सातारा: साताऱ्यातील राजकारणात रामराजे नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. यातच रामराजे आणि जयकुमार गोरे हे दोघेही एकमेकांवर अत्यंत जहाल शब्दात टीका करताना राज्याने पाहिले आहे. त्यातूनच ते एकमेकांना आव्हान देत एकमेकांवर कुरघोडी,टिका टिप्पणी चे राजकारण कायम सुरू असते.
फलटणच्या राजकारणामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यात पुन्हा वाढ झाली. पुढे दोघांमध्येही आतापर्यंत अनेकदा वाद झाले आहेत. जिथे जिथे दिसेल तिथे जयकुमार आणि रणजितसिंह यांनी रामराजेंच्या राजकारणातील उणिवा ओळखून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. रामराजे हे मुरब्बी राजकारणी असल्याने त्यांनीही कुठेही कमी न पडता तोडीसतोड भूमिका घेतली.त्यामुळे वाद वाढत राहिले. परंतु एका अनपेक्षित कलाटणीने यांच्यामध्ये समन्वय होत असल्याचे दिसून आले.
पहिल्यांदाच फलटण येथील एका कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक वर्षापासून जपलेल्या आपल्या वैरभावावर तडजोडीची फुंकर मारली आहे. विशेष म्हणजे रामराजे ही भूमिका मांडत असताना त्याच व्यासपीठावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते. सातारच्या राजकारणातील या त्रिमूर्तींनी तलवारी म्यान केल्याचे सध्या तरी चित्र आहे.
तिघांमध्ये संघर्ष टोकाला पोहोचलेला असताना या तिघांनीही आपल्या तलवारी मॅन केल्याची दिसून येत आहे.अधून मधून जयकुमार गोरे एखादी वादाची वात पेटवत असतात. यांच्यातील एकाने आरे केले तर दुसरा कारे करत नाही. मात्र तरीही हा वाद नव्याने वाढताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गोरे म्हणाले होते, मला अडचणीत आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले,.परंतु जनता माझ्यासोबत होती.त्यावेळी मला विशेष फरक पडला नाही. सर्वांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण मी कोणाला त्रास दिला नाही. मी ठरवलं असतं तर फलटणकर आणि माझ्या तालुक्यातील किमान चार नेते तुरुंगात असते, असा दावा करून त्यांनी पुन्हा राजकारण तापवले. मात्र वाद काही पुन्हा वाढला नाही.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी जयकुमार गोरे आणि माझं काही वैयक्तिक भांडण नसल्याचे स्पष्ट केलं होतं. पण गोऱ्यांच्या मनात मी सगळं करतो असा आहे. त्यामुळे देव करो आणि त्यांना सद्बुद्धी देवो.त्यांनी मंत्री म्हणून गरिबांसाठी काम करावं. एवढच माझ त्यांना सांगणे आहे. माझे वय वाढलेलं असून माझं तेवढं तर सांगण्याचा अधिकार असल्याचे रामराजेनी बोलून दाखवलं होतं.
रामराजे आणि गोरे यांच्यातील वाद शांत करण्याबरोबरच नंतर माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या बाबतही रामराजे मावळ झाल्याचे दिसून आले. नुकत्याच एका कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले,रणजितसिंह आणि आमच्या संघर्ष आहे. पण आता लोकांची काय अपेक्षा आहे. आम्ही काय एकमेकांच्या कपडे (कॉलरी) धरायच्या का. कुठे थांबायचं हे आम्हा दोघांनाही चांगलं कळतं असे विधान रामराजेंनी केले.
पण यासाठी सर्व होण्यासाठी मागील काही महिन्याचा आढावाही घ्यावा लागेल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक नेत्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. .रामराजे आणि जयकुमार गोरे यांच्यातील वाद पडद्यामागे मिटल्याचे बोलले जाते. रामराजांनी गोरे यांच्या बाबतचे वाद मिटल्याचेही त्यांच्या बोलण्यातून संकेत दिले. माझे गोरे बरोबर कोणतेही भांडत नाही. त्यांच्या मनात माझ्याविषयी जी काही अडी आहे.त्याविषयी मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
योग्य वेळी सांगेन असं सांगून रामराजे नाईक निंबाळकर यांनी गोरे यांच्या बाबत पूर्णतः मावळ भूमिका घेतली. पण यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मध्यस्थी आहे. सातारा जिल्ह्यात राजकीय वाद वाढू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सल्ल्याने मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सर्वांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यााशी झालेल्या चर्चेनंतर हे वाद सध्या तरी थांबल्याचे दिसत आहे. त्यातूनच रामराजेंची जयकुमार गोरे आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबतची मावळ भूमिका दिसून आली आहे. ही भूमिका किती दिवसांसाठी आहे, हे माहीत नाही. मात्र आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये पुन्हा पुन्हा नव्याने काही वाद उत्पन्न होतात का, हेही पाहणे रंजक ठरणार आहे. तोपर्यंत या वादावादीच्या रंगमंचावर शांतता दिसणार आहे.