विजय पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कराड : शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी चळवळीतून त्यांचे नेतृत्व पुढे आले. वारकरी संप्रदायातील कुटुंब आणि काँग्रेसच्या विचारांचा घरचा वारसा यातून काही दिवसांतच हे नेतृत्व समाजाभिमुख झाले. काँग्रेसमध्ये त्यांच्या कामाची चर्चा होऊ लागली. याच वेळी योगायोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी निवडणुकीतून घेण्याचा निर्णय घेतला. सन २०१० च्या पहिल्याच निवडणुकीला थेट सामोरे जात देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले, ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष बनले. सातारा जिल्ह्यातील शिवराज मोरे यांचा हा प्रवास लक्ष वेधून घेणारा.

हेही वाचा… देवराव भोंगळे : अभ्यासू व्यक्तिमत्त्व

परिसरातील लोकांचे प्रेम, आपुलकीमुळेच शिवराज यांच्या आजी कमल मोरे आणि पुढे वडील बापूसाहेब मोरे हे कराड नगरपालिकेत निवडून गेले. ३४ वर्षीय शिवराज यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली तरी घरचा मुद्रण उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी पुण्याच्या विद्यार्थी गृहात छापाई तंत्रज्ञान विषयाच्या पदविका शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथे जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले. त्यांनी विद्यार्थी काँग्रेसची शाखा येथे उघडून संघटनात्मक कार्याचा श्रीगणेशा केला. लगेचच या संघटनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी. नंतर राज्य सचिव म्हणून ते निवडले गेले. त्यातून त्यांनी विशेषतः महाविद्यालयीन तरुणांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या कामगिरीने त्यांच्याबाबत अपेक्षा निर्माण झाल्या. काँग्रेसमध्ये त्यांच्या कामाची चर्चा होवू लागली.

हेही वाचा… अंबादास दानवे : संघटनेस आकार देणारा आक्रमक नेता

याच वेळी योगायोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. सन २०१० च्या पहिल्याच निवडणुकीला थेट सामोरे जात शिवराज मोरे देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष ठरले. हा पदभार दोन वर्षे यशस्वीपणे पेलल्याने ते २०१२ मध्येही पुन्हा निवडून आले. विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांचे राजकीय उत्तराधिकारी रिंगणात असतानाही सलग दोन वेळा प्रदेशाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. पुढे राष्ट्रीय प्रतिनिधी, अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून निवडले गेले. दरम्यान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा, सिक्कीम, नागालँड, छत्तीसगढ, उत्तराखंड या सात राज्यांचे विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी प्रभाव दाखवला. पुढे युवक काँग्रेसमध्ये २०१८ मध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मोरेंना सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली. मोरे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. पदाच्या माध्यमातून विशेषतः विद्यार्थी, युवकांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली. महागाई, बेकारी, इंधन दरवाढीविरोधात आंदोलनांमध्ये युवाशक्तीचे दर्शन घडवले.

हेही वाचा… प्रकाश आबिटकर : विकास आणि जनतेशी नाळ

ज्या युवकांना सामाजिक, राजकीय कार्याची आवड आहे, पण राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसणाऱ्या लढवय्यांना हेरून शिवराज यांनी त्यांना नेतृत्व करण्याची संधी देण्याचे घेतलेले धोरण आज त्यांच्याभोवती भक्कम वलय निर्माण करणारे ठरले आहे. काँग्रेसकडे मजबूत युवाशक्ती असावी ही तळमळ राहिल्याने शिवराज यांच्याशी राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा स्नेह जुळला. लोकसभा, विधानसभेबरोबरच स्थानिक निवडणुकांतही नियोजन, प्रचारात त्यांनी विशेष कौशल्य दाखवले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivraj more politics from students movement print politics news asj
First published on: 11-11-2022 at 09:44 IST