सांगली : लोकसभा निवडणुकीचे रणांगण अद्याप सुरू झालेले नसताना खानापूर-आटपाडीमध्ये मात्र विधानसभेसाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू असून राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील घटक पक्षामध्येच आमदारकीसाठी आतापासूनच इशारे-प्रतिइशारे देत विद्यमान आमदार अनिल बाबर यांना शह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता यापुढे या मतदार संघाचा आमदार आटपाडी तालुक्याचा असेल ,असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी दिला आहे. यामुळे लोकसभेपाठोपाठ होणार्‍या विधानसभा निवडणुकीवेळी खानापूर-आटपाडीची निवडणुक लक्षवेधी तर ठरणार आहेच, पण याचबरोबर महायुतीतील अंतर्गत कलहाचा नमुना ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यात शिवसेनेत बंडाळी होउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडून आपला गटच खरी शिवसेना म्हणून भाजपला साथ देत राज्यात सत्तांतर घडवून आणले. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरत, गोहत्तीला जात असताना त्यांना सर्वात अगोदर साथ देणार्‍यामध्ये खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर होते. राज्यात मंत्रीमंडळात आमदार बाबर यांना प्राधान्याने संधी मिळेल असे वाटत असतानाच मंत्रीमंडळ विस्तारही रखडला आहे. यामुळे सत्तेत सहभागी असूनही काही सदस्यांमध्ये अद्याप अस्वस्थता कायम आहे. अपात्रतेबाबतचा निर्णय सभापती काय घेतात यावर मंत्रिमंडळ विस्तार अवलंबून असल्याचे सांगण्यात येत असले तरी राजकीय अस्वस्थता कायम राहिली आहे. यामुळे आमदार बाबर जेष्ठ सदस्य असूनही त्यांना मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले आहे. यातच आता राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या सहकार्‍यासह सत्तेत सहभाग घेतला असल्याने शिवसेनेतील सदस्याबाबत भाजपलाही फारसे औत्सुक्य आता उरलेले नाही.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
mla babula chowdhary
New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन

हेही वाचा : जनलोकपाल ते मराठा आरक्षण, व्यवस्था बदलणारी दोन आंदोलने; अण्णा हजारेंप्रमाणे मनोज जरांगेंमुळे सत्तापालट होईल? 

मुंबईच्या राजकीय पटलावर आमदार बाबर यांचे महत्व कमी झाले की काय अशी स्थिती असताना मतदार संघातील स्थानिक भाजप नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. खासदार संजयकाका पाटील आणि आमदार बाबर यांचे यशवंत कारखान्यावरून वाद तर आहेच, पण आता आमदार गोपीचंद पडळकर यांनीही कोणत्याही स्थितीत आमदार बाबर यांना पुन्हा आमदार होऊ देणार नाही अशी वक्तव्ये केली आहेत. तर विटा शहरात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनीही आमदारकीसाठी तयारी सुरू केली आहे. टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे श्रेय केवळ आमदार बाबर यांचे नसून यामध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही योगदान असल्याचे सांगत आनंदोत्सव साजरा केला. बदलत्या राजकीय हवेचा परिणाम म्हणून त्यांनी आमदार जयंत पाटील यांची साथ सोडून अजितदादा गटात सहभागी होत या गटाचे जिल्हाध्यक्ष पदही पटकावले आहे. यामुळे महायुतीतच विधानसभेसाठी साठमारी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये भाजप आणि काँग्रेसकडून अजित पवार लक्ष्य !

या मतदार संघात खानापूर आणि आटपाडी या दोन तालुययांचा समावेश आहे. आजपर्यंत या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व बहुसंख्यवेळा खानापूर तालुययातच स्थिरावले असले तरी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुख यांना संधी मिळाली होती. मात्र, त्यानंतर प्रयत्न करूनही आमदारकी आटपाडीला मिळालेली नाही. हीच बाब अधोरेखित करीत आमदार पडळकर यांच्या गटाने आता पुढची आमदारकी आटपाडीलाच मिळायला हवी असा चंग बांधला असून माजी आमदार देशमुख यांना पुन्हा एकदा मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, याचवेळी देशमुख वाड्यावरही राजकीय मतभेदांची दरी निर्माण झाल्याचे दिसत असून धाकटे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख आमदार बाबर यांच्या तंबूत गेले असल्याची चर्चा आहे. माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीतून देशमुख गटाने घेतलेली माघार, जिल्हा बँक आणि आटपाडी बाजार समितीच्या निवडणुकीत झालेला पराभव ही यामागील कारणे असल्याचे सांगितले जात असले तरी आटपाडीच्या राजकारणातील देशमुख वाड्याचा प्रभाव कमी होत चालला असल्याचे दिसत आहे. यातच आमदार बाबर यांचे समर्थक जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा वाढता प्रभावही जसा देशमुख गटाला असह्य होत आहे तसाच आमदार बाबर यांच्या ताकदीलाही आव्हान निर्माण करणारा ठरत आहे. यामुळे पुढचा आमदार आटपाडीचाच ही आमदार पडळकर गटाची घोषणा भविष्यात केवळ बाबरांना विरोध म्हणून आहे की, तानाजी पाटलांचे वर्चस्व कमी करण्यासाठी आहे हे नजीकच्या काळातच दिसेल.