एजाज हुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्याच्या भेटीवर आलेले उद्धव ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यातून मुक्त संवाद साधताना बाधित शेतकऱ्यांसह तरुणांना आदित्य ठाकरे यांनी आपलेसे केले. त्याचवेळी शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेताना त्यांनी देशमुख कुटुंबीयांसह शेकापशीही जवळीक साधताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात सूचक संदेश दिला आहे. या निमित्ताने सांगोल्यातील वातावरण ढवळून काढल्याचे दिसून आले.

हेही वाचा… राहुल गांधींच्या सभेला जाणाऱ्या यात्रेकरूंसोबत रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक

गेल्या जून महिन्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी केली असता त्यांच्या सोबत गेलेल्या ४० आमदारांमध्ये सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील हे संपूर्ण मराठी विश्वात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. गुवाहाटीतील मुक्कामात ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटिल… समदं ओक्के’ या रांगड्या आणि माणदेशी ढंगाच्या भाषाशैलीतून केलेल्या संवादामुळे ॲड. शहाजीबापू यांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त झाले होते. पट्टीचे वक्ते असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाषणांसाठी मागणी होऊ लागली. या मिळालेल्या संधीतून ॲड. शहाजीबापूंनीही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडण्याचे सत्र आरंभले होते.

हेही वाचा… शिवराज मोरे : विद्यार्थी चळवळीतून राजकारणात

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेने ॲड. पाटील यांना विशेष लक्ष्य केले आहे. यापूर्वी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी सांगोल्यात ॲड. शहाजीबापूंच्या मतदार संघात येऊन त्यांचा समाचार घेतला होता. त्यानंतर आता युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही ओल्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या निमित्ताने सांगोल्यात येऊन ॲड. शहाजीबापूंच्या विरोधात राजकीय समीकरण तयार करण्याचा संदेश दिल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना आदित्य ठाकरे यांनी बाधित शेतकऱ्याने व्यथा तेवढ्याच गांभीर्याने जाणून घेतल्या. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान होऊनही नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतही मिळाली नाही. शेतकऱ्याने बांधावर अद्यापही कोणी सत्ताधारी आला नाही. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांना आधार देण्यापेक्षा सत्तेच्या राजकारणात रस आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारची खिल्ली उडविली.

हेही वाचा… Maharashtra News Live : शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू; वाचा राज्यभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी

संगेवाडी, मांजरी आदी गावांतील बाधित शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शेतकरी आणि तरुणांशी संवाद साधत असताना महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांनीही आदित्य यांना आवाज दिला आणि त्यांनी विद्यार्थ्यांचीही भेट घेऊन मुक्त संवाद साधला. शेतकऱ्यांनी मांजरी गावातील बंधारा ढासळला आहे. तो तात्काळ दुरुस्त करण्याची गरज असल्याची बाब निदर्शनास आणली. तेव्हा सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा नामोल्लेख टाळून आदित्य ठाकरे लगेचच मिस्कीलपणे म्हणाले, ‘हा बंधारा खेकड्यांमुळे तर ढासळला नाही ना? नाही तर येतील आणि पुन्हा हेच बोलतील…’ आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांचाही नामोल्लेख टाळून आदित्य ठाकरे यांनी त्यांचीही खिल्ली उडविली. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी सांगोल्याची शान संपूर्ण देशात वाढविली होती. परंतु ही शान आता एका माणसामुळे कमी झाल्याचा आरोप केला. यानंतर त्यांनी गणपतराव देशमुख यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या शालीन नेतृत्वाचा गौरव केला. या वेळी त्यांनी गणपतरावांचे पुत्र चंद्रकांत देशमुख व पुत्र डॉ. अनिकेत देशमुख आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांचीही आवर्जून भेट घेतली. या भेटीतून सांगोला तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणाच्या संदर्भात वेगळा संदेश देण्यात आल्याचे बोलले जाते. याच माध्यमातून स्थानिक उद्धव ठाकरे शिवसेनेला नव्याने उभारी देण्याचा प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangola tour aditya thackeray criticized shahajibapu print politics news asj
First published on: 11-11-2022 at 12:19 IST