वसई : स्वातंत्र्यदिनाच्या जाहीर कार्यक्रमात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आयुक्तांना केलेल्या दमदाटी प्रकरणी प्रशासन मौनात असले तरी या निमित्ताने विरोधी पक्षांनी एकत्रित मोट बांधून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधक अशा प्रकारे एकत्र येण्याची ही पहिली वेळ. आता ठाकूरांना घेरण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ हा मुद्दा पुढे करण्यात आला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा. त्यांच्या पक्षाचे ३ आमदार आहेत. विद्यमान सरकारला त्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्या तीन मतांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं होतं. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या दरबारी जाऊन मतांची बेगमी मागितली होती. त्यामुळे ठाकूरांचे राजकीय वजन वाढले आहे.

मात्र आता स्थानिक भाजपाने ठाकूरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निमित्त मिळाले ते स्वातंत्र्यदिनी हितेंद्र ठाकूर यांनी आयुक्तांना केलेल्या दमदाटीचे. नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर संतप्त झालेल्या ठाकूरांनी जाहीर कार्यक्रमात पालिका अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली शिवाय पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना कार्यालयात घुसून फटकावेन अशा शब्दात दम दिला. ठाकूरांच्या दबदब्यामुळे पालिका प्रशासनाने मौनच बाळगले. या विषयी पालिकेत कुणी निषेध तर सोडा कुणी चर्चाही करत नाही. मात्र या घटनेच्या निमित्ताने शहरातील विरोधी पक्ष प्रथमच एकत्र आले आहेत. भाजपाच्या पुढाकाराने सर्वपक्षीय निषेध सभा घेण्यात आली. या सभेत आमदार ठाकूरांविरोधात घोषणाबाजी कऱण्यात आली. या घटनेची ठाकूरांनी विरोधकांची शेलक्या शब्दात टिंगल उडवली. आणि त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी आघाडी उघडली.

हेही वाचा : समविचारी पक्षांचेच महाविकास आघाडीला आव्हान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील आठवड्यात विरोधकांनी एक बैठक घेऊन ठाकूरांच्या विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे विरोधकांनी आघाडी उघडल्याची ही पहिलीच वेळ. त्याचा एक भाग म्हणून विरोधी पक्षांचे एक पथक सुर्या प्रकल्पाच्या पाहणीसाठी देखील गेले. दरम्यान, दमदाटी प्रकरणी पालिका आयुक्त तक्रार देण्यास तयार नसल्याने एकत्र आलेल्या विरोधकांची गोची झाली होती. परंतु एका मुलाखतीत ठाकूरांचा एक मुद्दा विरोधकांना सापडला आणि तो पकडून आता ठाकूरांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘लव्ह जिहाद’ हा फालतू मुद्दा आहे, असे ठाकूर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. त्यामुळे लव्ह जिहाद सारखा गंभीर प्रश्न ठाकूर किती हलक्यात घेतात असे सांगून आता विरोधत आक्रमक झाले आहे. या प्रकरणाला धार चढावी म्हणून भाजपाने विश्व हिंदू परिषदेलाही मैदानात उतरवले आणि रविवारी पत्रकार परिषद घेऊन विहिंपने ठाकूरांची निषेध केला.

हेही वाचा : अजित पवारांचा सावध पवित्रा, भुजबळांचा सारा रोख शरद पवारांवर

ठाकूरांची दबंगिरी नंतर प्रशासनानाचा ‘सायलेन्स मोड’ असणे ही संधी समजून विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका वसईच्या राजकारण तापवू लागली आहे. भाजपाने ठाकूरांना राजाश्रय दिला असल्याने स्थानिक भाजपाचा ठाकूरांविरोधातील आक्रमकपण किती टिकेल हा देखील प्रश्न आहे.