सांगली : महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब पटकावणारे पैलवान चंद्रहार पाटील यांनी अखेर शिवबंधन हाती बांधत राजकीय स्थैर्य सध्या तरी मिळवले. यामुळे सांगली लोकसभेसाठीचा संभ्रम मात्र अभूतपूर्व वळणावर पोहचला असून महाविकास आघाडीमधून सांगलीची जागा उबाठा शिवसेनेला की काँग्रेसला याबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये सांगलीची जागा भाजपला मिळणार हे स्पष्ट असताना महाविकास आघाडीतील संभ्रम चक्रावून टाकणारा तर आहेच, पण यामागे आघाडीतील काही शुक्राचार्यही या एकूण संभ्रमावस्थेला कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे. काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळावी अशी एकमुखी मागणी करत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आ. डॉ. विश्‍वजित कदम यांचे नेतृत्व मान्य केले आहे. हीच आघाडीतील मित्रपक्षाच्या नेत्याची डोकेदुखी ठरलेली आहे का अशी शंका व्यक्त केली जात असून या सर्व घडामोडीमागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हेच कारणीभूत असल्याची दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे.

हेही वाचा : बसपच्या मुस्लीम उमेदवारांमुळे सपा-काँग्रेस अडचणीत; मायावतींची निवडणूक रणनीती काय?

काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय सांगलीतून घेतला जात असे. त्यावेळी काँग्रेस भक्कम होती. आता गत निवडणुकीपासून काँग्रेसची उमेदवारी घ्यायलाच नको अशी भूमिका काहींनी घेतली. यामुळे २०१९ मध्ये सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली. या संघटनेतून तुल्यबळ उमेदवार मिळणार नाही हे ज्ञात असल्याने विशाल पाटील यांनाच उसनवारीवर उमेदवार म्हणून देण्यात आले. यावेळी मात्र गेल्या सहा महिन्यापासून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच असल्याचे सांगण्यात येत असताना गेल्या आठ दिवसापासून शिवसेना चर्चेच्या केंद्रस्थानी आली. मतदार संघामध्ये एकाही ग्रामपंचायतीची सत्ता हाती नाही, पक्ष कार्यकर्ते्रविखुरलेले, महापालिकेत एकही सदस्य नाही असे असताना अचानक शिवसेनेची ताकद वाढली असल्याचा साक्षात्काळ मुंबईच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना व्हावा याबाद्दल आश्‍चर्य तर वाटतेच पण उमेदवारीसाठी ज्या पैलवान पाटलांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे, त्या पाटलांनी भाजपसह राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीची दारे महिनाभरात ठोठावली आहेत. मग अशांना ऐनवेळी उमेदवारी दिली तर भाजपला मदत करण्यात आल्याचाच प्रकार घडणार नाही का अशी रास्त शंका राजकीय क्षेत्रात उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा : धाराशिवमधून निवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांना भाजपची उमेदवारी ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेच्या आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या. यापैकी १६ वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असून १६ पैकी १२ वेळा ही जागा स्व.वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवारच खासदार म्हणून निवडून आले आहेत. बदलत्या परिस्थितीत दादा घराण्याचे राजकीय वर्चस्व कमी होत आहे. असे असताना दरबारी राजकारणात आणि शह-काटशहाच्या राजकारणात या घराण्याला आता राजकीय अस्तित्वासाठीचा संघर्ष करावा लागत आहे. यामागे या घराण्यातील वारसदारांचे चुकते की राजकीय आडाखे चुकत आहेत याचा वारसदारांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अगदी महापालिका, जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीची आपल्या समर्थकांना उमेदवारी देत असतानाही या घराण्यातील लोकांना टोकाचा संघर्ष करावा लागतो आहे. आताही लोकसभेच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेला संभ्रम हा दादा-बापू राजकीय वादाचा पुढचा टप्पा तर नव्हे ना? जर असेल तर स्व. मदन पाटील यांनी अपक्ष मैदानात उतरून मै हूं ना ही घोषणा करत धडक दिली तो संघर्ष या घराण्याच्या वाट्याला पुन्हा आला आहे आता, गप्प बसायचे की लढायचे याचा निर्णय पुढच्या राजकीय वाटचालीसाठी दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.