ नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ आणि शिवसेनेचे दहा नगरसेवक होते. सद्य:स्थितीत शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या १०३ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर अजित पवार यांच्याकडे बहुसंख्य नगरसेवक आले आहेत. मात्र, शिवसेना (शिंदे) पक्षाकडे अवघा एकच नगरसेवक आहे. पाचजण भाजपकडे आणि चौघे शिवसेना (ठाकरे) पक्षात आहेत.

महायुती झाल्यास भाजपकडून १०३ जागांसाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’पुढे अडचण निर्माण होणार आहे. इच्छुकांना उमेदवारी देताना या पक्षाची दमछाक होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपनंतर पुण्यात ताकद असलेली अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जास्त जागांची मागणी झाल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा आग्रह धरण्यात येत आहे. शिवसेनेचा सध्या एकच माजी नगरसेवक असला, तरी पुण्यात शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडूनही दहापेक्षा जास्त जागांची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे भाजपने सावध भूमिका घेत महायुतीपेक्षा स्वबळावर निवडणुका लढण्यावर जोर दिला आहे. निवडणुकांनंतर महायुती म्हणून एकत्र येऊ, तोपर्यंत आपापल्या ताकदीवर निवडणुका लढण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यादृष्टीने त्यांनीही तयारी सुरू केली आहे.