एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : सोलापुरात भाजपच्या ताब्यातील लोकसभेची जागा हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे बरेच सक्रिय झाले आहेत. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव सोलापूर राखीव लोकसभेसाठी काँग्रेसकडून निश्चित असल्याचे मानले जाते.

Sandeep Sankpal came on bicycle and submitted his candidature to Kolhapur to protect the environment
कोल्हापूरात पर्यावरण रक्षणासाठी सायकलवरून येऊन संदीप संकपाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच

सोलापुरातून सुमारे चार दशके काँग्रेसच्या सत्ताकारणात अनेक महत्वाच्या जबाबदा-या सांभाळलेले सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१९ अशा सलग दोनवेळा पराभूत व्हावे लागले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून स्वतः निवृत्ती घेतली आहे. त्यांचे वय सध्या ८२ वर्षांचे आहे. वृध्दापकाळी शरीर थकल्यामुळे त्यांनी स्वतः यापुढे कोणतीही निवडणूक न लढविण्याचे ठरविले असताना मागील सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची बोच त्यांच्या मनात कायम आहे. भाजपच्या ताब्यातील सोलापूर लोकसभेची जागा हिसकावून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकांचे वारे वाहात असताना इकडे सुशीलकुमार व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे अधिकाधिक सक्रिय होताना दिसून येते. अलिकडे सुमारे महिनाभर शिंदे हे सोलापुरात ठाण मांडून होते. त्यानंतर ते पुन्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात बांधणीसाठी पुन्हा सक्रिय झाले आहेत. अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर अशा सर्व तालुक्यांमध्ये त्यांचे दौरे वाढले आहेत.

हेही वाचा… धाराशिवमध्ये बहु झाले इच्छुक

मतदारसंघातील विधानसभेच्या सहापैकी पाच जागा भाजप व मित्र पक्षांच्या ताब्यात असताना आणि भाजपने आगामी लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली असताना सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीने मूठ आवळायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोहोळ तालुक्यातील नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्या अनगर गावात निवासस्थानी जाऊन पाटील कुटुंबीयांना भेटणे, पंढरपुरातील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांना जवळ करणे, उत्तर सोलापूर तालुक्यातील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे व सध्या भाजपमध्ये असलेले भारत हरिभाऊ जाधव, सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुजीब शेख आदींना स्वतःकडे खेचून आणणे अशा माध्यमातून शिंदे हे ” इंच इंच जागा लढवू ” याप्रमाणे गांभीर्याने राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येतात. एरव्ही, पक्षीय राजकारणापेक्षा साहित्य, कला, संस्कृती आदी कार्यक्रमांमध्ये रमणारे सुशीलकुमार शिंदे यांनी तूर्त तरी हे सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा दिला असून प्राधान्याने लोकसभेच्या तयारीच्या अनुषंगाने पक्षाच्या बांधणीला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा… मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे एका कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचे काशीपीठाचे वीरशैव जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींनी भरभरून कौतुक केले. सोलापूरचा विकास घडवून आणण्याची खरी क्षमता सुशीलकुमार शिंदे यांच्याकडेच असून आमदार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेसाठी अधिक पात्र असल्याच्या शब्दांत डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींनी आशीर्वाद दिल्याने संघ परिवाराच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्याशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे चांगले संबंध आहेत. मागील २०१९ सालच्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत भाजपने डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींना उमेदवारी देऊ केली होती. त्यांनी स्वतः नकार दिला असता भाजपने गौडगाव मठाचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींना संधी दिली आणि ते खासदार झाले. या पार्श्वभूमीवर सोलापूरशी नित्य संपर्कात असलेले काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर कार्यक्रमात दिलेल्या आशीर्वादाचे महत्व राजकीयदृष्ट्या अधोरेखित झाले आहे. किंबहुना सुशीलकुमारांना आपल्या कन्येसाठी वीरशैव जगद्गुरूंचा आशीर्वाद घ्यावा लागणे, याचीही चर्चा तेवढीच रंगतदार ठरली आहे. सोलापुरात वीरशैव लिंगायत समाजावर भाजपची मजबूत फकड आहे. सोलापूर लोकसभेची बांधणी करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांना त्यांचे राजकीय गुरू, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ मिळणे तेवढेच मोलाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने पवार व शिंदे यांच्या एकत्रित सभा, मेळावे पंढरपुरात घेण्याचे ठरले होते. परंतु तारीख, वेळ ठरवूनदेखील ऐनवेळी शरद पवार यांचा दोन्हीवेळा दौरा स्थगित झाल्यामुळे शिंदे यांच्या गोटात काहीशी अस्वस्थता दिसून येते. पूर्वी काँग्रेस सोडून दुस-या पक्षांमध्ये गेलेल्या मंडळींना स्वगृही परतण्यासाठी त्यांचे रुसवेफुगवे काढण्याचे काम सुशीलकुमार शिंदे यांनाच करावे लागणार आहेत.