सांंगली : महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेचा पेच सुटेपर्यंत आपण काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीस उपस्थित राहू शकत नसल्याचे पत्र माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. पत्रप्रपंचेने काँग्रेस श्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न आता आमदार कदम यांनी केला असून याची फलनिष्पत्ती नेमकी काय होते हे दोन दिवसांत कळणार आहे. प्रदेश प्रचार समितीची मुंबईत बैठक होत असून या बैठकीत आमदार कदम यांच्या बहिष्कारास्त्राचा काय उपयोग होतो हेही कळेल आणि उरल्यासुरल्या काँग्रेसमध्ये सांगलीकरांची ताकदही दिसणार आहे. उमेदवारीचा तिढा आता निर्णायक वळणावर पोहचला असून एकतर उमेदवारी अथवा मैत्रीपूर्ण लढत हे दोनच पर्याय सध्या दिसत आहेत.

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा गेल्या पंधरा दिवसापासून तिढा सुरू आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिल्याच्या बदल्यात ठाकरे शिवसेनेने सांगलीच्या जागेची मागणी केली. केवळ मागणीच नाही तर उमेदवार जाहीर करून प्रचार यंत्रणाही कार्यान्वित केली. मात्र पक्षाची ताकद, मेरिट यावर आधारित चर्चा करण्याची मागणी करत काँग्रेसने या जागेचा आग्रह कायम धरला. अगदी दिल्लीपर्यंत धडक देउनही अद्याप ठाकरे सेनेने काँग्रेसच्या दबावाला न जुमनता आपला हट्ट कायमठेवला आहे. पक्षाकडे सांगलीसाठी सक्षम उमेदवार नसताना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेउन उमेदवारीही जाहीर करत प्रचाराचा शुभारंभही केला.

हेही वाचा : मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा बैठकांवर जोर, मराठा भवन बांधून देण्याचे आश्वासन

काँग्रेसने सांगलीसाठी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठीचा आग्रह कायम ठेवत उमेदवारी बदलाची मागणी अजून लावून धरली असून या मागणीला प्रदेश समितीनेही अनुकूलता दर्शवत प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्यायही समोर ठेवला आहे. मात्र, मविआमध्ये मैत्रीपूर्ण लढत भाजपला हरविण्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासणारा ठरणार असल्याने सेनेने याचे परिणाम अन्य मतदार संघातील काँग्रेस उमेदवारावर होउ शकतील असा गंभीर इशाराही दिला आहे. याचे पडसाद कोल्हापूरमध्ये दिसून आले. सांगलीत ठाकरे सेनेला काँग्रेसकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न होताच, कोल्हापूरमध्ये शिवसेनेने काँग्रेसचा प्रचार थांबविण्याचे आवाहन करत तसा संदेश समाज माध्यमावर प्रसारित करून धोययाचा इशारा दिला आहेच.

हेही वाचा : ठाणे हवे आहे, पण धनुष्यबाण नको; गणेश नाईकांपुढे नवे सत्तासंकट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांगलीमध्ये या लोकसभा निवडणुकीवेळी कधी नव्हे ते काँग्रेसचे सर्व गट एकसंघपणे आमदार कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्री पाटील हे सर्व एकत्रितपणे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. आता तर आमदार कदम यांनी प्रदेश समितीला पर्यायाने पक्षश्रेष्ठींनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. जर काँग्रेसला उमेदवारी मिळालीच नाही तर टोकाची भूमिका घ्यायला लागली तर ती घेउ असा इशाराही त्यांनी दिला असल्याने सांगलीच्या जागेबाबत सन्मान्य तोडगा काढणे जशी काँग्रेस श्रेष्ठींची जबाबदारी आहे तशीच ठाकरे सेनेचीही जबाबदारी आहे. कारण काँग्रेसला वगळून ठाकरे सेनेला सांगलीत यश मिळणे महाकठीण ठरणार आहे. आता यावर महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार कसा मार्ग काढतात यावर पुढील राजकीय चित्र अवलंबून राहणार आहेत. आता काँग्रेस व ठाकरे सेनेची अवस्था सहनही होत नाही, अन् सांगताही येत नाही अशी झाली आहे.