सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यावरून खासदार रणजितसिंह नाईक-निबाळकर आणि धैर्यशील मोहिते यांच्यात संघर्ष वाढतच असताना दुसरीकडे याच मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेतही गटबाजी उफाळून आली आहे. सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत आणि पक्षाचे सचिव तथा जिल्ह्याचे संपर्क नेते संजय मशिलकर यांच्यातील सुप्त संघर्षाला करमाळा व कुर्डूवाडीत वाचा फुटल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. मशिलकर यांनी माढा-कुर्डूवाडीत येऊन प्रा. सावंत दिलेला इशारा त्यांचे बंधू तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनाही लागू होतो, असे मानले जात आहे.
करमाळ्यातील साखर कारखानदारीशी संबंधित शिवसेनेच्या नेत्या रश्मी कोलते-बागल व त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी अलिकडेच थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सचिव मशिलकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात दाखल होऊन पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. यातूनच त्यांनी जिल्हा प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांना त्यांचा नामोल्लेख टाळून चांगलेच फैलावर घेतले. प्रा. शिवाजी सावंत हे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. याचवेळी करमाळ्यात शिवसेनेत असूनही पूर्वीपासून मोहिते-पाटील गटाचे राजकारणाची सूत्रे सांभाळणारे माजी आमदार नारायण पाटील यांनाही मशिलकर यांनी सावध होण्याचा इशारा दिल्यामुळे त्याचे चांगले-वाईट पडसाद करमाळ्यासह माढा विभागात उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा : चावडी: मंडप सजलाय, पण नवरदेवाचाच पत्ता नाही !
करमाळा तालुक्यात बागल गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहयोगी अपक्ष आमदार संजय पाटील, माजी आमदार नारायण पाटील व जयवंत जगताप असे चार गट आहेत. पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्व दिले जात असल्यामुळे माजी आमदार नारायण पाटील व बागल गट शिवसेना एकनाथ शिंदे गटात म्हणजे एकाच पक्षात असतानाही त्यांच्यात शेवटपर्यंत मनोमिलन झाले नव्हते. बागल गटाच्या ताब्यात असताना बंद राहिलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला आर्थिक ताकद देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी दिल्यामुळे बागल गट शिवसेनेत सामील झाला होता. परंतु आदिनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊनही पुढे पुरेशी मदत न मिळाली नाही. तर उलट, या कारखान्यावर शासनाने प्रशासकीय मंडळ नियुक्त करताना त्यात बागल गटाला डावलण्यात आल्यामुळे शेवटी या गटाने शिवसेना सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश घेणे पसंत केले.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सचिव तथा संपर्क नेते संजय मशिलकर यांनी माढा विभागाचा दौरा करून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. प्रा. सावंत बंधुंच्या मूळ माढा तालुक्यात कुर्डूवाडीत मशिलकर यांनी सावंत बंधुंना त्यांचा थेट नामोल्लेख टाळून चांगलेच फैलावर घेतले. पक्षात पैशाची मस्ती खपवून घेतली जाणार नाही, शिवसेना पक्ष निष्ठावंत शिवसैनिकांच्या ताकदीवरच चालतो. पक्षात राहून पक्षातीलच निष्ठावंत शिवसैनिकांचे आणि प्रामाणिक पदाधिका-यांचे खच्चीकरण करण्याचे काम कोणी करीत असेल तर ते पक्षाला घातक आहे. असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मशिलकर यांनी दिला. कुर्डूवाडी शहरप्रमुख समाधान दास यांना हटवून जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी दुस-या कार्यकर्त्याला या पदावर नियुक्त केल्याची घडामोड घडली होती. समाधान दास यांनी, प्रा. सावंत यांनी दबाव टाकून कुर्डूवाडी शहरप्रमुखपदावरून आपणांस दूर केले आणि स्वतःच्या मर्जीतील कार्यकर्त्याची नियुक्ती केली, अशी तक्रार समाधान दास यांनी मशिलकर यांच्याकडे केली. त्याची दखल घेऊन मशीलकर यांनी प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिकांचा कानोसा घेतला आणि समाधान दास हेच कुर्डूवाडी शहरप्रमुखपदी कायम असतील, असे घोषित केले. या बैठकीस प्रा. शिवाजी सावंत हे हजर नव्हते.
जिल्ह्यातील पक्षाचे एकमेव सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनीही मशीलकर यांच्या भेटीकडे पाठ फिरविली होती. माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सोलापूर विभागाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियरंजन साठे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील आदींसह विविध तालुकाप्रमुख उपस्थित होते. कुर्डूवाडीत झालेल्या सभेत संजय मशिलकर यांनी केलेल्या टीकेचा रोख प्रा. सावंत बंधुंच्या दिशेने होता, असे मानले जात असताना या माध्यमातून प्रा. सावंत बंधुंना शह देण्यात आल्याचे सांगितले जाते. तर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली माढा विभागातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकत्रित राहून एकजुटीने काम करावे, असे आवाहन करताना मशीलकर यांनी चिवटे यांना ताकद उभी करण्याचे संकेत दिले. . यासंदर्भातप्रा. शिवाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.