सांगली : महापालिका निवडणुकीची तारीख अनिश्चित असली तरी अन्य पक्षापेक्षा भाजपअंतर्गत वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापालिकेतील एका गटाने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या वारसदार चिरंजीवांना पुढे करून दहीहंडीचे औचित्य साधून ताकद अजमावण्याचा प्रयत्न चालवला आहे, तर जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना सोबत घेऊन पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक तथा भाजपचे प्रदेश अनुसूचित जातीजमाती सेलचे सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे महायुतीची दहीहंडीचे तोरण बांधण्याच्या तयारीला लागले आहेत. यामुळे दहीहंडीच्या दोन कार्यक्रमांतून एकमेकांना शह काटशह देण्याचे प्रयत्न आगामी राजकीय संघर्षाची दिशा निश्चित करणारा ठरेल. सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी असतानाच आता शहरातील दोन गट समोरासमोर आले आहेत.

महापालिकेची मुदत संपली असली तरी आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी राजकीय पक्षातून सुरू झाली असून यंदा प्रथमच भाजपमध्ये दोन गट पडले असून दोन्ही गटाच्यावतीने दोन स्वतंत्र दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन स्वतंत्र दहीहंडीच्या कार्यक्रमाची जाहिरातबाजी समाज माध्यमावर होत असून एक कार्यक्रम पालकमंत्री सुरेश खाडे युवा मंच यांच्यावतीने तर दुसरा कार्यक्रम महायुतीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या गटातच दुफळी पडल्याचे मानले जात आहे. या दुफळीमागे महापालिकेतील एका ताकदवान नेत्याचा हात असल्याने आगामी महापालिका निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा – केंद्राच्या घोषणाबाजीमुळे ‘इंडिया’समोर अजेंडा निश्चितीचे आव्हान

महापालिका निवडणुका समोर ठेवून पालकमंत्री सुरेश खाडे यांचे स्वीय सहायक तथा भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे यांनी मोचेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या गटाच्या अनिता वनखंडे या मावळत्या सभागृहामध्ये समाज कल्याण समितीच्या सभापती होत्या. या माध्यमातून प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी खर्च करण्यात आला आहे. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून सुमारे ७८ कोटींच्या विकास कामांना गेल्या आठ महिन्यांत म्हणजे श्रीमती वनखंडे यांच्या कारकीर्दीत मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून वनखंडे यांच्या भाजप अंतर्गत गटाची महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोर्चेबांधणी सुरू आहे. याला शह देण्यासाठी माजी सभापती सुरेश आवटी यांनीही पालकमंत्री खाडे यांचे पुत्र सुशांत खाडे यांना पुढे करून युवा मंचच्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मावळत्या महापालिकेत आवटी गटाचे संख्याबळ १२ पर्यंत होते. या बळाच्या जोरावर त्यांनी दोन्ही पुत्रांसाठी स्थायी समितीचे सभापती पद घेतले. यापुढेही महापालिकेत आवटी गटाचेच प्राबल्य राहावे अशा हेतूने त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, याला पायबंद घालण्याचे काम वनखंडे यांचा गट करू शकतो हे ओळखूनच राजकीय डावपेच आखले जात असून यासाठी आपल्या गटाची बांधणी सुरू केली आहे. या मोर्चेबांधणीचा एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात खाडे पुत्राच्या सत्काराचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी पालकमंत्री तोंडाने फटकळ असले तरी मनाने चांगले असल्याचे प्रमाणपत्र देत आता महापालिकेतील सत्तेच्या चाव्या चिरंजीवाकडे देण्याचे आवाहन केले. मात्र, यावर पालकमंत्री खाडे यांनी अद्याप काहीच निर्णय देऊ शकत नसल्याचे सांगत या गटाच्या मागणीवर सोयीस्कर मौन बाळगले. दरम्यान, यावेळीच दहीहंडी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले.

हेही वाचा – लोकांमध्ये नाराजी असल्याचे सर्वेक्षणामधून कळताच भाजपाकडून एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी कपात

सुरेश खाडे युवा मंचच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संदेश समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येत असून या जाहिरातीवर सुरूवातीला प्रा. वनखंडे यांचे छायाचित्र टाळण्यात आले होते. मात्र, पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्यानंतर दुसर्‍या जाहिरातीमध्ये त्यांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला असला तरी दर्शनी छायाचित्र पालकमंत्री व त्यांच्या चिरंजीवांचेच आहे. दुसर्‍या बाजूला महायुतीच्यावतीने ९ सप्टेंबर रोजी स्वतंत्रपणे दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या जाहिरातीवर प्रा. वनखंडे आणि जनसुराज्य युवा शक्तीचे कदम यांचे छायाचित्र आहे. तसेच भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीतील अन्य घटक पक्षांच्या नेत्यांचीही छायाचित्रे या जाहिरातीवर आहेत. या माध्यमातून महापालिका निवडणुकीची भाजपअंतर्गत मोर्चेबांधणी करत असताना आपल्या गटाचीही मोर्चेबांधणी भाजपअंतर्गत सुरू असल्याचे दिसून येत आहे.